वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
भारताच्या सागरी खाद्य उत्पादनांच्या निर्यातीने 2022-23 या वर्षात नोंदवला उच्चांक, 2021-22 च्या तुलनेत निर्यातीच्या प्रमाणात 26.73% टक्के तर मूल्यामध्ये 4.31% वाढ
2022-23 मध्ये भारताने 8.09 अब्ज डॉलर मूल्याची 17,35,286 एमटी सागरी खाद्य उत्पादनांची केली निर्यात, मूल्य आणि आकारमान या दोन्हीमध्ये उच्चांकाची नोंद
अमेरिका हा भारताच्या सागरी खाद्य उत्पादनांचा सर्वात मोठा आयातदार, तर त्यापाठोपाठ चीन, युरोपीय संघ, आग्नेय आशिया, जपान आणि मध्यपूर्व हे प्रमुख आयातदार
सागरी खाद्य उत्पादनांच्या निर्यातीत गोठवलेल्या कोळंबीचे अव्वल स्थान कायम
Posted On:
14 JUN 2023 6:51PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 जून 2023
आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये 63,969.14 कोटी रुपयांची ( 8.09 अब्ज डॉलर) 17,35,286 MT सागरी खाद्य उत्पादने निर्यात करून भारताने आकारमान आणि मूल्य या दोहोंमध्ये निर्यातीचा नवा उच्चांक नोंदवला आहे. अमेरिकेसारख्या आपल्या प्रमुख निर्यातदार बाजारपेठांमध्ये अनेक आव्हाने असूनही भारताने ही कामगिरी साध्य केली आहे.
2022-23 मध्ये भारताच्या निर्यातीत प्रमाणाच्या दृष्टीने 26.73%, तर रुपयातील मूल्यानुसार 11.08%, डॉलरमधील मूल्यानुसार 4.31% वाढ झाली. 2021-22 मध्ये भारताने 57,586.48 कोटी रुपये(7,759.58 दशलक्ष डॉलर) मूल्याची 13,69,264 एमटी सागरी खाद्य उत्पादनांची निर्यात केली होती.
गोठवलेली कोळंबी, हे सागरी खाद्य उत्पादन आकारमान आणि मूल्य या दोन्हीनुसार सर्वाधिक निर्यात होणारे सागरी खाद्य उत्पादन ठरले आहे आणि अमेरिका आणि चीन हे भारताच्या सागरी खाद्य उत्पादनांचे प्रमुख आयातदार ठरले आहेत. 43,135.58 कोटी रुपये मूल्य प्राप्त करणाऱ्या गोठवलेल्या कोळंबीने सागरी खाद्य उत्पादनांमधील सर्वात प्रमुख जिन्नस म्हणून आपले स्थान कायम राखले आहे. याच्या निर्यातीचा एकूण निर्यातीच्या आकारमानात 40.98% वाटा आहे तर डॉलरमधील एकूण मूल्यात 67.72% वाटा आहे. या काळात रुपयाच्या मूल्यानुसार गोठवलेल्या कोळंबीच्या निर्यातीत 1.01 % वाढ झाली.
गोठवलेले मासे हा दुसरा सर्वात जास्त निर्यात होणारा जिन्नस ठरला आहे, ज्याचे मूल्य 5503.18 कोटी रुपये(687.05 दशलक्ष डॉलर) आणि त्याचे आकारमान 21.24% आणि अमेरिकी डॉलरमधील प्राप्तीनुसार 8.49% राहिले.
यावर्षी गोठवलेले मासे या प्रकाराच्या निर्यातीत आकारंमानानुसार 62.65%, रुपयातील मूल्यानुसार 58.51% आणि अमेरिकी डॉलरमधील मूल्यानुसार 45.73% वाढ झाली आहे.
इतर जिन्नसांतर्गत तिसऱ्या क्रमांकाच्या 658.84 दशलक्ष डॉलरच्या निर्यातीमध्ये सुरीमी या प्रकाराला 2013.66 कोटी रुपये(253.89 दशलक्ष डॉलर) प्राप्ती झाली आहे.
शीत उत्पादनांची निर्यात हे एक उदयोन्मुख क्षेत्र मानले जात असून त्यात देखील अमेरिकी डॉलरनुसार 20.73% आणि आकारमानानुसार 12.63% वाढ झाली आहे.
परदेशी बाजारपेठेचा विचार करता, मूल्यानुसार अमेरिका हा भारताच्या सागरी खाद्य उत्पादनांचा प्रमुख आयातदार देश ठरला आहे, ज्याने 2632.08 दशलक्ष डॉलर मूल्याची आयात केली ज्याचा डॉलरमधील मूल्यानुसार 32.52 % वाटा आहे.
भारताच्या सागरी खाद्य उत्पादनांचा आकारमान आणि डॉलर्स मूल्य या दोन्हीच्या प्रमाणानुसार दुसऱ्या क्रमांकाचा प्रमुख निर्यात स्थान असलेला देश म्हणून चीन उदयाला आला आहे ज्याने 1,508.43 दशलक्ष डॉलर मूल्याची 4,05,547 एमटी उत्पादनांची आयात भारताकडून केली आहे. याचा वाटा आकारमानानुसार 23.37% , अमेरिकी डॉलरमधील मूल्यानुसार 18.64% आहे. चीनच्या बाजारपेठेतील निर्यातीत आकारमानानुसार 51.90%, रुपयातील मूल्यानुसार 32.02% आणि अमेरिकी डॉलरमधील मूल्यानुसार 28.37% वाढ झाली आहे.
भारताच्या निर्यातीचे सर्वात मोठे तिसऱ्या क्रमांकाचे निर्यात गंतव्य स्थान म्हणून युरोपीय संघ तिसऱ्या क्रमांकावर कायम राहिला आहे. या संघाने 1,263.71 दशलक्ष डॉलर मूल्याची 2,07,976 एमटी आयात केली आहे.
1191.25 दशलक्ष डॉलर मूल्याची 4,31,774 एमटी आयात करणारी आग्नेय आशिया ही चौथी मोठी बाजारपेठ आहे.
आकारमानात 6.29%, अमेरिकी डॉलमधील मूल्यानुसार 5.99% वाटा आणि 9.99% वाढीसह जपान पाचव्या स्थानावर कायम आहे.
N.Chitale/S.Patil/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1932396)
Visitor Counter : 327