आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
76 वी जागतिक आरोग्य सभा
क्षयभाराचा अंदाज घेण्यासाठी स्वतःची यंत्रणा विकसित करणारा भारत हा जगातील एकमेव देश : डॉ.मनसुख मांडविया
जागतिक शाश्वत विकास उद्दिष्टपूर्तीच्या पाच वर्षे आधीच म्हणजे 2025 पर्यंत देशातून क्षयरोग निर्मूलन करण्यासाठी भारत प्रयत्नशील : डॉ मांडविया
क्षयरुग्णांना त्यांच्या उपचाराच्या संपूर्ण प्रवासात सहाय्य करणे हे क्षयरोगमुक्त भारत अभियानाचे (पीएमटीबीएमबीए) उद्दिष्ट
Posted On:
25 MAY 2023 4:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 मे 2023
जिनिव्हा येथे आयोजित 76 व्या जागतिक आरोग्य सभेदरम्यान क्षयरोगावरील (टीबी) क्वाड प्लस संबंधित कार्यक्रमात केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी मुख्य भाषण केले. या कार्यक्रमात क्वाड प्लस देशांतील मान्यवर प्रतिनिधींचा सहभाग होता यामुळे क्षयरोगा सारख्या जागतिक आरोग्य आव्हानाचा सामना करण्याच्या वचनबद्धतेला बळकटी मिळाली.
“या वर्षी, भारतात आयोजित केलेल्या वन वर्ल्ड टीबी संमेलनामध्ये जागतिक क्षय दिन पाळण्यात आला. एक जग, एक आरोग्य या तत्त्वावर पंतप्रधानांचा ठाम विश्वास असून त्यावर यावेळी प्रकाश टाकण्यात आला, असे सांगत डॉ. मांडवीया यांनी क्षयरोग निर्मूलनाच्या दिशेने भारताचा सक्रिय प्रतिसाद अधोरेखित केला. क्षय भाराचा अंदाज घेण्यासाठी स्वतःची यंत्रणा विकसित करणारा भारत हा जगातील एकमेव देश आहे , याकडे त्यांनी लक्ष वेधले. स्थानिक पुराव्यांवर आधारित गणितीय मॉडेल वापरून, जागतिक आरोग्य संघटनेच्या वार्षिक अहवालाच्या आधी या आजाराचा नेमका रुग्णभार किती आहे हे भारत निश्चित करू शकतो, असे ते म्हणाले.
क्षयरोग निर्मूलनाच्या दिशेने झालेल्या सामूहिक प्रगतीचे मूल्यमापन करण्याची संधी म्हणून, सप्टेंबरमध्ये नियोजित क्षयरोगावरील आगामी संयुक्त राष्ट्र उच्च-स्तरीय बैठकीच्या (युएनएचएलएम ) महत्वावर डॉ. मांडविया यांनी आपल्या भाषणात भर दिला. निर्धारित जागतिक शाश्वत विकास उद्दिष्टपूर्तीच्या पाच वर्षे आधीच 2025 पर्यंत देशातून क्षयरोगाचे उच्चाटन करण्याच्या प्रयत्नात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारताच्या समर्पित प्रयत्नांची त्यांनी प्रशंसा केली.
क्षयरोग नियंत्रणासाठी भारताच्या अथक प्रयत्नांमुळे उल्लेखनीय परिणाम मिळाले आहेत. जागतिक स्तरावर क्षयप्रकरणात घट होण्याचे दहा टक्के हे प्रमाण मागे टाकत भारतात 2015 ते 2022 या कालावधीत क्षयप्रकरणा मध्ये 13% घट झाली असे डॉ. मांडविया यांनी सांगितले. याच काळात भारतातील क्षयरोग मृत्यू दर 15% ने घटला तर जागतिक स्तरावर हा मृत्युदर 5.9% घटल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. मांडविया यांनी लवकर निदान, उपचार आणि प्रतिबंधात्मक उपायांचे महत्त्व अधोरेखित केले.ज्या रुग्णापर्यंत अद्याप पोहोचू शकता आलेले नाही अशांसाठी भारताने आमच्या पंतप्रधानांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली दुर्गम भागात शेवटच्या टोकावर राहणाऱ्या रुग्णांपर्यंत निदान आणि उपचार पोहोचवले आहेत, असे ते म्हणाले.
