रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

रस्ते उभारणी प्रकल्पातील विलंब कमी करणे तसेच बांधकामाचा खर्च कमी करणे, पर्यावरणदृष्ट्या शाश्वत साहित्याचा वापर करणे तसेच रस्त्यांच्या सुयोग्य संरेखनाच्या अंमलबजावणीला प्रोत्साहन यासाठी तपशीलवार प्रकल्प अहवालाची (डीपीआर)बिनचूक आखणी आणि व्यावहारिक पडताळणी यांच्या महत्त्वावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिला भर

Posted On: 30 MAY 2023 8:25PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 30 मे 2023

 

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज नवी दिल्ली येथील एनएचएआय अर्थात भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीचे अध्यक्षपद भूषवले. रस्ते उभारणीतील कार्यक्षमता वाढवणे, समस्या दूर करणे तसेच अभिनव तंत्रज्ञानाचा स्वीकार करणे या विषयांवर बैठकीत चर्चा झाली.केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग तसेच नागरी हवाई वाहतूक  राज्यमंत्री, जनरल (डीआर) व्ही.के.सिंह (निवृत्त), केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय सचिव अनुराग जैन, एनएचएआयचे अध्यक्ष संतोष कुमार यादव यांच्यासह हे  मंत्रालय तसेच प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.

या कार्यक्रमादरम्यान राष्ट्रीय महामार्गांची कार्यक्षमता वाढविण्यावर तसेच प्रवाशांना ‘प्रवास करण्याची सुलभता’ प्रदान करण्यावर केंद्रित दोन मोबाईल अॅपची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली. यामध्ये तक्रार निवारण यंत्रणेचा समावेश असलेले ‘राजमार्गयात्रा’ हे लोककेंद्री अॅप तसेच राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प अंमलबजावणीमध्ये कार्यस्थळावर लागणाऱ्या महत्त्वाच्या गरजांची पूर्तता सुलभ करणारे ‘एनएचएआय ओएनई’हे अॅप यांचा समावेश आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या कार्यक्रमात, एनएचएआयच्या पहिल्यावहिल्या “आर्थिक वर्ष 2021-22 साठीचा   शाश्वतता अहवाल”जारी केला. या अहवालात एनएचएआयची प्रशासकीय यंत्रणा, परीचालनाच्या पद्धती,त्यांचे भागधारक, पर्यावरण तसेच सामाजिक दायित्व उपक्रम यांचा समावेश आहे. तसेच, देशातील राष्ट्रीय महामार्गांचे जाळे उभारण्याचा इतिहास सांगणाऱ्या ‘भारतातील रस्ते विकास’ यावर आधारित पुस्तकाचे देखील प्रकाशन केले.

यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना केंद्रीय मंत्री गडकरी यांनी रस्ते उभारणी प्रकल्पातील विलंब कमी करणे तसेच बांधकामाचा खर्च कमी करणे, पर्यावरणदृष्ट्या शाश्वत साहित्याचा वापर करणे तसेच रस्त्यांच्या सुयोग्य संरेखनाच्या अंमलबजावणीला प्रोत्साहन  या साठी  तपशीलवार प्रकल्प अहवालाची (डीपीआर)बिनचूक आखणी  आणि व्यावहारिक पडताळणी यांच्या महत्त्वावर भर दिला आहे.

नागरिक-केंद्री सेवा पुरविण्यावर भर देतानाच, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्ग विकासाच्या विविध पैलूंबाबत आपला दृष्टीकोन  मांडला तसेच त्यांनी देशभरात जागतिक दर्जाचे राष्ट्रीय महामार्ग जाळे उभारण्यासाठी एनएचएआयच्या अधिकाऱ्यांना देखील प्रोत्साहित केले.

 

* * *

N.Chitale/S.Chitnis/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1928397) Visitor Counter : 146