पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
मेरी लाईफ अॅपमध्ये मोठ्या प्रमाणातील लोकसहभागाची भूपेंद्र यादव यांनी केली प्रशंसा, ‘मिशन लाईफ’ ला एक लोकचळवळ म्हणून पुढे नेण्याची प्रत्येकाची जबाबदारी म्हणजे पर्यावरणविषयक भान असल्यावर दिला भर
जागतिक पर्यावरण दिनाच्या पूर्वसंध्येला केले पुरस्कारांचे वितरण
Posted On:
04 JUN 2023 9:16PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 जून 2023
केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी आज जागतिक पर्यावरण दिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात आलेल्या ‘कचऱ्यापासून संपत्ती हॅकॅथॉन, धरती करे पुकार, युवा परिसंवाद आणि आंतरशालेय चित्रकला स्पर्धेच्या पुरस्कारांचे वितरण केले. यावेळी राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे आणि वरिष्ठ सरकारी अधिकारी उपस्थित होते.
या कार्यक्रमात बोलताना यादव यांनी सरकारच्या मेरी लाईफ या उपक्रमाच्या अॅपमध्ये 1 कोटी 90 लाख सहभागींची आणि 87 लाख कार्यक्रमांची नोंदणी होऊन पर्यावरणविषयक भान निर्माण करण्यामध्ये एक ऐतिहासिक कामगिरी झाल्याबद्दल या उपक्रमाचे अभिनंदन केले. या स्पर्धांमधील विजेत्यांचेच नव्हे तर त्यामध्ये सहभागी होणाऱ्यांचे देखील अभिनंदन केले पाहिजे कारण त्यांनी पर्यावरण रक्षणाबाबत आपल्या बांधिलकीचे दर्शन घडवले आहे, असे ते म्हणाले.
साधनसंपत्तीचा विवेकी वापर हे एक सर्वात मोठे आव्हान असल्याचे सांगत त्यांनी असे मत व्यक्त केले की या ग्रहावर साधनसंपत्तीची उपलब्धता मर्यादित आहे आणि जागतिक उष्मा, जैवविविधतेचा ऱ्हास आणि प्रदूषण यांना तोंड देण्यासाठी पर्यावरण स्नेही जीवनशैली हाच मार्ग आहे. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेले जागतिक सौर आघाडी, आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधांसाठी आघाडी यांसारख्या विविध उपक्रमांचा केंद्रीय पर्यावरणमंत्र्यांनी माहिती दिली. या उपक्रमांमुळे राष्ट्रीय उद्दिष्टांची पूर्तता निर्धारित कालमर्यादेच्या खूपच आधी पूर्ण करणे भारताला शक्य झाले आहे, असे त्यांनी सांगितले.
आपत्तींची तीव्रता कमी करण्याच्या उपाययोजना हा सरकारच्या धोरणाचा भाग आहे तर दुसरीकडे अंगिकार करण्याच्या उपाययोजना हा सामाजिक वर्तनाचा भाग आहे, पर्यावरणविषयक जागरुकता ही प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि ‘मिशन लाईफ’ला एक लोकचळवळ बनवण्यासाठी पुढे घेऊन जाण्याची गरज आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
सीपीसीबीने बॅटरी आणि इलेक्ट्रॉनिक कचरा व्यवस्थापनासाठी नवोन्मेषी उपाययोजना पुढे घेऊन येण्यासाठी आयोजित केलेल्या नॅशनल आयडिएशन हॅकॅथॉनच्या विजेत्यांना या पुरस्कार सोहळ्यात पुरस्कार देण्यात आले. यूएनईपी इंडियाच्या सहकार्याने ‘नॅशनल म्युझियम ऑफ नॅशनल हिस्टरी’ने स्वच्छ आणि निरोगी महासागर या विषयावर 8 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या आंतरशालेय चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना तसेच भारतीय वन व्यवस्थापन संस्थेने आयोजित केलेल्या युवा परिसंवादातील 5 युवा मानबिंदू पुरस्कार विजेत्यांना देखील पुरस्कार देण्यात आले.
राष्ट्रीय स्तरावरील पथनाट्य स्पर्धा“ धरती करे पुकार”च्या विजेत्या किकानी विद्या मंदिर, कोइम्बतूरच्या विद्यार्थ्यांनी ‘लाईफ’ या संकल्पनेच्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या उपाययोजनांवर भर देत व्यासपीठावर सादरीकरण केले आणि त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित देखील करण्यात आले. या स्पर्धेत 6 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी झाले होते आणि ‘नॅशनल म्युझियम ऑफ नॅशनल हिस्टरी’ने या स्पर्धेचे आयोजन केले होते.
* * *
N.Chitale/S.Patil/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1929786)
Visitor Counter : 146