संरक्षण मंत्रालय
सद्यस्थितीत संयुक्त राष्ट्र शांती सैनिकांची सुरक्षा आणि परिणामकारकता यासाठी नावीन्यपूर्ण आणि वर्धित आंतरराष्ट्रीय सहकार्य ही काळाची गरज असल्याचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे प्रतिपादन
Posted On:
13 JUN 2023 12:12PM by PIB Mumbai
हिंसाचारग्रस्त प्रदेशात स्थैर्य राखणे, संघर्ष रोखणे आणि शांतता पुनर्स्थापित करण्यासाठी तैनात केलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या शांतता सैनिकांची सुरक्षा आणि परिणामकारकता सुनिश्चित करण्यासाठी उत्तरदायी राष्ट्रांमध्ये अभिनव दृष्टिकोन आणि वर्धित सहकार्य असायला हवे असे आवाहन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले आहे. ते 13 जून 2023 रोजी नवी दिल्ली येथे संयुक्त राष्ट्र शांती सेनेला 75 वर्षे पूर्ण झाल्या निमित्त भारतीय लष्कराने आयोजित केलेल्या विशेष चर्चासत्राला संबोधित करत होते.
शांती सैनिकांसमोर आज वेगाने उभ्या ठाकणाऱ्या आव्हानांवर राजनाथ सिंह यांनी प्रकाश टाकला. त्यांची सुरक्षा आणि उत्पादकता यासाठी प्रशिक्षण, तंत्रज्ञान आणि संसाधनांमध्ये अधिक गुंतवणूक करण्याच्या गरजेवरही भर दिला. संघर्षग्रस्त भागात मोहिमेदरम्यान महिलांच्या महत्वपूर्ण योगदानाची दखल घेतली गेली पाहिजे असे सांगत, शांतता मोहिमांमध्ये महिलांच्या अर्थपूर्ण सहभागाचे त्यांनी समर्थन केले.
सुरक्षा परिषदेसह (UNSC) संयुक्त राष्ट्रांच्या निर्णय घेणार्या संस्थांनी जगाची लोकसंख्याशास्त्रीय वास्तविकता अधिक प्रतिबिंबित करण्याच्या गरजेचा संरक्षण मंत्र्यांनी पुनरुच्चार केला. “सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या भारताला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा स्थायी सदस्य म्हणून जागा मिळत नाही, तेव्हा यामुळे संयुक्त राष्ट्रांची नैतिक वैधता उणावते. म्हणूनच, संयुक्त राष्ट्रांच्या संस्थांना अधिक लोकशाहीवादी आणि वर्तमान वास्तविकतेचे प्रतिनिधी बनवण्याची वेळ आली आहे, ” असे ते म्हणाले.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेच्या भूमिकेचे कौतुक केले आणि ‘बाह्य घटक ’ या आर्थिक संकल्पनेद्वारे अशा मोहिमांना जगभरातून उत्साही समर्थन मिळत असल्याचे स्पष्ट केले.
संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमांमध्ये भारतोने दिलेल्या योगदानाचा समृद्ध वारसा आहे, असे सांगून ते म्हणाले, या सैन्यामध्ये सर्वात मोठे योगदान देणा-यांपैकी भारत एक आहे. आतापर्यंत सुमारे 2.75 लाख सैनिकांनी शांतता मोहिमांमध्ये योगदान दिले आहे. सध्या सुमारे 5,900 सैनिक संयुक्त राष्ट्रांच्या 12 मोहिमांमध्ये तैनात आहेत.
आपल्या प्रारंभीच्या भाषणात, लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी संयुक्त राष्ट्र शांती सेनेसाठी भारताने दिलेले योगदान अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, भारताचे जवळपास 5,900 शांती सैनिक जगभरात विविध शांतता मोहिमांमध्ये कार्यरत आहेत.
या प्रसंगी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शांतता मोहिमांमधील भारताच्या समृद्ध आणि उल्लेखनीय योगदानावरील चित्रमय संकलनाचे अनावरण केले. तसेच शांतता मोहिमांमधील देशाच्या इतिहासाचे दर्शन घडविणा-या छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. संयुक्त राष्ट्रातील भारताच्या स्थायी प्रतिनिधी रुचिरा कंबोज यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे कार्यक्रमाला मार्गदर्शन केले.
***
Sushama K/viinaya/Suvarna/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1931937)
Visitor Counter : 185