पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
वनांचे शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन तसेच नवीन दृष्टिकोन विकसित करण्यासाठी राष्ट्रीय कृती आराखडा संहिता 2023 जारी
Posted On:
17 JUN 2023 6:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 जून 2023
पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाने वनांचे शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन आणि नवीन दृष्टिकोन विकसित करण्यासाठी राष्ट्रीय कृती आराखडा संहिता 2023 जारी केली आहे. देहरादून येथील भारतीय वन संशोधन आणि शिक्षण परिषदेने आज ‘वाळवंटीकरण आणि दुष्काळ विरोधी जागतिक दिनी, पर्यावरण वने आणि हवामान बदल मंत्रालयाचे विशेष सचिव, वने महासंचालक, भारतीय वन सेवेतील चंद्र प्रकाश गोयल यांच्या हस्ते या राष्ट्रीय कृती आराखडा संहिता 2023 चे अनावरण केले.
वन व्यवस्थापना संबंधी शास्त्रीय व्यवस्था असणाऱ्या जगातील मोजक्या देशांमध्ये भारताचा समावेश होतो. भारतात वनांचे शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन करण्यासंदर्भात कृती योजना हे महत्त्वाचे साधन आहे. ही संहिता 2004 मध्ये प्रथम तयार करण्यात आली आणि 2014 मध्ये काही सुधारणांसह त्यात एकसमानता आणल्यामुळे, देशातील विविध वनविभागांमध्ये शास्त्रीय व्यवस्थापनासाठी कृती योजना तयार करण्यासाठी मार्गदर्शक तत्व म्हणून या संहितेचा स्वीकार करण्यात आला.
राष्ट्रीय कृती आराखडा संहिता 2023 ही देशातील राज्यांच्या वन विभागांना कृती योजना तयार करण्यासाठी मार्गदर्शक म्हणून काम करेल. राष्ट्रीय कृती योजना मसुदा 2023 मध्ये वन व्यवस्थापन आखणीची गरज तसेच वनांच्या शाश्वत व्यवस्थापनाची तत्वे यावर तपशीलवार भर आहे.
राष्ट्रीय कृती आराखडा संहिता 2023 मध्ये पहिल्यांदाच राज्यांच्या वनविभागांना सातत्याने माहिती जमा करणे आणि ती केंद्रीकृत डेटाबेस मध्ये अपडेट करणे यासंबधी सूचना करण्यात आली आहे.
भारतीय वन व्यवस्थापन मानक हे या संहिताचा एक भाग आहे. हे मानक तयार करताना वन व्यवस्थापनात एकसमानता आणण्याच्या प्रयत्नांमध्ये देशातील वैविध्यपूर्ण वन परिसंस्था विचारात घेतल्या आहेत. कृती आराखडा संहितेतील सूचनांनुसार व्यवस्थापन करताना, त्याची परिणामकारकता मोजताना राज्यांच्या वन विभागांना या भारतीय वन व्यवस्थापन मानकांचा उपयोग होईल.
* * *
M.Pange/V.Sahajrao/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1933081)
Visitor Counter : 312