गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

अमरनाथ यात्रेची ‘स्वच्छ तीर्थ’च्या दिशेने वाटचाल

Posted On: 12 JUN 2023 2:25PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 जून 2023

स्वच्छ भारत मिशन शहरी 2.0 या मोहिमे अंतर्गत, यात्रेकरूंसाठी स्वच्छ आणि कचरामुक्त वातावरण सुनिश्चित करण्यासाठी पुढाकार घेतला जातो. स्वच्छ शौचालयाची  सुविधा पुरवणे  आणि यात्रेच्या स्थानी  जबाबदारीने कच-याची  विल्हेवाट लावण्यासाठी जनजागृती मोहीम राबवली जाते. तसेच उत्तम, मजबूत  कचरा व्यवस्थापन प्रणाली लागू केली जाते. या उपाययोजनांमुळे अमरनाथ यात्रेच्या मार्गावर  स्वच्छतेच्या दर्जामध्ये लक्षणीय सुधारणा झाली आहे.  यामुळे  भक्तांसाठीही ही यात्रा म्हणजे  पर्यावरणाच्या दृष्टीने जागरूकता निर्माण करणारी  यात्रा बनली आहे. अमरनाथ यात्रा मार्गावर काही कायमची वस्ती नसते.  इथे येणा-या यात्रेकरूंमुळे  या भागात दरवर्षी जुलै आणि ऑगस्ट  या महिन्यात फ्लोटिंग म्हणजे विशिष्ट काळापुरती लोकसंख्‍या जास्त असते. म्हणजेच ठराविक काळातच गर्दी असते.  दक्षिण काश्मीरमधील अमरनाथ यात्रेतील पवित्र गुहेमध्‍ये बनणा-या शिवलिंगाचे दर्शन घेण्‍यासाठी इथे या दोन महिन्यात  मोठ्या संख्येने भाविक येतात.  त्यामुळे या दिवसांमध्‍ये मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होतो.  तीर्थक्षेत्राचे पावित्र्य राखण्यासाठी या यात्रामार्गावर  प्रभावी कचरा व्यवस्थापन धोरण राबवणे आवश्यक आहे.

वर्ष 2022 मध्ये अमरनाथ यात्रेदरम्यान, स्थानिक शहरी संस्थांनी (यूएलबी ) स्वच्छतेच्या कामामध्‍ये  सुधारणा करण्‍यासाठी एकूण 127 शौचालये निर्माण केली.  119 मूताऱ्या आणि यात्रेकरूंच्या सुविधेसाठी 40 स्नानगृहांची स्थापना केली. तसेच  ही स्थाने कायम स्वच्छ राहतील याची काळजी  घेतली. या व्यतिरिक्त, शहरी स्‍थानिक संस्थेने खास यात्रेसाठी 780 हून अधिक शौचालये निर्माण केली आहेत. 100% कचरा संकलन साध्य करण्यासाठी, नागरी स्थानिक संस्थेकडून  दररोज दोन भागात विभागलेली 10 वाहने वापरली जातात. त्यामुळे  कचऱ्याचे विलगीकरण सुलभ होते. तसेच  सर्व शिबिरांमध्ये 145 जोडडबे बसवले. स्वच्छताविषयक कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी महिला प्रसाधनगृहात काळ्या रंगाच्या कचरा पेट्या ठेवण्यात आल्या होत्या. गेल्या वर्षी यात्रेदरम्यान सुमारे 150 मेट्रिक टन ओला कचरा, 130 मेट्रिक टन सुका कचरा आणि 10-12 मेट्रिक टन प्लास्टिक कचरा निर्माण झाला होता. इतक्या मोठ्या प्रमाणावर  निर्माण होणारा कचरा जमा केल्यानंतर तो वाहून नेण्‍यासाठी, स्थानिक संस्थेने यात्रेदरम्यान गाळ काढताना वापरली जाणारी  14 वाहने वापरली. तसेच आणीबाणीसाठी अतिरिक्त वाहनेही  तैनात केली. स्थानिक संस्थेने एकूण 2596 किलो  मैला  वाहून नेऊन त्याची विल्हेवाट लावली.

