गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज नवी दिल्ली येथे एका उच्चस्तरीय बैठकीत श्री अमरनाथ यात्रेच्या तयारीचा घेतला आढावा


अमरनाथ यात्रेकरूंना दर्शन सुलभपणे व्हावे आणि त्यांना कोणतीही अडचण येऊ नये, ही मोदी सरकारची प्राथमिकता -अमित शाह

श्री अमरनाथ यात्रेच्या संपूर्ण मार्गावर पुरेशी सुरक्षा व्यवस्था ठेवण्याच्या गृहमंत्र्यांनी दिल्या सूचना

विमानतळ आणि रेल्वे स्थानकापासून यात्रा बेस कॅम्पपर्यंतच्या मार्गावर हर प्रकारे सुरळीत व्यवस्था ठेवण्यावर अमित शाह यांनी दिला भर

यात्रेकरूंच्या सोयीसाठी रात्रीही श्रीनगर आणि जम्मू इथून हवाई सेवा देण्याचे केंद्रीय गृहमंत्र्यांचे निर्देश

ऑक्सिजन सिलिंडर आणि त्यांचे पुनर्भरण सुनिश्चित करण्याबरोबरच त्यांचा पुरेसा साठा ठेवण्याच्या आणि डॉक्टरांची अतिरिक्त पथके उपलब्ध करून देण्याच्याही सूचना

अमरनाथ यात्रेकरूंसाठी प्रवास, मुक्काम, वीज, पाणी, दळणवळण आणि आरोग्य यासह सर्व आवश्यक सुविधांसाठी पुरेशी व्यवस्था करण्याचे अमित शाह यांचे निर्देश

यात्रा मार्गात उत्तम दळणवळणासाठी आणि भूस्खलन झाल्यास मार्ग तातडीने खुला करण्यासाठी यंत्र तैनात करण्याचेही निर्देश

Posted On: 09 JUN 2023 8:46PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 9 जून 2023

 

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री  अमित शाह  यांनी आज नवी दिल्ली येथे एका उच्चस्तरीय बैठकीत अमरनाथ यात्रेच्या तयारीचा आढावा घेतला. या बैठकीला जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल  मनोज सिन्हा, केंद्रीय गृहसचिव, गुप्तवार्ता विभागाचे  संचालक, सीमा सुरक्षा दल आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाचे महासंचालक, सीमा रस्ते संघटनेचे महासंचालक, जम्मू-काश्मीरचे मुख्य सचिव, लष्कर, केंद्र सरकार आणि जम्मू व काश्मीर प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.  

अमरनाथ यात्रेकरूंना सुलभतेने दर्शन घेता यावे, त्यांना कोणत्याही समस्येला तोंड द्यावे लागू नये, याला मोदी सरकार प्राधान्य देत असल्याचे गृहमंत्र्यांनी बैठकीदरम्यान सांगितले. श्री अमरनाथ यात्रेच्या संपूर्ण मार्गावर सुरक्षेची कडेकोट व्यवस्था करण्याचे निर्देश त्यांनी दिले. विमानतळ आणि रेल्वे स्थानकापासून यात्रेच्या बेस कॅम्पपर्यंतच्या मार्गावर प्रत्येक प्रकारची व्यवस्था उपलब्ध करून देण्यावर गृहमंत्र्यांनी भर दिला. यात्रेकरूंच्या सुविधेसाठी श्रीनगर आणि जम्मूमधील विमानसेवा रात्रीच्या वेळी देखील उपलब्ध करून देण्याची सूचना त्यांनी दिली.

ऑक्सिजन सिलेंडरची उपलब्धता, त्यांची पुनर्भरण व्यवस्था सुनिश्चित करणे, सोबतच ऑक्सिजन सिलेंडरचा पर्याप्त साठा ठेवणे आणि डॉक्टरांची अतिरिक्त पथके उपलब्ध करून देण्याचे निर्देश अमित शहा यांनी दिले. पुरेशा प्रमाणात उपचार खाटा तसेच कोणत्याही वैद्यकीय आपत्तीचा सामना करण्यासाठी रुग्णवाहिका आणि हेलिकॉप्टर सुसज्ज ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. सोबतच, अमरनाथ यात्रेकरूंची ये-जा, निवास, वीज, पाणी, प्रवास आणि आरोग्य यांच्यासह सर्व आवश्यक सुविधा मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्याची सूचना त्यांनी दिली. यात्रा मार्गावर उत्तम संपर्क सुविधा आणि भूस्खलन झाल्यास तातडीने मार्ग खुले करण्यासाठी आवश्यक असलेली उपकरणे तैनात करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

श्री अमरनाथ यात्रेसाठी जाणाऱ्या सर्व यात्रेकरूंना आर एफ आय डी कार्ड देण्यात येणार असून या कार्डमुळे यात्रेकरूंचे रियल टाईम लोकेशन शोधता येऊ शकते, अशी माहिती या बैठकीत देण्यात आली. प्रत्येक अमरनाथ यात्रेकरूचा पाच लाख रुपयांचा तर यात्रा मार्गावरील प्रत्येक पशुचा 50 हजार रुपयांचा विमा उतरवण्यात येणार असल्याचेही या बैठकीत सांगण्यात आले. याव्यतिरिक्त, यात्रेसाठी तंबू शहर, यात्रा मार्गावर वाय फाय, हॉटस्पॉट आणि प्रकाश योजनेची व्यवस्था करण्यात येणार आहे. यासोबतच बाबा बर्फानी यांचे ऑनलाइन थेट दर्शन, पवित्र अमरनाथ गुंफेमध्ये सकाळ संध्याकाळ होणाऱ्या आरतीचे थेट प्रसारण केले जाणार आहे. तसेच बेस कॅम्पवर विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.

 

* * *

S.Patil/Sonali K/Shraddha M/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1931171) Visitor Counter : 146