मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास मंत्रालय

रायगड ते काणकोण हा सागर परिक्रमेचा पाचवा टप्पा 17 ते 19 मे दरम्यान होणार


केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रुपाला, सागर परिक्रमेच्या या पाचव्या टप्प्यात सहभागी होणार

Posted On: 16 MAY 2023 5:08PM by PIB Mumbai

मुंबई/पणजी, 16 मे, 2023

सागर परिक्रमा उपक्रमाचा पाचवा टप्पा सुरू करण्याची घोषणा, केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाने केली आहे. महाराष्ट्रात रायगड इथून 17 मे 2023 रोजी ही परिक्रमा सुरु होऊन, 19 मे 2023 रोजी गोव्यात काणकोण इथे या टप्प्याची सांगता होईल. रायगड ते काणकोण या पट्ट्यातील मच्छिमार आणि इतर मत्स्यव्यावसायिक तसंच संबंधितांच्या समस्या जाणून घेणे, प्रधानमंत्री मत्स्य संपदा (PMMSY) आणि किसान क्रेडिट कार्ड (KCC) यांसारख्या विविध मत्स्यपालन योजना आणि उपक्रमांचा लाभ मिळवून देऊन त्यांची उन्नती साधणे,   हे या परिक्रमेच्या पाचव्या टप्प्याचे उद्दिष्ट आहे.   केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांच्यासह विविध प्रतिष्ठित मान्यवर, तसेच विविध सरकारी संस्था, संघटना आणि आस्थापनांचे अधिकारी, परिक्रमेच्या या पाचव्या टप्प्यात सहभागी होणार आहेत.

ही सागर परिक्रमा म्हणजे, भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्या निमित्त साजऱ्या झालेल्या आझादी का अमृत महोत्सवामागील भावनेचे स्मरण करत, आपले स्वातंत्र्यसैनिक, खलाशी आणि मच्छीमारांचा सन्मान करणारी, तसेच मच्छीमार, मत्स्य शेतकरी, मत्स्यव्यावसायिक आणि इतर संबंधितांप्रती दर्शवल्या जाणाऱ्या एकतेचे प्रतीक आहे. गुजरात, दमण आणि दीव, महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील 19 ठिकाणे समाविष्ट करून चार टप्पे यशस्वीपणे पूर्ण केलेल्या या अभूतपूर्व उपक्रमाला सर्व भागधारकांकडून आणि लाभार्थींकडून उत्स्फूर्त आणि भरघोस पाठिंबा मिळत आहे.

परिक्रमेच्या या पाचव्या टप्प्यात,   महाराष्ट्रातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हे, तर गोवा राज्यामधील वास्को, मुरगाव आणि काणकोण अशा एकूण सहा स्थानांचा समावेश असेल. 720 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेल्या महाराष्ट्रात, सागरी मत्स्यपालनाची प्रचंड क्षमता असून, देशाच्या एकूण मत्स्योत्पादनात, महाराष्ट्र 82 टक्के योगदान देतो. 104 किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेल्या गोवा राज्यातील एकूण लोकसंख्येच्या 90 टक्क्यांहून जास्त लोकांचा मासे हा मुख्य आहार आहे. त्यामुळे मासे, मत्स्यपालन आणि मत्स्याहार, हे गोव्यातील लोकजीवन आणि संस्कृतीचा अविभाज्य भाग आहेत.

या प्रवासादरम्यान मच्छिमार, किनारपट्टीलगत मासेमारी करणारे मच्छीमार, मत्स्यपालन करणारे शेतकरी आणि युवा मत्स्य उद्योजकांना प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना (पीएमएमएसवाय) आणि किसान क्रेडीट कार्ड योजनांसह राज्य सरकारच्या योजनांशी संबंधित प्रमाणपत्रे प्रदान केली जाणार आहेत. यासोबतच प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना (पीएमएमएसवाय), राज्य सरकारच्या योजना, ई-श्रम, मत्स्य्योद्योग आणि मत्स्यपालन पायाभूत सुविधा विकास निधी, किसान क्रेडीट कार्ड या आणि अशा संबधित योजना आणि उपक्रमांविषयीच्या माहितीपूर्ण साहीत्याचा मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांवरून तसेच, चित्रफिती आणि डिजिटल प्रचार मोहीमेच्या माध्यमातून व्यापक स्वरूपात प्रचार केला जाणार आहे

मत्स्यपालन, दुग्ध व्यवसाय आणि पशुसंवर्धन राज्यमंत्री डॉ. संजीवकुमार बालियान, महाराष्ट्राच्या वन, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय विभागाचे मंत्री सुधीर मुनगंटीवार, सनदी अधिकारी / आयएएस अधिकारी आणि मत्स्यव्यवसाय विभागाचे विशेष कार्य अधिकारी / ओएसडी डॉ. अभिलाक्ष लिखी, यांच्यासह भारतीय तटरक्षक दल, भारतीय मत्स्य सर्वेक्षण संस्था, महाराष्ट्र सागरी मंडळ (महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड) आणि इतर संस्थांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत.

सागर परिक्रमा अभियानाच्या या पाचव्या टप्प्याअंतर्गत-5 भारतातील मच्छीमार आणि मत्स्य उद्योगाशी जोडलेल्या प्रत्येकाच्या सर्वसमावेशक, समृद्ध भविष्याचा पाया भक्कम होणार आहे. देशाची अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सागरी मत्स्य संसाधनांचा वापर आणि सागरी पर्यावरणीय परिसंस्थांचे संरक्षण यांच्यात शाश्वत पद्धतीने समतोल साधत, देशाच्या किनारपट्टी प्रदेशात वसलेल्या समुदायांचे जीवनमान आणि आर्थिक स्थिती सुधारण्याच्या बाबतीतील सरकारची वचनबद्धता या अभियानातून ठळकपणे दिसून येते. मासेमारीसाठीच्या गावांची उभारणी तसेच, मासेमारीसाठीची बंदरे आणि मासे उतरवण्यासाठीची केंद्र अशा प्रकारच्या पायाभूत सुविधांच्या उभारणीसोबतच, संबधित परिसंस्था जपण्यासारखा दृष्टिकोनाचा अवलंब केला जात असल्याने जबादारीपूर्वक शाश्वत विकासाची सुनिश्चिती केली जात आहे.

 

ST/Ashutosh/Tushar/PM

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1924537) Visitor Counter : 233