साफसफाई  आणि आरोग्यासाठी आवश्यक  स्वच्छता राखण्यासाठी, शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी  रहिवासी  क्षेत्र, लगतचे रस्ते आणि इतर आस्थापनांमध्ये 231 स्वच्छता कर्मचारी तैनात केले. या कामगारांना योग्य गणवेश, पीपीई किट, हातमोजे, गमबूट, मास्क आणि झाडू देण्यात आले.

'ट्यूलिप' अर्थात शहरी अध्ययन इंटर्नशिप कार्यक्रमाअंतर्गत (TULIP -द अर्बन लर्निंग इंटर्नशिप प्रोग्राम)  एक भाग म्हणून, यात्रेदरम्यान अनेक स्वच्छाग्रही रहिवासी क्षेत्राच्या  ठिकाणी तैनात करण्यात आले होते. त्यांनी एकंदरित  साफसफाई  आणि आरोग्यासाठी आवश्यक स्वच्छता बाबींवर देखरेख ठेवली, घनकचरा संकलन आणि विलगीकरण सुलभ केले, एकल वापराचे प्लॅस्टिक वापरले जाऊ नये यासाठी आग्रह धरला आणि स्वच्छतेचा प्रचार केला.  शौचालय, लंगर आणि शिबिर सुविधांवरील क्यू आर  कोडद्वारेट्यूलिप इंटर्न्सनी यात्रेकरूंकडून  अभिप्राय गोळा केला. यात्रेकरूंसाठी खास सेल्फी पॉइंट्स लावण्यात आले होते. अमरनाथ यात्रेची अनुभूती यात्रेकरूंना  अधिक उत्तम व्हावी यासाठी अनेक वैशिष्ठ्यपूर्ण  उपक्रम हाती घेण्यात आले.

कार्यक्षम कचरा प्रक्रिया सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने, जम्मू आणि काश्मीरमधील 10 शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 12 मे 2023 रोजी 9 घनकचरा व्यवस्थापन सुविधांचे उद्घाटन करण्यात आले आहे. उल्लेखनीय म्हणजे, यातील तीन स्थानिक स्वराज्य संस्था, काझीगुंड, सुंबल आणि गांदरबल  या यात्रा मार्गावर येतात. या सुविधा दररोज 40 टन कचऱ्यावर प्रक्रिया करतील. प्रत्येक केंद्रामध्ये सुक्या कचऱ्यासाठी मटेरियल रिकव्हरी सुविधा आहे. या सुविधेत  विलगीकरण, उपसा  आणि कातरणी  सुविधा समाविष्ट आहेत. ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी कंपोस्ट खड्डेही दिले जातात. अमरनाथ यात्रा  2023 साठीच्या  तयारीमध्ये विविध अतिरिक्त उपायांचा समावेश आहे, जसे की अधिक पूर्वसंविरचित  शौचालये खरेदी करणे, साधने, जंतुनाशके आणि संयंत्र  खरेदी करणे,   अतिरिक्त स्वच्छता कर्मचारी नियुक्त करणे, अधिक स्वच्छाग्रहींना सहभागी करून घेणे, यात्रा मार्ग आणि रहिवासी क्षेत्राची  यात्रेपूर्वी  स्वच्छता, मलकुंडातील गाळ उपसणे, स्वच्छता पथके तयार करणे आणि  नोडल अधिकारी नियुक्त करणे.  स्वच्छ अमरनाथ यात्रेच्या माध्यमातून, स्वच्छ भारत अभियान शहरे  2.0 ने तीर्थक्षेत्रातील स्वच्छता स्थिती सुधारण्यासोबतच साफसफाई आणि आरोग्यविषयक  स्वच्छता  मूल्यांना बळकटी दिली आहे.

S.Patil/Suvarna/Sonali/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai




(Release ID: 1931631) Visitor Counter : 178


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu