आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार यांनी “सिक्युअर एससीओ" या संकल्पने अंतर्गत एससीओ सदस्य देशांच्या आरोग्य मंत्र्यांच्या सहाव्या बैठकीचे भूषविले अध्यक्षपद


सार्वत्रिक आरोग्य सुरक्षेचे ध्येय गाठण्यासाठी एससीओ देशांमध्ये मजबूत निरीक्षण प्रणाली, सहयोगाद्वारे संशोधन आणि विकास, तसेच वैद्यकीय प्रतिरोध क्षमता विकसित होणे आवश्यक असल्याचे डॉ. भारती पवार यांचे प्रतिपादन

पारंपरिक प्रणालींचे जतन करताना, आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार केल्याने एससीओ प्रदेशातील रूग्णांना परिपूर्ण उपचारांचा अनुभव मिळेल: डॉ. भारती पवार

भारताच्या अध्यक्षतेखाली 2022-23 या वर्षाच्या एससीओ बैठकीचे आयोजन

Posted On: 12 MAY 2023 4:30PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 12 मे 2023

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार यांनी आज नवी दिल्ली इथे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून आयोजित शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) सदस्य देशांच्या आरोग्य मंत्र्यांच्या सहाव्या बैठकीचे अध्यक्षपद भूषविले. केंद्रीय आयुष आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी या बैठकीचे बीजभाषण दिले. या बैठकीला सर्व एससीओ सदस्य देशांचे आरोग्य मंत्री, जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) महासंचालक, डॉ. टेड्रोस गेब्रेयसस,   आणि एससीओ चे महासचिव झांग मिंग, यांच्यासह उच्च स्तरीय भागधारक आणि भागीदार उपस्थित होते.

भारताने आपल्या एससीओ अध्यक्षतेखाली, संपूर्ण वर्षभर, विविध चर्चासत्र आणि वाटाघाटींच्या बैठकी आयोजित केल्या आहेत. यामध्ये आरोग्य विषयक तज्ञ कार्यगटाची बैठक आणि बैठकींच्या पार्श्वभूमीवरील चार कार्यक्रमांचा समावेश आहे.  आपल्या स्वागतपर भाषणात डॉ. भारती प्रवीण पवार यांनी, सर्व एससीओ सदस्य देश करीत असलेल्या  परिश्रमांचा उल्लेख केला आणि  ही चर्चा जगाला ‘युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज’ , अर्थात सार्वत्रिक आरोग्य सुरक्षा प्राप्त करण्याच्या दिशेने आणखी पुढे नेण्यामध्ये उपयोगी ठरेल, असे नमूद केले. त्यांनी सर्व प्रतिनिधींचे स्वागत केले आणि म्हणाल्या की, या बैठकीत, ‘वसुधैव कुटुंबकम’, म्हणजेच ‘संपूर्ण जग एक कुटुंब आहे’, या भारतीय तत्त्वज्ञानाला मूर्त रूप प्राप्त झाले आले आहे.  

मानवजातीच्या कल्याणासाठी दीर्घकालीन सकारात्मक प्रभाव निर्माण करण्यासाठीच्या एससीओ देशांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे, नागरिकांना आरोग्य सुरक्षेची हमी मिळेल, आर्थिक विकासासाठी जागतिक आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईलआणि आव्हानांवर मात करण्यासाठीच्या  एकत्रित प्रयत्नांना बळ मिळेल.

आरोग्य सेवा शेवटच्या टोकापर्यंत अधिक सक्षमपणे पोहोचवण्यामध्ये तंत्रज्ञानाची भूमिका अधोरेखित करत, त्या म्हणाल्या, "डिजिटल आरोग्य सेवा हस्तक्षेप, आरोग्य सेवा परिसंस्थेच्या विविध भागधारकांमधील सध्याचे अंतर भरून काढतील. एससीओ देशांनी डिजिटल सार्वजनिक सेवा एकमेकांबरोबर वाटून घेतल्या, तर आरोग्य सेवा वितरणामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरा द्वारे, सार्वत्रिक आरोग्य सुरक्षेचे उद्दिष्ट साध्य करायला मदत होईल.   

