उपराष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

लोककेंद्रीत राज्यकारभार हा केवळ एक पर्याय नाही, तर राष्ट्राच्या विकासासाठी अनिवार्य बाब आहे- उपराष्ट्रपती


भारतातील राज्यकारभाराची आदर्श पद्धत जगाला हेवा वाटावी अशी - उपराष्ट्रपती

उपराष्ट्रपतींनी सनदी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिला अभिमान वाटेल अशी देशसेवा करण्याचा मंत्र

प्रशासकीय सेवा हा राज्यकारभाराचा कणा आहे - उपराष्ट्रपती

1984 तुकडीच्या सनदी अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या ‘रिफ्लेक्शन्स ऑन इंडियाज पब्लिक पॉलिसीज’ या पुस्तकाचे, उपराष्ट्रपतींच्या हस्ते प्रकाशन

Posted On: 13 MAY 2023 6:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 13 मे 2023

 

सनदी (प्रशासकीय)  सेवा हा राज्यकारभाराचा कणा असून सरकारची धोरणे संपूर्ण देशभरात राबवण्यात या सेवेने मूलभूत भूमिका बजावली आहे असे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी म्हटले आहे. 'रिफ्लेक्शन्स ऑन इंडियाज पब्लिक पॉलिसीज' (भारताच्या सार्वजनिक धोरणांवर पडलेले प्रतिबिंब) या 1984 च्या तुकडीतील सनदी अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे आज नवी दिल्लीत उपराष्ट्रपती भवनात त्यांच्या हस्ते प्रकाशन झाले. यावेळी  ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांना संबोधित करताना त्यांनी हे मत व्यक्त केले.

पारदर्शकता, जबाबदारी, डिजिटलीकरण, नवोन्मेष आणि उद्यमशीलता यावर लक्ष केंद्रीत करणारी भारताच्या राज्यकारभाराची पद्धत संपूर्ण जगाला हेवा वाटावी अशी आहे असे उपराष्ट्रपतींनी नमूद केले.

"समाजातील असुरक्षित घटकांचे सक्षमीकरण करुन उन्नती साध्य करणे, यशस्वी योजनांद्वारे प्रभावीपणे शक्य झाले आहे आणि त्यामुळे अगदी उपेक्षितातील उपेक्षित नागरिकांना देखील अत्यावश्यक सेवांचा लाभ मिळू शकतो," असे ते म्हणाले.

राष्ट्राला अभिमान वाटेल, देशातील नागरिकांचा सन्मान वाढेल अशी देशसेवा करण्याचे आवाहन, उपराष्ट्रपती धनखड यांनी प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना यावेळी केले. व्यक्तिगत आकस न बाळगता लोकसेवा तसेच नागरी कामे करणे, अगदी तळागाळापर्यंत कायदा आणि सुव्यवस्था राबवणे लोकांशी व्यवहार करताना प्रामाणिक राहणे, कर्तव्याप्रति स्वतःला झोकून देणे आणि धोरणपूर्तीची  ठरवलेली उद्दिष्टे गाठताना कार्यक्षमता दाखवणे हीच  राष्ट्राला अभिमान वाटणारी लोकांचा सन्मान वाढवणारी देशसेवा आहे असे त्यांनी यावेळी विशद केले.

एक आगळेवेगळे मौलिक  राष्ट्रीय मनुष्यबळ म्हणून सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकाऱ्यांची  भूमिका उपयुक्त ठरु शकते, ही बाब धनखड यांनी यावेळी अधोरेखित केली.  “आपल्या संवैधानिक संस्था आणि लोकशाही मूल्यांवर चुकीच्या पद्धतीने शिंतोडे उडवून त्यांची प्रतिमा डागाळण्यासाठी, देशांतर्गत आणि देशाबाहेरून होत असलेल्या असत्य कथन आणि देशविरोधी कारवायांचा, आपले सेवानिवृत्त सनदी अधिकारी तटस्थपणे उत्कृष्ट प्रतिवाद करु शकतात, असे उपराष्ट्रपतींनी निदर्शनाला आणून दिले.

लोकशाही राज्यव्यवस्थेपुढे स्वतःची अशी वेगळी आव्हाने आहेत हे मान्य करत उपराष्ट्रपतींनी सनदी अधिकाऱ्यांना, कायदा आणि संविधानाची राजवट राबवण्यासाठी खंबीर आणि दृढ बांधिलकी दाखवण्याचे आवाहन केले.  “देशाच्या काही भागांमध्ये सत्ताधारी पक्षांसोबत अधिकार्‍यांचे असलेले राजकीय साटेलोटे संघराज्य व्यवस्थेच्या उदात्त हेतुला मोठी बाधा पोहोचवत आहे.  याकडे सर्व संबंधितांनी तातडीने पद्धतशीर लक्ष पुरवणे आवश्यक आहे, ” असेही त्यांनी स्पष्ट केले.

सार्वजनिक धोरणाच्या विविध क्षेत्रांमध्ये असलेल्या देशासमोरील काही अत्यंत गंभीर समस्यांना तोंड देण्याबाबत, 1984 च्या तुकडीतील दहा प्रशासकीय अधिकाऱ्यांचे मतप्रवाह, दृष्टीकोन आणि विश्लेषणे, 'रिफ्लेक्शन्स ऑन इंडियाज पब्लिक पॉलिसीज’ या पुस्तकात  एकत्र पहायला मिळतात.  या कार्यक्रमाला विविध प्रशासकीय सेवांमधील अनेक सेवानिवृत्त तसेच विद्यमान ज्येष्ठ अधिकारीही उपस्थित होते.

उपराष्ट्रपतींच्या भाषणाचा संपूर्ण मजकूर  इथे वाचता येईल

 

 

 

 

* * *

R.Aghor/A.Save/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1923917) Visitor Counter : 140