कृषी मंत्रालय
15 ते 17 जून दरम्यान हैदराबाद येथे G20 कृषी मंत्रीस्तरीय बैठकीचे (AMM) करण्यात आले आयोजन
विविध G - 20 देशांतील कृषीमंत्री आणि प्रतिनिधींना आयसीएआर-आयआयएमआर, या जागतिक भरड धान्य ( श्री अन्न) उत्कृष्टता केंद्रात अध्ययन सहलीसाठी नेण्यात आले
या अध्ययन सहलीमध्ये भरड धान्यांच्या शेतांना, प्रक्रिया केंद्रांना आणि संस्थेने आयोजित केलेल्या प्रदर्शनांना आणि अनेक स्टार्ट अप्सना भेटी देण्याच्या उपक्रमांचा समावेश होता
Posted On:
17 JUN 2023 8:22PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 जून 2023
जागतिक भरड धान्य परिषदेत आयसीएआर - भारतीय भरड धान्य संशोधन संस्था (आयसीएआर-आयआयएमआर) या संस्थेला जागतिक भरड धान्य (श्री अन्न) उत्कृष्टता केंद्र म्हणून जाहीर केल्यावर, हैदराबादमध्ये जी - 20 कृषी मंत्र्यांच्या बैठकीत दिलेल्या व्हिडिओ संदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भरड धान्यांचा प्रचार आणि स्वीकार यामध्ये या प्रमुख संस्थेच्या भूमिकेच्या महत्त्वाचा पुनरुच्चार केला आहे.
आयसीएआर-आयआयएमआरचा प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी, विशेषत: सध्या सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्षात विविध G - 20 देशांतील कृषी मंत्री आणि प्रतिनिधींना या संस्थेचे महत्त्व समजावून देण्यासाठी एका अध्ययन सहलीचे देखील आयोजन करण्यात आले. 15 ते 17 जून दरम्यान हैदराबाद येथे आयोजित जी - 20 कृषी मंत्री स्तरीय बैठकीचा एक भाग म्हणून या अध्ययन सहलीचे आयोजन करण्यात आले.
जी - 20 देशांच्या कृषीमंत्र्यांसह आंतरराष्ट्रीय संघटना आणि भारतातील इतर अनेक मान्यवरांचा समावेश असलेल्या 300 पेक्षा जास्त अभ्यागतांनी या अध्ययन सहलीला आणि प्रदर्शनाला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला.
कृषीमंत्र्यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत केल्यानंतर या प्रतिनिधींना आयआयएमआरच्या संकुलातील शेतांवर नेण्यात आले, जिथे आठ प्रकारच्या भरड धान्यांची उभी पिके दाखवण्यात आली. भरड धान्यांचा प्रचार करण्यासाठी एकत्रित वचनबद्धतेचे प्रतीक म्हणून जी – 20 च्या कृषीमंत्र्यांनी भरड धान्यांची पेरणी केली. कृषीमंत्र्यांनी आयआयएमआर संकुलात विविध भरड धान्य प्रक्रिया केंद्रांना देखील भेट दिली. यामध्ये प्राथमिक प्रक्रिया केंद्र, बेकरी युनिट, पॅकेजिंग युनिट, फ्लेकिंग युनिट, कोल्ड एक्स्ट्रूशन लाईन्स, कंटिन्युअस बिस्किट लाईन इत्यादींचा समावेश होता. मिलेट मफीन्स, कुकीज आणि नूडल्स यांसारख्या पोषण मूल्यवर्धन करणाऱ्या भरड धान्य उत्पादनांची निर्मिती करण्यासाठी या प्रक्रिया यंत्रांचा वापर करण्यात येतो.
या मंत्र्यांनी आणि इतर प्रतिनिधींनी न्यूट्रीहब या भारत सरकारच्या पाठबळाने चालवल्या जाणाऱ्या आयसीएआर-आयआयएमआर हैदराबादच्या टेक्नॉलॉजी बिझनेस इन्क्युबेटरला देखील भेट दिली.
मिलेट स्टार्ट अप्सना आवश्यक ते तंत्रज्ञान आणि पाठबळ पुरवून अतिशय सुविहित पद्धतीने विकास करण्यासाठी मदत करण्याच्या उद्देशाने, न्यूट्रीहब आयआयएमआर येथील इन्क्युबेशन प्रोग्रामची रचना करण्यात आली आहे.
त्याशिवाय या उत्कृष्टता केंद्रात या प्रतिनिधींनी भरड धान्यांपासून तयार केलेल्या आपापल्या देशातील स्वादिष्ट खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला. आयआयएमआरमधील उत्कृष्टता केंद्र भरड धान्याशी संबधित ज्ञानाच्या हस्तांतरणाला, तंत्रज्ञान प्रसाराला आणि उत्पादन विकासाला पाठबळ देते.
भरड धान्यावरील प्रदर्शन हे या अध्ययन सहलीचे प्रमुख वैशिष्ट्य होते. या प्रदर्शनात देशभरातील निवडक एफपीओ, भरड धान्य निर्यातदार आणि भरड धान्याशी संबंधित स्टार्ट अप्सचे एकूण 30 स्टॉल उभारण्यात आले होते.
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याणमंत्री शोभा कंरडजाळे यांनी यावेळी इंडियन फेडरेशन कलिनरी असोसिएशनचे पाककला व्यावसायिक आणि भारतातील नामवंत शेफ यांनी संकलित केलेले ‘मिलेटॉलॉजी’, आयआयएमआरचे ‘कलिनरी डिलाईट्स- मिलेट्स ट्रेडिशनल रेसिपीज अँड सेव्हरीज’ आणि ‘ए कॉम्पेन्डियम ऑफ इंडियन मिलेट्स स्टार्ट अप्स’ या तीन पुस्तकांचे प्रकाशन केले.
भरड धान्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भारताकडून होत असलेल्या प्रयत्नांना जगभरातील भरड धान्य उत्पादक देशांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे आणि भरड धान्यांची लोकप्रियता वाढवण्यासाठी तसेच भरड धान्य प्रक्रिया केंद्रांना, निर्यातीसाठी आणि स्टार्ट अप्सना प्रोत्साहन देण्यासाठी आयआयएमआरचा तंत्रज्ञान आधारित दृष्टीकोन हे आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष साजरे करण्यासाठी भारताच्या नेतृत्वाच्या दिशेने टाकलेले पुढचे पाऊल आहे.
* * *
M.Pange/S.Patil/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1933123)
Visitor Counter : 230