डॉ.पवार यांनी एससीओ सदस्य राष्ट्रांना या क्षेत्रातील सर्वोत्तम पद्धतींसाठी सहयोग आणि देवाणघेवाण करण्याच्या मार्गांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि ते अजमावण्यासाठी वैद्यकीय मूल्य पर्यटनाची क्षमता जोखण्याचे आवाहन केले. भारतामध्ये जागतिक आरोग्य संघटनेच्या पारंपरिक औषधांचे जागतिक केंद्र (GCTM) स्थापनेचा उद्देश एससीओ सदस्य राष्ट्रांमध्ये आधुनिक आणि पारंपरिक औषध प्रणालींचा लाभ घेण्यासाठी संयुक्त प्रयत्नांना सुलभ करणे हा आहे, अशी माहितीही त्यांनी या मेळाव्याला दिली.

केंद्रीय आयुष मंत्री, सर्बानंद सोनोवाल यांनी एससीओ सदस्यांना या क्षेत्रातील सर्वोत्तम पद्धतींसाठी सहयोग  आणि देवाणघेवाण करण्याच्या मार्गांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि ते अजमावण्यासाठी वैद्यकीय मूल्य पर्यटनाची क्षमता ओळखण्यासाठी एकत्र काम करण्याचे आवाहन केले. ते पुढे म्हणाले की पारंपरिक प्रणालींचे जतन करताना आधुनिक तंत्रज्ञानाचा अंगीकार केल्याने संपूर्ण प्रदेशातील रूग्णांना सर्वांगीण उपचारांचा अनुभव मिळेल.

भारताच्या पारंपरिक वैद्यक पद्धतींचा समृद्ध वारसा अधोरेखित करताना, सर्बानंद सोनोवाल यांनी सांगितले की "आयुर्वेदासारखी पारंपरिक औषध पद्धती ही आरोग्यसेवा प्रणालीचा एक महत्त्वाचा प्रकार आहे जी सर्वसमावेशक आणि लोककेंद्रित आहे". त्यांनी माहिती दिली की जागतिक आरोग्य संघटना सदस्य राष्ट्रांना त्यांची सुरक्षा आणि गुणवत्ता सुनिश्चित करताना औषधांच्या पारंपरिक प्रणालींना प्रोत्साहन देण्यासाठी, नियमन आणि एकात्मिक करण्यासाठी सक्षम धोरणे आणि नियम विकसित करण्यासाठी प्रोत्साहित करत आहे. "आयुर्वेद आणि योग या भारतीय पारंपारिक औषध आणि आरोग्य प्रणाली आहेत, ज्या जगभरात लोकप्रिय आहेत आणि लोक त्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी त्यांचा वापर करतात", ते म्हणाले.

आंतरराष्ट्रीय आरोग्य नियमांमधील चिंताजनक दरी दूर करण्यासाठी समांतर प्रक्रिया सुरू आहेतयावर डॉ. टेड्रोस गेब्रेयसस यांनी प्रकाश टाकला. सदस्य राष्ट्रांनी आरोग्य क्षेत्राला खर्चाऐवजी गुंतवणूक म्हणून हाताळण्याचे आवाहन करून, भविष्यातील आरोग्य आणीबाणीसाठी सज्ज होण्याकरिता जागतिक आरोग्य पायाभूत सुविधा सुधारण्यावर त्यांनी भर दिला.

शांघाय सहकार्य संघटनेचे (एससीओ) चे फिरते अध्यक्षपद यंदा भारताकडे आहे - ही एक क्षेत्रीय आंतरशासकीय संस्था आहे, जी जगातील 42% लोकसंख्येचे, 22% भूभागाचे प्रतिनिधित्व करते आणि जागतिक जीडीपी मध्ये 20% योगदान देते आणि त्यात आठ सदस्य देशांचा समावेश आहे (चीन, भारत , कझाकिस्तान, किर्गिस्तान, रशिया, पाकिस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान).

भारतीय एससीओ अध्यक्षतेची संकल्पना म्हणजे संपूर्ण  मानवजातीच्या कल्याणासाठी दीर्घकाळ टिकणारा सकारात्मक प्रभाव निर्माण करणे आणि "सुरक्षित एससीओ" च्या दिशेने एकत्र काम करणे.

बैठकीच्या शेवटी, सदस्य देशांनी एससीओ आरोग्य मंत्र्यांच्या सहाव्या बैठकीची अंतिम घोषणा स्वीकारली. या घोषणेमुळे चांगले आरोग्य आणि कल्याण यांना चालना देण्याचे एससीओ सदस्य देशांचे शाश्वत विकास लक्ष्य साध्य करण्यासाठी आरोग्य सेवा सहकार्य आणि भागीदारीची पायाभरणी होईल.

 

S.Bedekar/Rajashree/Vasanti/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai(Release ID: 1923689) Visitor Counter : 197