सांस्कृतिक मंत्रालय
पंतप्रधानांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय संग्रहालय प्रदर्शन 2023 चे उद्घाटन
उत्तर आणि दक्षिण ब्लॉक येथे उभारण्यात येणाऱ्या राष्ट्रीय संग्रहालयाच्या आभासी सफरीचे केले उद्घाटन
आंतरराष्ट्रीय संग्रहालय प्रदर्शनाचा शुभंकर, संग्रहालयातील एक दिवस- या विषयावरील चित्रमय कादंबरी, भारतीय संग्रहालयांची मार्गदर्शिका, कर्तव्य पथाविषयी माहिती देणारा छोटा नकाशा आणि संग्रहालयाची चित्रकार्डे यांचे केले अनावरण
हे प्रदर्शन आपल्या देशात संग्रहालयविषयक एक अत्यंत चैतन्यपूर्ण चळवळ आणि परिसंस्था निर्माण करण्यासाठीचा मार्ग प्रशस्त करेल : केंद्रीय मंत्री जी.किशन रेड्डी
Posted On:
18 MAY 2023 7:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 मे 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथील प्रगती मैदानावर उभारलेल्या आंतरराष्ट्रीय संग्रहालय प्रदर्शन 2023 चे उद्घाटन केले. तसेच त्यांनी दिल्ली परिसरातील उत्तर आणि दक्षिण ब्लॉक येथे उभारण्यात येणाऱ्या राष्ट्रीय संग्रहालयाच्या आभासी सफरीचे देखील उद्घाटन केले. यावेळी पंतप्रधानांनी तंत्रज्ञान मेळा, संवर्धन प्रयोगशाळा तसेच या निमित्त सादर करण्यात आलेल्या प्रदर्शनांतून फेरफटका मारला. “संग्रहालये, शाश्वतता आणि स्वास्थ्य’ या यंदाच्या संकल्पनेसह 47 वा आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस साजरा करण्यासाठी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा भाग म्हणून हे आंतरराष्ट्रीय संग्रहालय प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
यावेळी उपस्थित समुदायाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांना आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. या प्रसंगाचे विशेष महत्त्व सांगताना पंतप्रधान म्हणाले की स्वातंत्र्यप्राप्तीला 75 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल भारत देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असतानाच, या आंतरराष्ट्रीय संग्रहालय प्रदर्शनाच्या निमित्ताने तंत्रज्ञानाच्या मदतीने इतिहासाचे विविध अध्याय सजीव होत आहेत. ते म्हणाले की जेव्हा आपण या संग्रहालयात प्रवेश करतो तेव्हा आपण भूतकाळात गुंगून जातो. हे संग्रहालय तथ्ये आणि पुराव्यांवर आधारित सत्ये आपल्यासमोर ठेवते तसेच ते भूतकाळापासून प्रेरणा देते आणि भविष्यातील कर्तव्यांची जाणीव देखील करून देते.
ते म्हणाले की आजच्या ‘शाश्वतता आणि स्वास्थ्य’या संकल्पनेतून आजच्या जगाचे प्राधान्यक्रम अधोरेखित होतात आणि त्यामुळे हा कार्यक्रम अधिक प्रसंगोचित ठरतो.आपल्या आजच्या प्रयत्नांमुळे युवा पिढीला त्यांच्या वारशाविषयी अधिक जाणून घेण्यात मदत होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
आज झालेल्या उद्घाटनाच्या पूर्वी, या संग्रहालयाच्या उभारणी कार्याला दिलेल्या भेटीचा उल्लेख करून पंतप्रधान मोदी यांनी संग्रहालयाला भेट देणाऱ्यांच्या मनावर मोठा प्रभाव टाकण्यासाठी उपयुक्त ठरलेल्या नियोजन तसेच अंमलबजावणी यांच्या संदर्भातील प्रयत्नांची प्रशंसा केली. आजचा कार्यक्रम भारतातील वस्तुसंग्रहालयांच्या जगतासाठी प्रचंड मोठा निर्णायक टप्पा ठरेल असा विश्वास पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला.
शेकडो वर्षांच्या गुलामगिरीच्या काळात प्राचीन हस्तलिखिते आणि ग्रंथालये जळून खाक झाली, यामुळे या भूमीचा बराचसा वारसा नष्ट झाला. हे केवळ भारताचेच नाही तर संपूर्ण जगाच्या वारशाचेही नुकसान असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. आपल्या भूमीचा बऱ्याच काळापासून गमावलेला वारसा पुनरुज्जीवित आणि जतन करण्यासाठी स्वातंत्र्यानंतर प्रयत्नांचा अभाव राहिला याबद्दल त्यांनी दु:ख व्यक्त केले. याबाबत नागरिकांमध्येही जागरूकता नसल्यामुळे आणखी मोठा परिणाम झाला.
स्वातंत्र्याच्या अमृत काळात घेतलेल्या ‘पंच प्रण’ किंवा पाच संकल्पांचे स्मरण करून ‘आपल्या वारशाचा अभिमान बाळगणे’ यावर पंतप्रधानांनी भर दिला.
केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी किशन रेड्डी, केंद्रीय सांस्कृतिक राज्य मंत्री अर्जुन राम मेघवाल तसेच मीनाक्षी लेखी आणि लूव्र संग्रहालय अबुधाबी चे संचालक मॅन्युएल राबाटे यावेळी उपस्थित होते.