खाजगी क्षेत्रासोबतच्या भारताच्या यशस्वी सहकार्यावरही मांडविया यांनी प्रकाश टाकला.यामुळे क्षयरुग्णांसाठी त्यांच्या पसंतीची उपचार केंद्रे, दवाखाने आणि डॉक्टरांद्वारे दर्जेदार उपचार घेणे शक्य झाले आहे. परिणामी, गेल्या नऊ वर्षांत खाजगी क्षेत्राकडून आलेल्या सूचना सातपटीने वाढल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.
क्षयरोगाकडे पूर्वग्रहदुषित नजरेने पाहण्याच्या समस्येचे निराकरण करण्याबद्दल बोलत असताना डॉ. मांडवीया यांनी भारताची अग्रगण्य सामुदायिक सहभागिता यंत्रणा, प्रधानमंत्री क्षयरोग मुक्त भारत अभियान अधोरेखित केले. माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सुरू केलेल्या या उपक्रमाचा उद्देश क्षयरुग्णांना त्यांच्या संपूर्ण उपचार प्रवासात सहाय्य करणे हा आहे. नि-क्षय मित्र किंवा दात्यांचा समावेश असलेल्या या कार्यक्रमाला भरघोस पाठिंबा मिळाला आहे, दरवर्षी अंदाजे 146 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स निधी उभारण्यासह सुमारे 78 हजार नि-क्षय मित्रांनी सुमारे एक दशलक्ष रूग्णांना मदत करण्यासाठी वचनबद्धता दर्शवली आहे.
नि-क्षय पोषण योजना सुरु करून क्षयरोगाच्या सामाजिक-आर्थिक परिणामांना तोंड देण्याच्या भारताच्या वचनबद्धतेवर डॉ. मांडविया यांनी जोर दिला.
वन वर्ल्ड टीबी संमेलनामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्षयरोगासाठी सुरु केलेल्या भारताच्या कुटुंब-केंद्रित उपचार मॉडेलबद्दल डॉ. मांडवीया यांनी यावेळी सांगितले. क्षयरोग झालेल्या एखाद्या व्यक्तीच्या पुनर्वसनामध्ये कुटुंबांची आवश्यक भूमिका यामध्ये अधोरेखित करण्यात आली आहे.
डॉ. मांडविया यांनी क्षयरोगा विरुद्धच्या लढ्यात प्रभावी लस विकसित करण्याची महत्त्वपूर्ण गरज अधोरेखित केली. 2030 पर्यंत क्षयरोगाचे उच्चाटन करण्यासाठी संयुक्त राष्ट्र उच्च स्तरीय बैठकीचे (युएनएचएल्एम ) उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, आपल्याला क्षयरोग प्रतिबंधासाठी , निदान करण्यासाठी आणि उपचार करण्यासाठी रुग्ण-केंद्रित अभिनव पध्दती शोधणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. भारत आपले अनुभव जगासोबत सामायिक करण्यासाठी आणि इतर संदर्भांमधूनही शिकण्यासाठी वचनबद्ध आहे.”, असे ते म्हणाले.
सातत्यपूर्ण प्रयत्न आणि दृढनिर्धाराने 2030 पूर्वी जगातून क्षयरोगाचे उच्चाटन केले जाऊ शकते, असा दृढ विश्वास डॉ. मांडवीया यांनी आपल्या भाषणाचा समारोप करताना व्यक्त केला.
* * *
N.Chitale/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1927195)
Visitor Counter : 147