गृह मंत्रालय
केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी चार दिवसीय मणिपूर दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी इंफाळ येथे पत्रकार परिषदेला केले संबोधित
मणिपूर हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांप्रति अमित शाह यांनी मोदी सरकारच्या वतीने व्यक्त केली सहवेदना, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे, शांतता राखण्याचे आणि सौहार्द वाढवण्याचे सर्व घटकांना केले आवाहन
मणिपूर हिंसाचाराच्या चौकशीसाठी उच्च न्यायालयाच्या निवृत्त मुख्य न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली स्थापन केला जाणार न्यायिक आयोग
मणिपूरच्या राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली सर्व घटकांच्या प्रतिनिधींचा समावेश असणारी एक शांतता समितीही स्थापन केली जाणार
Posted On:
01 JUN 2023 7:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 जून 2023
केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी चार दिवसीय मणिपूर दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी आज इंफाळ येथे पत्रकार परिषदेला संबोधित केले. अमित शाह यांनी हिंसाचारग्रस्त मणिपूरमधील सर्व घटकांना शांतता राखण्याचे, संवाद साधण्याचे आणि सौहार्द वाढवण्याचे आवाहन केले.मणिपूरच्या जनतेने अफवांकडे लक्ष देऊ नये आणि शांतता राखावी असे आवाहन त्यांनी केले. मणिपूर हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांप्रति गृहमंत्र्यांनी मोदी सरकारच्या वतीने सहवेदना व्यक्त केली.
मणिपूर हिंसाचाराच्या चौकशीसाठी उच्च न्यायालयाच्या निवृत्त मुख्य न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली न्यायिक आयोगाची स्थापना केली जाईल. मणिपूरच्या राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली सर्व घटकांच्या प्रतिनिधींचा समावेश असणारी एक शांतता समितीही स्थापन केली जाईल असे केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री यावेळी म्हणाले.
हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसाला भारत सरकार आणि मणिपूर सरकारच्या मदत आणि पुनर्वसन पॅकेज अंतर्गत, प्रत्येकी पाच लाख रुपये दिले जातील. ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात डीबीटी द्वारे देण्यात येईल. असे अमित शाहम्हणाले. मणिपूरमध्ये सुरक्षा राखण्यासाठी कार्यरत असलेल्या सर्व एजन्सींमध्ये चांगल्या आणि निःपक्षपाती समन्वयासाठी सुरक्षा सल्लागार कुलदीप सिंग यांच्या अध्यक्षतेखाली इंटर-एजन्सी युनिफाइड कमांडची स्थापना केली जाईल. सर्व नोंदणीकृत प्रकरणांपैकी 5 नोंद घेतलेल्या प्रकरणांसह 6 प्रकरणे आणि सामान्य कटाच्या एका प्रकरणाची सीबीआयच्या विशेष पथकाद्वारे चौकशी केली जाईल. कोणताही पक्षपात आणि भेदभाव न करता हिंसाचाराच्या कारणाचा तपास केला जाईल आणि अशा घटना रोखण्यासाठी दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.
मणिपूरला जीवनावश्यक वस्तूंचा अखंड पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी, भारत सरकारने निर्धारित कोट्यापेक्षा अधिक 30,000 मेट्रिक टन तांदूळ पाठवला आहे. याशिवाय गॅस सिलिंडर, पेट्रोल, भाजीपाला पुरवठ्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. खोंगसांग रेल्वे स्थानकावर तात्पुरता फलाट उभारून देशाच्या इतर भागातून मणिपूरला आवश्यक वस्तूंचा पुरवठा सुनिश्चित केला जाईल असे केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितले. चुराचंदपूर, मोरेह आणि कांगपोकपी येथून तात्पुरती हेलिकॉप्टर सुविधा सुरू केली जात आहे. ती विमानतळ आणि दुर्गम ठिकाणी प्रति व्यक्ती 2000 रुपये शुल्कासह वाहतूक सुविधा प्रदान करेल. या सेवेचा उर्वरित खर्च भारत सरकार आणि मणिपूर सरकार देणार असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, भारत सरकारने स्थापन केलेल्या 8 वैद्यकीय पथकांपैकी 3 पथके मणिपूरला पोहोचली आहेत. 5 पथके लवकरच पोहोचतील. ही पथके मोरेह, चुराचंदपूर आणि कांगपोकपी भागात आरोग्य सुविधा पुरवणार आहेत.
