श्रम आणि रोजगार मंत्रालय
सामाजिक न्यायाला प्रोत्साहन देण्यासाठी श्रमिक बाजारातील भेदभाव दूर करण्याच्या दृष्टीने सरकारने हाती घेतलेले उपक्रम केंद्रीय मंत्री भूपेंद्र सिंग यांनी अधिक ठळकपणे सर्वांसमोर मांडले
Posted On:
15 JUN 2023 5:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 जून 2023
केंद्रीय श्रम आणि रोजगार तसेच पर्यावरण, वने आणि हवामान बदल विभागाचे मंत्री भूपेंद्र यादव यांनी काल, 14 जून 2023 रोजी जिनिव्हा येथे सामाजिक न्यायाला प्रोत्साहन देण्याबाबत आंतरराष्ट्रीय श्रमिक संघटनेच्या वर्ल्ड ऑफ वर्क या शिखर परिषदेत आयोजित गटचर्चेमध्ये भाग घेतला.यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक न्यायाला प्रोत्साहन देण्यासाठी श्रमिक बाजारातील भेदभाव दूर करण्याच्या दृष्टीने सरकारने हाती घेतलेल्या उपक्रमांची माहिती केंद्रीय मंत्री यादव यांनी उपस्थितांना दिली.

केंद्रीय मंत्री म्हणाले की देशातील कार्यबळामध्ये महिलांचा अधिकाधिक समावेश व्हावा या दृष्टीने भारत सरकारने महिलांना दिल्या जाणाऱ्या भरपगारी रजेचा कालावधी 12 आठवड्यावरुन वाढवून 26 आठवडे केला , 50 किंवा त्याहून अधिक कर्मचारी असलेल्या आस्थापनांमध्ये पाळणाघराची सोय असणे अनिवार्य केले , रात्रपाळी करणाऱ्या महिला कामगारांच्या संरक्षणाची पुरेशी तरतूद इत्यादी उपाययोजना केल्या आहेत. ते म्हणाले की सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ असंघटीत क्षेत्रातील कामगारांपर्यंत पोहोचवण्यासाठी देखील सरकार प्रयत्न करत आहे.ई-पोर्टल हे सामाजिक सुरक्षेचे फायदे सर्वांपर्यंत पोहोचवण्याच्या दिशेने टाकलेले पाऊल असे असे त्यांनी सांगितले. त्यासाठीच सरकार कामगारांचा कौशल्यविकास, कौशल्यांचे अद्यायावतीकरण आणि पुनःपुन्हा कौशल्यविकास असे उपक्रम राबवत आहे असे त्यांनी पुढे सांगितले.
111व्या आंतरराष्ट्रीय श्रम परिषदेच्या अनुषंगाने केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी जिनिव्हा येथे कर्मचारी आणि कर्मचारी संघटनांशी त्रिपक्षीय संवाद कार्यक्रमात भाग घेतला. केंद्रीय मंत्र्यांनी यावेळी कामगारांच्या समस्या जाणून घेतल्या आणि कामगारांचे कल्याण तसेच व्यापार करण्यातील सुलभता साधण्याच्या बाबतीत भारत सरकार करत असलेल्या प्रयत्नांची त्यांना माहिती दिली.

केंद्रीय मंत्री यादव यांनी 111व्या आंतरराष्ट्रीय श्रमिक परिषदेच्या आयोजनानिमित्त जिनिव्हा येथे झालेल्या ब्रिक्स भोजन समारंभामध्ये देखील भाग घेतला. कामगारांसाठी प्रतिष्ठित काम आणि सामाजिक सुरक्षा यांना चालना देण्यात ब्रिक्स देशांनी सामायिक केलेल्या सर्वोत्तम प्रक्रिया तसेच अनुभव अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावतील असे ते म्हणाले.

ब्रिक्स आर्थिक भागीदारी 2025 लागू करण्याच्या संदर्भात ब्रिक्स उत्पादकता परिसंस्थांसाठी संयुक्त मंच स्थापन करण्याच्या दक्षिण आफ्रिकेने मांडलेल्या प्रस्तावाला भारताचा पाठींबा आहे अशी ग्वाही केंद्रीय मंत्री यादव यांनी दिली.
S.Kane/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1932629)
Visitor Counter : 183