नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

दिल्लीत आंतरराष्‍ट्रीय सौर आघाडीच्या स्थायी समितीची मिश्र स्वरूपामध्‍ये आठवी बैठक

Posted On: 07 JUN 2023 5:38PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 7 जून 2023

आयएसए म्हणजेच  आंतरराष्‍ट्रीय सौर आघाडीच्या  स्थायी समितीची आठवी बैठक 6 जून 2023 रोजी नवी दिल्ली येथे झाली. आयएसएचे अध्‍यक्षपद सध्‍या भारत भूषवित आहे, त्यामुळे केंद्रीय ऊर्जा मंत्री आर.के. सिंह यांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीचे आयोजन  करण्यात आले  होते, तर आयएसए बैठकीचे सह-अध्यक्ष म्हणून फ्रान्सचे मंत्री उपस्थित होते. ही बैठक प्रत्‍यक्ष तसेच दूरदृश्‍य प्रणाली अशा मिश्र स्वरूपामध्‍ये पार पडली. यावेळी आयएसएच्या  सदस्य देशांचे काही प्रतिनिधी दिल्लीत प्रत्यक्ष सहभागी झाले, तर काही प्रतिनिधीनी बैठकीला  ऑनलाइन उपस्थिती नोंदवली.

या  बैठकीत  सदस्य देशांमधील आयएसएचे प्रात्यक्षिक प्रकल्प, स्टार –सी म्हणजेच  सौर तंत्रज्ञान अंमलबजावणी स्रोत केंद्र,   ‘आयएसए सोलर एक्स  स्टार्टअप चॅलेंज’, आयएसए सौर वित्तीय सुविधा  आणि आयएसए स्थायी समितीच्या नवव्या बैठकीची तयारीआणि आयएसए महासभेच्या सहाव्या सत्रासाठी समिती आणि तयारी, यावर चर्चा झाली.

केंद्रीय ऊर्जा मंत्री आणि नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री आर.के. सिंह यांनी, आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचे अध्यक्ष या नात्याने बैठकीच्या उद्घाटनपर  भाषणात सांगितले की, ऊर्जा संक्रमणाची गरज हा  आता एक स्थायी  प्रश्न आहे. आज जगाला ऊर्जा संक्रमणाची गरज आहे की नाही हा प्रश्नच  आता उरलेला नाही. त्याऐवजीहे संक्रमण  कसे आणि किती लवकर साध्य करायचे हा प्रश्न आहे. ऊर्जेचा पर्यायी स्रोत म्हणून नवीकरणीयअक्षय ऊर्जेच्या जलद वाढीसह एक नवीन जागतिक ऊर्जा अर्थव्यवस्था उदयास येत आहे.

मंत्र्यांनी अक्षय ऊर्जेकडे संक्रमण करण्याच्या जगाच्या यशामध्ये सौर उर्जेच्या विकासाची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित केली. ऊर्जा संक्रमण साध्य करण्यासाठी सौर ऊर्जेचा विकास हे एक प्रमुख योगदान आहे. गेल्या दशकापासून एकत्रित जागतिक सोलर  पीव्ही  क्षमता अंदाजे 942 गीगावॉट वर पोहोचली आहे. 2021 मध्ये एकूण ~175 गीगावॉट क्षमतेच्या नवीन क्षमता स्थापनेसह सोलार पीव्ही बाजारपेठेने आपला विक्रम नोंदवण्याचा कार्यक्रम  कायम ठेवला आहे. प्रत्येक प्रगतीशील वर्षासह, जग निव्वळ शून्य उत्सर्जनाकडे वाटचाल करत असताना सौर ऊर्जा अधिक प्रबळ नवीकरणीय ऊर्जा निर्मिती तंत्रज्ञान बनत आहे.

सौर ऊर्जेची ही वाढ चक्रवाढीने होईल, अशी  अपेक्षा आहे, असे  निरीक्षण  नोंदवून मंत्री आर.के. सिंह म्हणाले कीसौर पीव्ही तंत्रज्ञान अधिक वेगाने वाढते आहे.   "सौर पीव्ही,कृषी पीव्ही आणि लवचिक आणि पृष्ठभागावरील  एकात्मिक सौर घटकांच्या   उत्पादनाचा  वापर, अंमलबजावणी, करण्‍यासाठी  सौर पीव्ही तंत्रज्ञानामुळे  नवीन मार्ग खुले होत  आहेत."

यावेळी मंत्री म्हणाले की, आयएसए जागतिक सौर ऊर्जा संक्रमणासाठी अथक प्रयत्न करत आहे. बँकेकडून वित्तपुरवठा  करण्यायोग्य सौर प्रकल्पांच्या विकासासाठी प्रयत्न सुरू आहेत, तसेच  सौर वाहनांना  वित्तपुरवठा करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी ‘सौर वित्त सुविधा उपक्रमाने   योगदानाबद्दल त्यांनी यावेळी सांगितले.  उत्पादक, पुरवठादार आणि गुंतवणूकदारांना प्रवेश देण्यासाठी सौर क्षेत्रातील  स्टार्टअप्सना हाताशी  मदत करण्यासाठी ‘सोलारएक्स ग्रँड चॅलेंज’स्टार-सी म्हणजेच ‘सोलर टेक्नॉलॉजी ऍप्लिकेशन रिसोर्स सेंटर्स’, प्रशिक्षण केंद्रे आणि चाचणीसाठी उत्कृष्टता केंद्र म्हणून काम करण्यासाठी, तपशील आणि मानकांचा विकास करण्यासाठी आणि सौर ऊर्जा प्रकल्पांवर सरकार आणि खाजगी क्षेत्रांना मदत करण्यासाठी माहिती केंद्र म्हणून काम करण्यासाठी, काम सुरू आहे. वैश्विक स्तरावर ‘वन सन, वन वर्ल्ड, वन ग्रीड’ उपक्रमाचे उद्दिष्ट साध्‍य करण्‍यासाठी काम सुरू आहे.