मणिपूरच्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा आणि शिक्षण व्यवस्था कोणत्याही व्यत्ययाशिवाय सुरू राहावी यासाठी, भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाचे अधिकारी, मणिपूर शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांसह, ऑनलाइन शिक्षण, परीक्षा आणि दूरस्थ शिक्षणासाठी व्यवस्था करण्याच्या दृष्टीने एक ठोस योजना तयार करत आहेत जी 2 दिवसात तयार होईल, असे अमित शाह यांनी सांगितले. चुराचंदपूर, मोरेह आणि कंगपोकपी येथून मणिपूर उच्च न्यायालयासमोर आभासी माध्यमातून हजर राहण्याची सोय करण्यासाठी आवश्यक व्यवस्था करण्यात येत आहे, असे ते म्हणाले. मणिपूरमधील सर्व यंत्रणांचे कार्य सुरळीतपणे पार पाडण्यासाठी,केंद्रीय गृह मंत्रालयाचे एक सहसचिव दर्जाचे अधिकारी आणि विविध मंत्रालयांचे पाच संचालक दर्जाचे अधिकारी राज्यात उपस्थित राहणार आहेत,असे शाह यांनी सांगितले.
म्यानमार आणि मणिपूर सीमेवरील 10 किलोमीटरच्या सीमेवर कुंपण घालण्यासाठीच्या चाचणीचे काम भारत सरकारने पूर्ण केले आहे, तर 80 किलोमीटरच्या कुंपणाच्या कामाची निविदा प्रक्रियाही पूर्ण झाली असून उर्वरित सीमा भागात कुंपण घालण्यासाठी सर्वेक्षण सुरू आहे, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्र्यांनी दिली. . या भागात कोणीही हिंचाचार भडकवू नये यासाठी शेजारील देशातून येणाऱ्या लोकांचे बायोमेट्रिक आणि डोळ्यांचे ठसेही घेतले जात आहेत, असे त्यांनी सांगितले.
सस्पेंशन ऑफ ऑपरेशन कराराच्या कोणत्याही प्रकारच्या उल्लंघनासाठी कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल आणि हे कराराचे उल्लंघन मानले जाईल असे केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितले.करारातील सर्व अटी संबंधित पक्षांनी काटेकोरपणे पाळल्या पाहिजेत, असे ते म्हणाले.पोलिसांच्या शोधमोहीमेमध्ये शस्त्रे आढळून आलेल्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याने लोकांनी आपली शस्त्रे पोलिसांच्या स्वाधीन करावीतअसे शाह यांनी सांगितले.
शांतता प्रस्थापित करण्याची आणि समाजात सौहार्द वाढवण्याची हीच वेळ आहे असे आवाहन अमित शाह यांनी सर्व नागरी संघटनांना केले. प्रत्येकाने शांतता प्रस्थापित करण्यासाठी तसेच चर्चेसाठी आणि सौहार्दाचे वातावरण तयार करण्यासाठी काम केले पाहिजे, असे ते म्हणाले.
मणिपूरमध्ये 29 एप्रिल रोजी दोन गटांमध्ये वांशिक संघर्ष आणि हिंसाचार सुरू झाला, असे केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितले . गेल्या 6 वर्षांपासून मणिपूर हे बंद, नाकेबंदी, संचारबंदी आणि हिंसाचारापासून मुक्त आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांच्या नेतृत्वाखाली मणिपूरच्या डबल इंजिन सरकारने विकासाच्या सर्व मापदंडांमध्ये राज्यात अभूतपूर्व प्रगती साधली आहे, असे त्यांनी सांगितले. मणिपूरच्या इतिहासात गेली 6 वर्षे विकासाची आणि शांततेची वर्षे आहेत, या प्रदेशात केंद्रीय संस्था सुरु करणे , पायाभूत सुविधा बळकट करणे, औद्योगिक गुंतवणूक आणणे, शैक्षणिक संस्था सुरळीतपणे चालवून मणिपूरला ईशान्येचे शिक्षण आणि क्रीडा केंद्र बनवणे यासह अनेक उपक्रम हाती घेण्यात आले आहेत, असे ते म्हणाले.
मणिपूरमधील वास्तव्यादरम्यान, त्यांनी सर्व घटकांतील लोकांची भेट घेतली, तात्पुरत्या मदत शिबिरांना भेट दिली तसेच इम्फाळ, मोरेह , चुराचंदपूर आणि कंगपोकपी येथे शिष्टमंडळे आणि पीडितांशी संवाद साधला, असे शाह यांनी सांगितले. त्यांनी राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि महिला संघटनांसोबतही बैठक घेतली. मैतेई समुदायाच्या सुमारे 22 नागरी संस्था संघटना आणि कुकी समुदायाच्या सुमारे 25 नागरी संस्था संघटनां सोबत बैठक घेतल्याचे शाह यांनी सांगितले. गेल्या 2 दिवसांत त्यांनी विचारवंत, प्राध्यापक, निवृत्त अधिकारी आणि समाजातील प्रत्येक घटकातील लोकांशी शांतता प्रस्थापित करण्याच्या उपायांवर चर्चा केली.11 राजकीय पक्षांशीही चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय, खेळाडू आणि निवडून आलेल्या सर्वपक्षीय प्रतिनिधींशी चर्चा करण्यात आली, असे ते म्हणाले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या 4 दिवसीय मणिपूर दौऱ्याची तपशीलवार माहितीसाठी येथे क्लिक करा.
S.Patil/Vinayak/Sonal C/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1929145)
Visitor Counter : 155