ऊर्जा मंत्रालय

भारताच्या जी-20 अध्यक्षतेखालील तिसरी उर्जा संक्रमण कार्य गट (ETWG) बैठक आजपासून मुंबईत सुरू


हवामान बदलाचा सामना आणि ऊर्जा सुरक्षेची हमी मिळवण्यासाठी आपण जीवाश्म इंधनाचा वापर कमी करून अपारंपरिक ऊर्जास्रोतांचा वापर, उर्जा प्राप्ती करता केला पाहिजे. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे

Posted On: 15 MAY 2023 7:00PM by PIB Mumbai

मुंबई, 15 मे 2023

 

भारताच्या जी-20 अध्यक्षतेखालील तिसरी उर्जा संक्रमण कार्य गट (ETWG) बैठक आजपासून मुंबईत सुरू झाली. तीन दिवस चालणाऱ्या या बैठकीत जी-20 सदस्य देश, विशेष निमंत्रित देश आणि आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्था (IEA), आणि संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम (UNEP) सारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांमधील 100 हून अधिक प्रतिनिधी सहभागी होत आहेत.

तिसऱ्या उर्जा संक्रमण कार्य गट (ETWG) बैठकीच्या पहिल्या दिवशी, भारत सरकारचे रेल्वे, कोळसा आणि खाण राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी आपल्या विशेष संबोधनात शाश्वत ऊर्जा स्रोत आणि त्यांचे संवर्धन तसेच कार्बन उत्सर्जन कमी करणार्‍या धोरणांचा विकास आणि अवलंब करण्याला प्राधान्य देण्यावर भर दिला. “शाश्वत भविष्याकडे वाटचाल करण्यासाठी जी-20 राष्ट्रांवर एक अद्वितीय जबाबदारी आहे.” असेही दानवे म्हणाले. 

या दृष्टीने या अशा प्रकारच्या ऊर्जा संक्रमणाबाबत (उर्जास्रोतांच्मा वापरातील बदल) भारत आघाडीवर असून जगात करत असलेले नेतृत्व खूप महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. धोरणे आखणे आणि नियमन करणे याबाबत सरकार महत्त्वाची भूमिका बजावू शकते असे सांगून त्यांनी पुढे असे सुचित केले की निधी पुरवठा आणि गुंतवणुकीच्या संधी निर्माण करण्यात वित्तीय संस्था सुद्धा महत्त्वाचे योगदान देऊ शकतात. उद्योग जगत, दीर्घकाळ चालू शकणाऱ्या पद्धती राबवून अपरंपरिक ऊर्जास्रोतांच्या क्षेत्रात गुंतवणूक करू शकते. एकापेक्षा जास्त सदस्य राष्ट्र असलेल्या जागतिक संघटना विकसनशील राष्ट्रांना तांत्रिक आणि आर्थिक सहाय्य पुरवू शकतात आणि सर्वात शेवटचे आणि महत्वाचे म्हणजे, नागरिकही त्यांच्या दैनंदिन जीवनात ऊर्जेचा योग्य पद्धतीने वापर करून या चळवळीचा एक भाग बनू शकतात, असे काही उपायही रावसाहेब पाटील दानवे यांनी या बैठकीत आपले विचार मांडताना सुचवले.

ऊर्जा मंत्रालयाचे सचिव आणि ईटीडब्लूजीचे अध्यक्ष आलोक कुमार यांनी तिसऱ्या ऊर्जा संक्रमण कार्यगटाच्या बैठकीचे अध्यक्षपद भूषवले. नूतन आणि अक्षय ऊर्जा मंत्रालयाचे सचिव भूपिंदरसिंग भल्ला आणि खाण मंत्रालयाचे सचिव विवेक भारद्वाज हे देखील या बैठकीत आणि विचारविनिमयामध्ये सहभागी होते.  

तिसऱ्या ईटीडब्लूजी बैठकीचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये मंत्रिस्तरीय परिपत्रकाच्या मसुद्यावर सविस्तर चर्चा झाली.

या बैठकीच्या निमित्ताने तीन इतर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांमध्ये धोरणकर्ते, बहुस्तरीय संघटना, वित्तीय संस्था, व्यापारी संघटना आणि विषयतज्ञ सहभागी झाले होते. पहिल्या दिवशी या इतर कार्यक्रमांमध्ये पुढील उपक्रमांचा समावेश होता.

  1. कमी खर्चाचे आंतरराष्ट्रीय अर्थसाहाय्य मिळवण्याच्या उद्देशाने बहुस्तरीय विकास बँकांसोबत कार्यशाळा– बॅटरी, साठवणूक, हरित हायड्रोजन, किनारपट्टीवरील वारे, जैवऊर्जा आणि कार्बन कॅप्चर युटीलायजेशन यांसारख्या उदयोन्मुख आणि महत्त्वाच्या तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी आणि अंमलबजावणी करण्यासाठी देशांना अर्थसहाय्य उपलब्ध करून देणे सुनिश्चित करण्यावर या चर्चेत भर देण्यात आला.
  2. न्याय्य संक्रमण आराखड्यावर परिसंवाद – कोळसा क्षेत्रातील संक्रमणासमोर, प्राथमिकतेने कोळशावर आधारित अर्थव्यवस्थांसमोर असलेल्या आव्हानांबाबत परिसंवादात चर्चा करण्यात आली.  संस्थामक शासन, भूमी आणि पायाभूत सुविधा मालमत्ता यांचा इतर कारणांसाठी वापर, जागतिक स्तरावरील यशस्वी उपक्रमांमधील तंत्रज्ञानाची देवाणघेवाण आणि सहकार्याद्वारे तंत्रज्ञानात्मक आणि आर्थिक साहाय्य यावर भर देण्यात आला.   
  3. जैवइंधनावर परिसंवाद – जागतिक जैवइंधन आघाडी तयार करण्यासह जैवइंधनासंदर्भात सहकार्यविषयक आघाडी बळकट करण्याच्या माध्यमातून नव्या तंत्रज्ञानासह जैवइंधनाचा विकास आणि  वापर अधिक गतीने करण्याच्या उपाययोजनांवर या परिसंवादात चर्चा झाली.

या मंत्रिस्तरीय परिपत्रकाच्या मसुद्यावरील चर्चा आणि प्रगती बैठकीच्या दुसऱ्या दिवशी देखील सुरू राहील. 17 मे 2023 रोजी या तिसऱ्या ऊर्जा संक्रमण कार्यगटाच्या बैठकीचा समारोप होणार आहे. सदस्य देशांमधील करार आणि सहमती स्वच्छ ऊर्जा संक्रमणाबाबत जागतिक सहकार्याला चालना देण्यासाठी सहाय्यकारक ठरण्याची अपेक्षा आहे.  

 

* * *

PIB Mumbai | S.Tupe/S.Patil/S.Mukhedkar/Ashutosh Save/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai(Release ID: 1924286) Visitor Counter : 196


Read this release in: English , Urdu , Hindi , Punjabi