वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
भारत-युरोपियन महासंघ दरम्यान मुक्त व्यापार करारविषयक (एफटीए) वाटाघाटी योग्य दिशेने सुरू : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल
Posted On:
17 MAY 2023 4:21PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 मे 2023
भारत-युरोपियन महासंघ (इयु) दरम्यान मुक्त व्यापार करारविषयक वाटाघाटी योग्य दिशेने सुरू असल्याचे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, वस्त्रोद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री पियूष गोयल यांनी सांगितले. बेल्जियममधील ब्रुसेल्स येथे झालेल्या पहिल्या भारत- युरोपियन महासंघ व्यापार आणि तंत्रज्ञान परिषदेच्या बैठकीनंतर काल प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. व्यापार आणि तंत्रज्ञान परिषद एफटीए वाटाघाटींना पूरक असल्यामुळे उपयुक्त आहे आणि हा करार भारत-युरोपियन महासंघ यांच्यातील संबंधांना या शतकातील महत्वपूर्ण भागीदारी बनवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भारत कार्बन बॉर्डर ऍडजस्टमेंट मेकॅनिझमवर (सीबीएएम) युरोपियन महासंघासोबत काम करत आहे. व्यापारात अडथळा निर्माण करणे हा युरोपियन महासंघाचा हेतू नसून सामूहिक प्रयत्नांचा एक भाग म्हणून शाश्वततेच्या दिशेनं पुढे जाण्याचा मार्ग शोधणे हा हेतू आहे, असे ते म्हणाले. सीबीएएम समस्येवर योग्य तोडगा काढण्यासाठी भारत आणि युरोपियन महासंघ एकत्र काम करत आहेत असे त्यांनी स्पष्ट केले.
बहुतांश वस्तू, कच्चा माल यावर भारताकडून खूप जास्त दर (टेरिफ) आकारला जातो असा चुकीचा अर्थ लावला जातो परंतु प्रत्यक्षात शुल्क खूपच कमी आहे, असे त्यांनी सांगितले. भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीस मदत करणाऱ्या तंत्रज्ञान विषयक वस्तूंवरील शुल्क खूपच कमी आहे. प्रत्यक्षात आकारले जाणारे शुल्क दर हे जागतिक व्यापार संघटनेने निर्धारित केलेल्या दरांपेक्षा कमी आहेत, असे ते म्हणाले.
चर्चा उत्कृष्ट व्हावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि युरोपियन आयोगाच्या अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेयन यांनी केलेले मार्गदर्शन प्रोत्साहन देणारे होते असे ते म्हणाले. भारत आणि युरोपियन युनियन या दोन्ही खुल्या बाजारातील अर्थव्यवस्था आहेत. या दोन्ही ठिकाणी लोकशाही पद्धती आहेत. सुरक्षा, समृद्धी आणि शाश्वत विकासाच्या दिशेने जाण्यासाठी समान हितसंबंध जपणारे समाज या दोन्ही ठिकाणी आहेत, असे त्यांनी नमूद केले.
S.Kane/P.Jambhekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1924781)
Visitor Counter : 188