आंतरराष्ट्रीय सौर सहकार्य आणि त्याच्या सदस्य देशांना योगदान देण्यासाठी अमर्याद संधी आहेत, हे नमूद करत, ऊर्जामंत्री आणि आयएसएचे अध्यक्ष आर के सिंह म्हणाले की ही संघटना, अधिक हरित आणि अधिक शाश्वत जगासाठी आपले लक्षणीय योगदान देणे सुरूच ठेवेल आणि त्यासाठी विविध क्षेत्रे, जसे की कृषी, आरोग्यव्यवस्था, वाहतूक, बॅटरी साठवणूक, हिटिंग अँड कूलिंग तसेच हरित हायड्रोजन अशा क्षेत्रात आपल्या नऊ कार्यक्रमांच्या द्वारे सौर उर्जेचा वापर सुरु ठेवेल.

आज पर्यावरणासमोर असलेली आव्हाने, अधिकाधिक जलद गतीने अक्राळविक्राळ स्वरूपात पुढे येत असून, त्यांच्यावर मात करण्यासाठी मानवजातीकडे अत्यंत मर्यादित वेळ आहे, असे सांगत सिंह पुढे म्हणाले आणि या आव्हानांवर आपण तोपर्यंत मात करु शकत नाही, जोपर्यंत आपण सर्वाधिक अविकसित देशांना स्वच्छ ऊर्जा उपलब्ध करुन देत नाही, ऊर्जा संक्रमणासाठी अशा देशांना मदत करत नाही. ही गरज आहे, असे तर कित्येक दशकांपूर्वीच लक्षात आले होते, मात्र, त्यानंतरही काही ठोस, निर्णायक पावले उचलली गेली नाहीत. आज आपल्याला नेट झीरो म्हणजे संपूर्ण जगाच्या  शून्य कार्बन उत्सर्जनाचे लक्ष्य साध्य करायचे असेल, तर केवळ काही देश नेट झीरो होऊन, ते साध्य करता येणार नाही. आता आपल्याला आपल्या सदसद्विवेकबुद्धीला साद घालण्याची गरज आहे, की आपण हे लक्ष्य साध्य करण्यासाठी पुरेसे प्रयत्न करतो आहोत की नाही. असे ते पुढे म्हणाले.

सदस्य देशांना आर के सिंह यांनी सांगितले, की काही हरित निधी जगभरात उभा केला जात असला, तरी, आयएसए ला हा हरित निधी काही आफ्रिकी देशांकडे वळवावा लागेल आणि तेही अत्यंत सार्वजनिक पद्धतीने. त्याशिवाय हरित निधीतील योगदान वाढवण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

यासाठी आयएसए चे सदस्य देश जी भूमिका पार पाडत आहेत, त्याबद्दल त्यांनी त्यांचे अभिनंदन केले. आपण ऊर्जा संक्रमण सुरूच ठेवले असूण, आयएसएनेही या दिशेने कृती सुरु केली आहे. येत्या काळात, या क्षेत्रात अधिकाधिक प्रकल्प येतील, आणि अधिकाधिक लोकांना वीज मिळेल, त्याशिवाय, स्वच्छ ऊर्जा न मिळणाऱ्या लोकांची संख्या कमी होत जाईल असा विश्वास सिंह यांनी व्यक्त केला.

सौर ऊर्जा क्षेत्रात जागतिक गुंतवणूक वाढवण्याची गरज : फ्रांस

क्रायसॉला झाचारोपौलो, विकास राज्यमंत्री, फ्रँकोफोनी आणि आंतरराष्ट्रीय भागीदारी आणि आंतरराष्ट्रीय सौर आघाडी असेंब्लीच्या सह-अध्यक्ष, या कार्यक्रमात आभासी पद्धतीने सहभागी झाल्या होत्या. आयएसए ही जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त, पूर्ण क्षमतेची आंतरराष्ट्रीय संस्था बनली आहे, याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

भारताच्या जी-20 अध्यक्षपदाचीही त्यांनी प्रशंसा केली तसेच नव्या जागतिक वित्तीय करारात भारताच्या सक्रिय सहभागाबद्दल आभार मानले. आज अक्षय ऊर्जेची सर्वाधिक गरज आहे, असे सांगत, हळूहळू आपल्याला जीवाश्म इंधन टप्प्याटप्याने कमी करावे लागेल आणि अक्षय ऊर्जेचे प्रमाण सगळीकडे वाढवावे लागेल, असे मत फ्रांसने मांडले. कॉप28 यशस्वी करण्यासाठी, आयएसए चा सहभाग अत्यंत महत्वाचा आहे, असेही त्यांनी सांगितले. क्षमता बांधणी आणि सौर ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्याला प्राधान्य देण्याच्या आयएसए च्या भूमिकेला फ्रांसचा पाठिंबा असल्याचेही त्या म्हणाल्या.

सह-अध्यक्षांचे संपूर्ण भाषण इथे बघता येईल.

नवीन आणि अक्षय ऊर्जा सचिव, भूपिंदर भल्ला हे ही या बैठकीत सहभागी झाले होते.

 

  S.Patil/Suvarna/Radhika/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1930539) Visitor Counter : 182