ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

जागतिक बाजारात खाद्यतेलाच्या दरात घसरण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने खाद्यतेलाच्या दरात आणखी कपात करण्याबाबत चर्चा करण्यासाठी आघाडीच्या तेल उत्पादक संघटनांसोबत घेतली दुसरी बैठक


खाद्यतेलाची एमआरपी आणखी कमी करण्याची उद्योगांची तयारी ; येत्या काही दिवसांत ग्राहकांसाठी खाद्य तेलाचे दर कमी होण्याची अपेक्षा

खाद्यतेलाचे दर कमी झाल्याने महागाई आणखी कमी होणे अपेक्षित

Posted On: 02 JUN 2023 7:49PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 2 जून 2023

जागतिक  बाजारात खाद्यतेलाच्या दरांमध्ये सातत्याने  घसरण होत असताना, देशांतर्गत दरातील  घसरणीचा कल कायम ठेवत  खाद्यतेलाच्या किरकोळ दरात  आणखी कपात करण्याबाबत चर्चा करण्यासाठी ,अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाचे सचिव संजीव चोप्रा यांनी  नवी दिल्ली येथे आज सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्शन असोसिएशन ऑफ इंडिया (एसईएआय ) आणि  भारतीय वनस्पती तेल  उत्पादक संस्था (आयव्हीपीए)  इत्यादी  प्रमुख उद्योग प्रतिनिधींसोबत दुसरी बैठक बोलावली होती .अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने उद्योग प्रतिनिधींसोबत महिनाभरात बोलावलेली ही दुसरी बैठक आहे.

गेल्या दोन महिन्यांत विविध खाद्यतेलाचे जागतिक दर प्रति टन 150-200 डॉलर्सने  कमी झाल्याची माहिती उद्योग प्रतिनिधींनी या बैठकीत  दिली. खाद्यतेल उद्योगांनी खाद्यतेलाची  कमाल किरकोळ किंमत,एमआरपी कमी केली आहे आणि लवकरच आणखी कमी होईल, अशी माहिती संबंधीत उद्योगांनी दिली. मात्र किरकोळ बाजारांमध्ये त्याचा परिणाम जाणवण्यासाठी अजून थोडा वेळ लागेल आणि किरकोळ दर  लवकरच आणखी खाली येण्याची अपेक्षा आहे.

आयात केलेल्या खाद्यतेलाच्या आंतरराष्ट्रीय दरात सातत्याने घसरण सुरू असून त्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेतील दरही  त्या प्रमाणात कमी होतील याची खातरजमा खाद्यतेल उद्योगाने करणे आवश्यक आहे, यावर आज झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली.

खाद्यतेलाच्या दरातील ही घसरण अंतिम ग्राहकांपर्यंत त्वरीत पोहोचली पाहिजे आणि यासाठी विलंब होऊ नये. अग्रगण्य खाद्यतेल संघटनांना त्यांच्या सदस्यांसमोर  हा मुद्दा ताबडतोब मांडण्याचा आणि तात्काळ प्रभावाने प्रमुख खाद्यतेलाची एमआरपी 8-12 रुपये प्रति लीटरने कमी केली जाईल हे सुनिश्चित करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तेल उत्पादक आणि तेल  शुद्धीकरण उद्योगांकडून  वितरकांसाठी असलेले  विक्री  दरही  तात्काळ प्रभावाने कमी करणे आवश्यक आहे ,जेणेकरून ग्राहकांपर्यंत पोहोचताना तेलांच्या दरातील घसरणीचा लाभ कोणत्याही प्रकारे कमी होऊ नये असे देखील सांगण्यात आले आहे. उत्पादक/तेल शुद्धीकरण उद्योगांकडून जेव्हा जेव्हा वितरकांसाठीच्या विक्री दरामध्ये  कपात केली जाते तेव्हा त्याचा फायदा उद्योगांनी ग्राहकांपर्यंत पोहोचवला पाहिजे आणि या विभागाला या संदर्भात   नियमितपणे माहिती दिली जावी, यावरही  या बैठकीत भर देण्यात आला. ज्या खाद्यतेल कंपन्यांनी त्यांचे दर  कमी केलेले  नाहीत आणि त्यांची एमआरपी  इतर ब्रँडपेक्षा जास्त आहे त्यांनाही त्यांचे  दर कमी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

या बैठकीत खाद्यतेलाच्या दरांचे  माहिती संकलन आणि पॅकेजिंग यांसारख्या इतर मुद्द्यांवरही चर्चा करण्यात आली.

खाद्यतेलाच्या दरात सातत्याने घसरण होत असल्याने  आणि खाद्यतेल कंपन्यांकडूनही तेलाच्या दरात  आणखी घट होण्याची शक्यता असल्याने भारतीय  ग्राहकांसाठी  खाद्य तेलाचे दर  कमी होण्याची अपेक्षा  आहे. खाद्यतेलाच्या घसरलेल्या दरांमुळे  चलनवाढीची   भीती कमी होण्यास मदत होईल.

केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण विभाग देशातील खाद्यतेलांच्या दरांवर बारकाईने लक्ष ठेवत वेळोवेळी या दरांचा आढावा घेत असतो. मानवी आहाराचा एक महत्त्वाचा भाग असलेल्या या  खाद्यतेलांचे दर सर्वसामान्य लोकांच्या आवाक्यात असणे सुनिश्चित करण्यासाठी ज्या विषयांमध्ये आवश्यक वाटेल तेथे हस्तक्षेप करून हा विभाग तातडीने पावले उचलतो.

 N.Chitale/S.Chavan/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 1929488) Visitor Counter : 162


Read this release in: English , Urdu , Hindi , Telugu