रसायन आणि खते मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

हिंदी ही सरकारी कारभारामध्ये आपल्या स्वाभिमानाचे प्रतीक ठरणारी तसेच ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’च्या उद्दिष्टाजवळ नेणारी भाषा होऊ शकते: केंद्रीय मंत्री डॉ.मनसुख मांडवीय


सध्याचे सरकार हिंदी भाषेच्या वापरात सुधारणा, कार्यकुशलता आणि परिवर्तन या तत्वांचा सातत्याने अवलंब करत आहे: केंद्रीय मंत्री डॉ.मनसुख मांडवीय

Posted On: 30 MAY 2023 4:55PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 30 मे 2023

 

“हिंदी भाषेच्या वापराला प्रोत्साहन आणि हिंदीचा वाढीव प्रमाणात वापर आपल्याला पंतप्रधानांच्या ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ संकल्पना साकार करण्याच्या आणखी जवळ घेऊन जाते,” असे केंद्रीय रसायने आणि खते मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी म्हटले आहे. केंद्रीय रसायने आणि खते मंत्रालयाच्या हिंदीविषयक सल्लागार समितीच्या नवी दिल्ली येथे झालेल्या बैठकीत ते आज बोलत होते. सरकारच्या अधिकृत कामामध्ये हिंदी भाषेच्या वापराला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारच्या प्रत्येक मंत्रालयाच्या अंतर्गत हिंदीविषयक सल्लागार समितीची स्थापना करण्यात आली आहे. एका वर्षात या समितीच्या किमान दोन बैठका आयोजित करण्यास सरकारी आदेशात सांगितले आहे. मंत्रालयाच्या कारभारात अधिकृत भाषा म्हणून हिंदी भाषेच्या वापराला प्रोत्साहन देणे आणि याची अंमलबजावणी अधिक विस्तृत प्रमाणात होण्यासाठी आवश्यक मौल्यवान शिफारसी करणे हा या समितीच्या स्थापनेमागील प्राथमिक उद्देश आहे.

या बैठकीतील भाषणाची सुरुवात करताना केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे, देशाच्या वेगवान प्रगतीसाठी राष्ट्रीय व्यवहारामध्ये हिंदीचा वापर करण्याचे महत्त्व ठळकपणे सांगणारे प्रख्यात उद्गार नमूद केले.

सर्व मंत्रालयांनी त्यांच्या अधिकृत व्यवहारांमध्ये हिंदीचा वापर करण्याच्या गरजेवर भर देत केंद्रीय मंत्री म्हणाले, “अधिकृत भाषा म्हणून हिंदीचा प्रसार करण्यासाठी तसेच वार्षिक कार्यक्रमात निश्चित केलेली उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी केंद्रीय गृह व्यवहार मंत्रालयाच्या अधिकृत भाषा विभागाने दिलेल्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी  कटिबद्ध राहण्याचा दृढनिश्चय केंद्रीय रसायने आणि खते मंत्रालयाने केला आहे. आपले मंत्रालय हिंदी भाषेला आपल्या राष्ट्रीय आणि सांस्कृतिक एकतेचे प्रतीक आणि आपल्या सामुहिक राष्ट्रवादाचे प्रतिबिंब मानते.”

ते पुढे म्हणाले, “आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या द्रष्ट्या  नेतृत्वाखाली, सध्याचे सरकार हिंदी भाषेच्या वापरात सुधारणा, कार्यकुशलता आणि परिवर्तन या तत्वांचा सातत्याने अवलंब करत आहे. सरकारी व्यवहारात हिंदी भाषेचा वापर वाढवण्याच्या दिशेने केंद्र सरकारने अत्यंत लक्षणीय प्रगती केल्यामुळे हे तत्वज्ञान हिंदीच्या क्षेत्रात वाढ करणारे झाले आहे. स्वतः पंतप्रधान मोदी देखील आंतरराष्ट्रीय मंचावरुन बोलताना संवाद साधण्याचे माध्यम म्हणून हिंदी भाषेचाच वापर करतात. अशा कार्यक्रमांमध्ये ते सर्व भारतीय भाषांशी सुसंवाद साधणाऱ्या सोप्या आणि आकलनीय भाषेच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचे प्रतिनिधित्व करण्याचा आग्रह धरतात.”

हिंदीचा वापर करण्यात आघाडीवर राहण्याच्या महत्त्वाबाबत बोलताना त्यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि संसदीय अधिकृत भाषा समितीचे अध्यक्ष असलेले अमित शाह यांनी त्या तत्वाला कशा प्रकारे मूर्त रूप दिले आहे हे सांगितले. केंद्रीय मंत्री मांडवीय म्हणाले, “केद्रीय मंत्री अमित शाह हे स्वतःच हिंदीमधले उत्तम वक्ते असून त्यांच्या मंत्रालयाचे सर्व कामकाज हिंदी भाषेतून केले जाईल याची दक्षता ते घेतात.”

केंद्रीय रसायने आणि खते मंत्रालयातील सर्व विभाग, सरकारी उपक्रम आणि कार्यालयांमध्ये अधिकृत भाषा विषयक धोरणाची अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी सशक्त यंत्रणा स्थापन केली आहे. प्रोत्साहन देण्याची एक पद्धत म्हणून केंद्रीय मंत्र्यांनी हिंदीचा अधिकृत भाषा म्हणून प्रसार आणि वापर करणाऱ्या विविध उपक्रमांना त्यांच्या या कार्याचा सन्मान म्हणून या कार्यक्रमात गौरवपर प्रशस्तीपत्र तसेच राजभाषा ढाल प्रदान केली.

 

* * *

N.Chitale/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1928322) Visitor Counter : 128