अणुऊर्जा विभाग
भौतिकशास्त्र विषयाच्या डॉक्टरेट पातळीवरील विद्यार्थ्यांच्या संख्येत लिंगसमतोल साधण्यासाठी विज्ञान-विदुषी –2023 मुंबईत कार्यक्रम
एसटीईएम(विज्ञान,तंत्रज्ञान,अभियांत्रिकी आणि गणित) या विषयांच्या विद्यार्थ्यांमधील लिंग तफावत चिंताजनक,टीआयएफआर शास्त्रज्ञांचे प्रतिपादन
Posted On:
12 JUN 2023 8:26PM by PIB Mumbai
मुंबई, 12 जून 2023
भौतिकशास्त्र विषयाच्या डॉक्टरेट पातळीवरील विद्यार्थ्यांच्या संख्येत लिंगसमतोल साधण्यासाठी आयोजित केलेल्या विज्ञान-विदुषी – 2023 या उपक्रमाला आज मुंबई येथील होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र (एचबीसीएसई) येथे सुरुवात झाली. संपूर्ण भारतातील चाळीस विविध संस्थांमधील भौतिकशास्त्रातील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाचे पहिले वर्ष नुकतेच पूर्ण केलेल्या 40 महिला विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात भाग घेतला असून त्यांना यामध्ये आधुनिक भौतिकशास्त्र विषयातील अभ्यासक्रम शिकवले जातील तसेच नवोन्मेषी प्रयोग करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यात येईल.
टीआयएफआर अर्थात टाटा मुलभूत संशोधन संस्थेने भौतिकशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींसाठी वर्ष 2020 पासून त्यांच्या होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राच्या माध्यमातून “विज्ञान विदुषी” हा तीन आठवड्यांचा उन्हाळी प्रशिक्षण कार्यक्रम सुरु केला आहे. कोविड महामारीच्या काळात सुरु झालेला हा कार्यक्रम आता होमी भाभा केंद्रात 12 जून ते 1 जुलै या कालावधीत प्रथमच संपूर्णपणे रहिवासी पद्धतीने आयोजित करण्यात आला आहे.
एचबीसीएसईचे केंद्र संचालक प्रा.अर्णव भट्टाचार्य यांनी भौतिकशास्त्रात एमएससी करणाऱ्या विद्यार्थिनींना प्रोत्साहन देण्यासाठी, जगभरात भौतिकशास्त्रात यशस्वी कारकीर्द करणाऱ्या महिला शास्त्रज्ञांची माहिती देणारे सादरीकरण केले.
एचबीसीएसईच्या अधिष्ठाता प्रा.सविता लांडगे यांनी यावेळी बोलताना सांगितले की, या कार्यक्रमामध्ये आधीच्या तीन तुकड्यांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थिनींनी भौतिकशास्त्र विषयातील कारकीर्द घडविण्याच्या अमर्याद संधींबाबत नवा दृष्टीकोन प्राप्त केला आहे. या कार्यक्रमाचे प्रसारक म्हणून इतर विद्यार्थिनींना भौतिकशास्त्र विषयाचे शिक्षण घेण्यासाठी प्रेरित करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
टीआयएफआरमधील प्राध्यापक आणि विज्ञान विदुषी-2023 या कार्यक्रमाच्या संयोजक वंदना नानल यांनी उपस्थित विद्यार्थिनींना विज्ञान विदुषी कार्यक्रमाची संकल्पना समजावून दिली आणि त्यानंतर प्रा.अन्वेष मझुमदार यांनी कार्यक्रमाचा एकंदर दृष्टीकोन समजावून दिला.
एसटीईएम(विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित) या विषयांचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येतील लिंग तफावत चिंताजनक आहे याकडे प्रा.नानल यांनी निर्देश केला. जागतिक पातळीवरच, नैसर्गिक शस्त्र, गणित आणि सांख्यिकी या विषयात शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थिनींची संख्या 5%हूनही कमी आहे. “भारतात, भौतिकशास्त्र विषय शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमधील लिंग असमतोल चिंताजनक आहे. भारतातील प्रतिष्ठित संशोधन संस्थांच्या निवडक भौतिकशास्त्र विभागांच्या सर्वेक्षणातून असे दिसून आले आहे की, या विषयात डॉक्टरेट पातळीवरील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींची संख्या 23%हूनही कमी आहे. ही समस्या गुंतागुंतीची आहे आणि यासाठी बहुशाखीय दृष्टीकोनाची गरज आहे, त्या म्हणाल्या. यावर उपाय म्हणजे मार्गदर्शनाची गरज आणि योग्य माहितीच्या प्रसाराला वेग देणे तसेच विज्ञान विषयाच्या शिक्षणात लिंगविषयक जागृतीचा समावेश करणे होय, आणि हे अनेक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणांतून अधोरेखित झाले आहे. तसेच केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने देखील याची शिफारस केली आहे. केवळ भौतिकशास्त्रात पदव्युत्तर पदवी पातळीवरचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींसाठी समर्पित विज्ञान विदुषी हा कार्यक्रम म्हणजे “शास्त्र विषयात महिलांचे कमी प्रतिनिधित्व” या समस्येवर तोडगा काढण्याच्या दिशेने टाकलेले ठोस पाऊल आहे, असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे सह-संयोजन प्रा.अन्वेष मझुमदार यांनी सांगितले की या कार्यशाळेच्या प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये, भौतिकशास्त्रात संशोधनविषयक कारकीर्द स्वीकारण्याबाबत प्रोत्साहन देणारी परस्पर संवादात्मक सत्रे, मान्यवर महिला शास्त्रज्ञांची व्याख्याने, गट चर्चा, आत्मविश्वास सुधारणे, लिंग संबंधी आव्हाने तसेच भौतिकशास्त्र शिक्षण संशोधन या विषयाची ओळख करून देणे यांचा समावेश असेल. तसेच प्रमेयांची सोडवणूक, या विषयातील संशोधन विषयक संधींबाबत मार्गदर्शन इत्यादी देखील दिले जाईल असे कार्यक्रमाचे सह-संयोजक प्रा.अमोल दिघे यांनी सांगितले. या कार्यक्रमात सहभागी विद्यार्थिनींना टीआयएफआरच्या कुलाबा संशोधन प्रयोगशाळांनातसेच पुणे येथील जीएमआरटी येथे भेट देण्यासाठी नेण्यात येईल. यशस्वी महिला शास्त्रज्ञांकडून या विद्यार्थिनींना शिकवून, प्रेरित करून मार्गदर्शन देण्यात येईल.
ईशान्य भारतासह देशभरातून आलेल्या 500 अर्जांमधून 40 विद्यार्थिनींची त्यांची शैक्षणिक गुणवत्ता तसेच शिफारसी पत्रे यांच्या आधारावर निवड करण्यात आली आहे. विज्ञान विदुषी कार्यशाळेचा भाग म्हणून या विद्यार्थिनी विविध संशोधन संस्थांना भेट देतील. विद्यार्थिनींसाठी राबवण्यात येणारा टीआयएफआरचा हा वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम येत्या काळात अधिक विस्तारित स्वरुपात राबवण्यात येणार असून त्यातून अधिकाधिक विद्यार्थिनींना फायदा होईल.
S.Bedekar/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1931813)
Visitor Counter : 171