आंतरराष्ट्रीय संग्रहालय प्रदर्शन 2023 च्या उद्घाटन समारंभात उपस्थितांना संबोधित करताना केंद्रीय संस्कृती आणि पर्यटन मंत्री जी.किशन रेड्डी यांनी सांगितले की 47 वा आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस साजरा करण्यासाठी तसेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा भाग म्हणून हे आंतरराष्ट्रीय संग्रहालय प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्ट्या नेतृत्वाखाली आणि “आपल्या वारशाचा अभिमान” बाळगण्यासाठी व्यक्त केलेल्या त्यांच्या “पंच प्रतिज्ञामधून प्रेरणा घेत, देशाचा मूर्त आणि अमूर्त सांस्कृतिक वारसा जतन करुन त्याला चालना देण्यासाठी केंद्रीय संस्कृती मंत्रालय सतत प्रयत्नशील आहे असे ते म्हणाले.
हे प्रदर्शन आपल्या देशात संग्रहालयविषयक एक अत्यंत चैतन्यपूर्ण चळवळ आणि परिसंस्था निर्माण करण्यासाठीचा मार्ग प्रशस्त करेल आणि गुंगवून टाकणाऱ्या नवनव्या तसेच अभिनव प्रयोगात्मक तंत्रज्ञानांचा वापर करून या प्रदर्शनाला भेट देणाऱ्या सर्वांसाठी हा एक संस्मरणीय अनुभव ठरावा असा प्रयत्न केंद्रीय संस्कृती मंत्रालय करेल अशी ग्वाही रेड्डी यांनी यावेळी दिली.
देशातील विकास आणि सांस्कृतिक वारशाचे जतन या दोन्हींवर सारखाच भर देणाऱ्या “विकास भी, विरासत भी” म्हणजे ‘विकास साधणे आणि त्यासोबतच वारसा जपणे’ या संकल्पनेला प्रत्यक्षात साकार करण्यासाठी केंद्र सरकार सतत कार्यरत आहे यावर रेड्डी यांनी यावेळी भर दिला.
पार्श्वभूमी :
अंतरराष्ट्रीय संग्रहालय मेळा, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा भाग म्हणून 47 वा अंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन साजरा करण्यासाठी आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाची यावर्षीची संकल्पना आहे ‘संग्रहालये, शाश्वतता आणि योग्य निगा’. हा संग्रहालय मेळा अशा पद्धतीने आखण्यात आला आहे, जेणेकरून संग्रहालय तज्ञांमध्ये संग्रहालायांवर समग्र चर्चा आणि संवाद सुरु होईल, ज्या द्वारे संग्रहालये सांस्कृतिक केंद्रे म्हणून विकसित होतील आणि भारताच्या सांस्कृतिक मुत्सद्देगिरीत महत्वाची भूमिका बजावतील.
या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नॉर्थ ब्लॉक आणि साऊथ ब्लॉक इथे निर्माणाधीन असलेल्या राष्ट्रीय संग्रहालयाची आभासी पद्धतीने माहिती देणाऱ्या व्हर्च्युअल वॉकथ्रूचेही उद्घाटन केले. भारताच्या वर्तमानाला आकार देणाऱ्या भूतकाळाशी संबंधित ऐतिहासिक घटना, व्यक्तिमत्वे, संकल्पना आणि कामगिरी पुढे आणणे आणि त्यांचे प्रदर्शन करणे यासाठीचे सर्वंकष प्रयत्न म्हणजे हे संग्रहालय आहे.
पंतप्रधानांनी आंतरराष्ट्रीय संग्रहालय मेळ्याचा शुभांकर, चित्रमय कादंबरी –वन डे इन म्युझियम, भारतीय संग्रहालायांची निर्देशिका, कर्तव्यपथाचा, खिशात मावेल असा पॉकेट नकाशा आणि संग्रहालय कार्ड यांचे देखील यावेळी उद्घाटन केले.
या आंतरराष्ट्रीय संग्रहालय मेळ्याचा शुभंकर ही एका नृत्यांगनेची मूर्ती आहे, जी चेन्नापट्टम कला शैलीत लाकडातून बनविण्यात आली आहे. चित्रमय कादंबरीत संग्रहालयाला भेट देणाऱ्या मुलांच्या एका गटाची गोष्ट आहे, जिथे येऊन ते संग्रहालयात उपलब्ध असलेल्या नोकरीच्या विविध संधींबद्दल माहिती घेतात. संग्रहालायांची निर्देशिकेत भारतातील संग्रहालायांची विस्तृत माहिती देण्यात आले आहे. कर्तव्य पथाच्या नकाशात विविध सांस्कृतिक ठिकाणं आणि संस्थांची माहिती देण्यात आली आहे, तसेच ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाच्या ठिकाणांची देखील माहिती त्यात आहे. संग्रहालय कार्ड म्हणजे, एक 75 कार्डचा संच आहे ज्यात देशभरातील महत्वाच्या संग्रहालायांच्या दर्शनी भागांची चित्रे आहेत, प्रत्येक कार्डवर संग्रहालयाची थोडक्यात माहिती देण्यात आली आहे. सर्व वयोगटाच्या लोकांना संग्रहालायांची ओळख करून देण्याचा हा नाविन्यपूर्ण प्रयत्न आहे.
जगभरातील सांस्कृतिक केंद्रांचे आणि संग्रहालायांचे प्रतिनिधी या कार्यक्रमाला उपस्थित होते.
* * *
S.Kakade/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1925313)
Visitor Counter : 200