पंतप्रधान कार्यालय

जपान, पापुआ न्यू गिनी आणि ऑस्ट्रेलिया या देशांच्या दौऱ्यावर निघण्यापूर्वी पंतप्रधानांनी दिलेले निवेदन

Posted On: 19 MAY 2023 8:49AM by PIB Mumbai

नवी दिल्ली 19 मे 2023 

जपानचे पंतप्रधान फ़ुमिओ किशिदा यांच्या आमंत्रणावरुन मी जपानच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या जी-7 शिखर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी जपानमधील हिरोशिमा येथे जाण्यासाठी निघणार आहे. भारत-जपान शिखर परिषेदच्या निमित्ताने पंतप्रधान नुकतेच भारत भेटीसाठी येऊन गेले, तेव्हा झालेल्या भेटीनंतर लगेचच पुन्हा त्यांची भेट घेणे अत्यंत आनंददायी आहे. भारताकडे या वर्षी जी-20 समूहाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी असल्यामुळे, जी-7 शिखर परिषदेतील माझी उपस्थिती अधिक अर्थपूर्ण ठरणार आहे. जगासमोर सध्या उभी असलेली आव्हाने आणि त्यांच्यावर सामूहिकपणे मात करण्याची गरज यासंदर्भात जी-7 सदस्य राष्ट्रे तसेच इतर निमंत्रित भागीदार यांच्यासोबत विचारांची देवाणघेवाण करण्यास मी उत्सुक आहे. हिरोशिमा जी-7 शिखर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी आलेल्या काही नेत्यांशी मी द्विपक्षीय बैठका देखील घेणार आहे.

जपानमधील कार्यक्रमानंतर मी पापुआ न्यू गिनी मधील पोर्ट मोरेस्बी येथे जाणार आहे. याठिकाणचा हा माझा पहिलाच दौरा आहे तसेच, कोणत्याही भारतीय पंतप्रधानाने पापुआ न्यू गिनीला भेट देण्याची ही पहिलीच वेळ असेल. तेथे आयोजित करण्यात आलेल्या हिंद-प्रशांत द्वीप सहकार्य मंचाच्या तिसऱ्या शिखर परिषदेचे (एफआयपीआयसी III) यजमानपद मी आणि पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान जेम्स मारापे संयुक्तपणे भूषविणार आहोत. या महत्त्वाच्या शिखर परिषदेला उपस्थित राहण्याचे आमंत्रण 14 प्रशांत द्वीप देशांनी (पीआयसी) स्वीकारल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. वर्ष 2014 मध्ये माझ्या फिजी भेटीच्या दरम्यान एफआयपीआयसी या मंचाची सुरुवात करण्यात आली आणि आता पीआयसी मधील नेते हवामान बदल आणि शाश्वत विकास, क्षमता बांधणी तसेच प्रशिक्षण, आरोग्य आणि स्वास्थ्य, पायाभूत सुविधा आणि आर्थिक विकास यांसारख्या आपल्याला एकत्र आणणाऱ्या महत्त्वाच्या प्रश्नांच्या सोडवणुकीत सक्रियपणे सहभागी होतील अशी अशा मला वाटते आहे. 

एफआयपीआयसीसह, या शिखर परिषदेत सहभागी होणारे पापुआ न्यू गिनीचे गव्हर्नर जनरल बॉब दादे, पंतप्रधान मारापे तसेच पीआयसीमधील इतर महत्त्वाच्या नेत्यांशी द्विपक्षीय संवाद साधण्याबाबत देखील मी उत्सुक आहे.

त्यानंतर, मी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अल्बानीज यांच्या आमंत्रणाला मान देऊन सिडनी शहराला भेट देणार आहे.  यावेळी होऊ घातलेल्या आमच्या द्विपक्षीय बैठकीची मी प्रतीक्षा करत आहे कारण ही बैठक म्हणजे दोन्ही देशांतील द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेण्याची तसेच यावर्षी मार्चमध्ये नवी दिल्ली येथे पार पडलेल्या आपल्या पहिल्याच भारत-ऑस्ट्रेलिया वार्षिक शिखर परिषदेच्या उद्दिष्टांचा पाठपुरावा करण्याची उत्तम संधी असेल. या भेटीदरम्यान मी ऑस्ट्रेलियाच्या अनेक मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची तसेच व्यापार प्रमुखांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधणार आहे. सिडनी येथे होणाऱ्या एका विशेष कार्यक्रमात मी ऑस्ट्रेलियातील भारतीय समुदायाशी संवाद देखील साधणार आहे.

***

Sonal T/Sanjana/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1925416) Visitor Counter : 195