विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
उधमपूर येथे सीएसआयआर - आयआयआयएमच्या वतीने आयोजित दोन दिवसीय ‘यंग स्टार्ट-अप एक्स्पो’ चे डॉ जितेंद्र सिंह यांच्या हस्ते उद्घाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रोत्साहित केलेली स्टार्ट-अप चळवळ आता शहरांपासून भारताच्या प्रत्येक भागात पोहोचत आहे: डॉ जितेंद्र सिंह
उधमपूर येथील “यंग स्टार्ट-अप एक्स्पो” या क्षेत्रातील उद्योग तसेच उद्योजकांसाठी नवे मार्ग शोधण्याची संधी देतो : डॉ जितेंद्र सिंह
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारताने विकास साध्य केला असून जी 20 अध्यक्षपद आणि आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष ही त्याची उत्तम उदाहरणे आहेत: डॉ जितेंद्र सिंह
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतातील स्टार्ट अप्स गेल्या 9 वर्षात 300 पट वाढले: डॉ जितेंद्र सिंह
Posted On:
10 JUN 2023 7:02PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रोत्साहित केलेली स्टार्ट-अप चळवळ आता शहरांसह भारताच्या प्रत्येक भागात पोहोचत आहे, असे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), डॉ जितेंद्र सिंह यांनी सांगितले. जम्मू आणि काश्मीरमध्ये उधमपूर येथे सीएसआयआर -आयआयआयएमच्या वतीने आयोजित दोन दिवसीय ‘यंग स्टार्ट-अप एक्स्पो’ चे उद्घाटन करताना ते बोलत होते. उधमपूर येथे आयोजित 2-दिवसीय "यंग स्टार्ट-अप एक्स्पो" हे या क्षेत्रातील उद्योग तसेच उद्योजकांसाठी नवे मार्ग शोधण्याची संधी देणारा आहे, असे ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, जम्मू आणि काश्मीरला प्रत्येक गोष्टीत सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे. यामुळे जम्मू आणि काश्मीर भारतातील विकसित राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांशी विकासाच्या बाबतीत स्पर्धा करत आहे, असे डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले.
या वर्षी भारताला जी 20 चे अध्यक्षपद मिळाले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांमुळे हे वर्ष संयुक्त राष्ट्रसंघातर्फे आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. 2023 हे वर्ष अनेक कारणांमुळे महत्त्वाचे असून, सध्याच्या सरकारच्या काळात जगामध्ये भारताची उंची कशाप्रकारे वाढली आहे हे यावरून दिसून येते, असे ते म्हणाले.
भारतातील स्टार्ट-अप्स गेल्या 9 वर्षात 300 पट वाढले आहेत. 2014 पूर्वी केवळ 350 स्टार्ट-अप्स होते, आता स्टार्टअप्स मध्ये लक्षणीय वाढ होऊन ही संख्या 100 पेक्षा अधिक युनिकॉर्नसह 90,000 पेक्षा अधिक स्टार्ट-अप्स पर्यंत पोहोचली आहे, असे त्यांनी सांगितले.
भारतामध्ये तरुणांमध्ये प्रतिभा, क्षमता, नवोन्मेष आणि सर्जनशीलतेची कमतरता कधीच नव्हती, मात्र त्यांना राजकीय नेतृत्वाकडून पोषक वातावरणाची आणि योग्य संरक्षणाची कमतरता होती,हे पोषक वातावरण आणि संरक्षण पंतप्रधान मोदी यांनी उपलब्ध करून दिले आहे, असे डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले.
गेल्या 9 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने केवळ रोजगार निर्मितीवरच नाही तर उद्यमशीलता निर्माण करण्यावरही लक्ष केंद्रित केले आहे, असे डॉ जितेंद्र सिंह म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया’ हा मंत्र या देशातील तरुणांसाठी लाखो रोजगाराच्या संधी निर्माण करत आहे. हे तरुण हळूहळू सरकारी नोकरीच्या मानसिकतेतून बाहेर पडत आहेत, तसेच झेप घेण्यासाठी आणि विशिष्ट क्षेत्रांमध्ये नवीन संधी उपलब्ध करून देण्यासह रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी सज्ज झाले आहेत, असे ते म्हणाले.
या दोन दिवसीय ‘स्टार्ट-अप कॉन्क्लेव्ह’साठी उधमपूरची निवड झाली, तो दिवस उधमपूर जिल्ह्यासाठी ऐतिहासिक असल्याचे सीएसआयआर-आयआयआयएम जम्मूचे संचालक डॉ. जबीर अहमद यांनी सांगितले. आर्थिक विकासाचे इंजिन असलेल्या स्टार्ट-अपच्या फायद्यांविषयी माहिती आणि समुपदेशन घेण्याच्या दृष्टीने उधमपूर जिल्ह्यातील आणि आजूबाजूच्या इतर जिल्ह्यांतील लोकांनी या ‘स्टार्ट-अप कॉन्क्लेव्ह’ला भेट द्यावी, असे आवाहन डॉ. जबीर यांनी केले.
उधमपूर जिल्हा विकास परिषदेचे अध्यक्ष लाल चंद, उपाध्यक्ष जुही मनहास पठानिया, सीएसआयआर-आयआयआयएमचे संचालक डॉ जबीर अहमद, उधमपूरचे उपायुक्त सचिनकुमार वैश्य, उधमपूर-रियासी क्षेत्राचे उपमहानिरीक्षक मोहम्मद सुलेमान चौधरी, उधमपूरचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक डॉ विनोद कुमार यांच्यासह तालुका विकास परिषद ,जिल्हा विकास परिषद आणि जिल्हा प्रशासनाचे इतर अधिकारी या स्टार्टअप कॉन्क्लेव्हला उपस्थित होते.
***
M.Pange/S.Chavan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1931360)
Visitor Counter : 182