पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान 11 मे रोजी राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन 2023 निमित्त आयोजित कार्यक्रमाचे उद्‌घाटन करणार


पंतप्रधान 5800 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध वैज्ञानिक प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण करणार

पंतप्रधान लेझर इंटरफेरोमीटर गुरुत्वीय लहरी वेधशाळा – इंडिया (LIGO-India) ची पायाभरणी करतील; जगातील मूठभर लेझर इंटरफेरोमीटर गुरुत्वीय लहरी वेधशाळांपैकी ही एक असेल

पंतप्रधान ‘रेअर अर्थ पर्मनंट मॅग्नेट प्लांट, विशाखापट्टणम’ राष्ट्राला समर्पित करणार; रेअर अर्थ पर्मनंट मॅग्नेट तयार करण्याची क्षमता असलेल्या निवडक राष्ट्रांच्या गटात भारत सामील होईल

पंतप्रधान ‘राष्ट्रीय हॅड्रॉन बीम थेरपी सुविधा’ आणि ‘फिशन मॉलिब्डेनम-99 उत्पादन सुविधा’ देखील राष्ट्राला समर्पित करतील; या सुविधांमुळे कर्करोगावरील उपचार आणि प्रगत वैद्यकीय इमेजिंगची देशाची क्षमता वाढेल

पंतप्रधान विविध कर्करोग रुग्णालये आणि सुविधांची पायाभरणी करतील तसेच देशाला समर्पित करतील , ज्यामुळे देशाच्या विविध भागांमध्ये जागतिक दर्जाच्या कर्करोग उपचार सुविधांचे विकेंद्रीकरण होईल तसेच त्यांच्या संख्येत वाढ होईल

Posted On: 10 MAY 2023 6:35PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 10 मे 2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 मे 2023 रोजी सकाळी 10:30 वाजता प्रगती मैदान येथे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन 2023 निमित्त आयोजित कार्यक्रमाचे उद्‌घाटन करतील. राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनाचे यंदा 25 वे वर्ष असून त्यानिमित्त 11 ते 14 मे या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून त्याची  सुरुवात या कार्यक्रमाद्वारे होईल.

प्रमुख वैज्ञानिक प्रकल्प

या महत्त्वपूर्ण प्रसंगी, पंतप्रधान देशातील वैज्ञानिक आणि तंत्रज्ञानविषयक प्रगतीशी संबंधित 5800 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या अनेक प्रकल्पांची पायाभरणी करतील तसेच राष्ट्राला समर्पित करतील. देशातील वैज्ञानिक संस्थांना बळकट करून आत्मनिर्भर भारत घडवण्याच्या  पंतप्रधानांच्या संकल्पनेला हे अनुरूप आहे. ज्या प्रकल्पांची पायाभरणी केली जाणार आहे त्यामध्ये लेझर इंटरफेरोमीटर गुरुत्वीय लहरी वेधशाळा – इंडिया (LIGO-India), हिंगोली; होमी भाभा कर्करोग रुग्णालय आणि संशोधन केंद्र, जटनी, ओदिशा  आणि टाटा मेमोरियल रुग्णालय , मुंबईचा प्लॅटिनम ज्युबिली ब्लॉक यांचा समावेश आहे.

महाराष्ट्रात हिंगोली येथे LIGO-India  विकसित केले जाणार असून  जगातील मूठभर लेझर इंटरफेरोमीटर गुरुत्वीय लहरी वेधशाळांपैकी ते एक असेल. हे 4 किमी लांबीचे अत्यंत संवेदनशील इंटरफेरोमीटर असून कृष्णविवर आणि न्यूट्रॉन तारे यांसारख्या प्रचंड खगोल भौतिक वस्तूंच्या विलीनीकरणादरम्यान निर्माण झालेल्या गुरुत्वीय लहरी समजून घेण्यास सक्षम आहे. अमेरिकेत हॅनफोर्ड, वॉशिंग्टन येथील एक आणि लिव्हिंग्स्टन, लुईझियाना येथील एक अशा दोन वेधशाळांबरोबर LIGO-India समन्वयाने  कार्य करेल.

राष्ट्राला समर्पित केल्या जाणाऱ्या प्रकल्पांमध्ये फिशन मॉलिब्डेनम-99 उत्पादन सुविधा, मुंबई; रेअर अर्थ पर्मनंट मॅग्नेट प्लांट, विशाखापट्टणम; नॅशनल हॅड्रॉन बीम थेरपी सुविधा, नवी मुंबई; रेडिओलॉजिकल रिसर्च युनिट, नवी मुंबई; होमी भाभा कर्करोग रुग्णालय आणि संशोधन केंद्र, विशाखापट्टणम; आणि महिला आणि लहान मुलांचे कर्करोग रुग्णालय इमारत, नवी मुंबई यांचा समावेश आहे.

दुर्मिळ  पृथ्वी स्थायी चुंबके  प्रामुख्याने विकसित देशांमध्ये उत्पादित केली  जातात. विशाखापट्टणम येथील भाभा अणुसंशोधन केंद्राच्या परिसरात दुर्मिळ पृथ्वी स्थायी चुंबकांच्या निर्मितीची सुविधा विकसित करण्यात आली आहे. ही सुविधा स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित आणि स्वदेशी संसाधनांमधून उत्खनन केलेल्या  स्वदेशी दुर्मिळ पृथ्वी सामग्रीचा वापर करून स्थापित  करण्यात आली आहे. या सुविधेमुळे, भारत दुर्मिळ पृथ्वी स्थायी चुंबकांची निर्मिती करण्याची क्षमता असलेल्या निवडक राष्ट्रांच्या गटात समाविष्ट  होईल.

नवी मुंबईतील टाटा मेमोरियल सेंटरची  नॅशनल हॅड्रॉन बीम उपचार सुविधा ही एक अत्याधुनिक सुविधा आहे.शरीरात मात्रेची व्याप्ती गाठीच्या आजूबाजूच्या निरोगी अवयवांपर्यंत कमीतकमी ठेवत गाठीवर  अत्यंत अचूक रेडिएशनचे वितरण करण्याचे कार्य या सुविधेमुळे शक्य होते.लक्ष्यित ऊतींना मात्रेचे अचूक वितरण करत  रेडिएशन उपचाराचे प्रारंभिक आणि विलंबित दुष्परिणाम कमी करते.

भाभा अणु संशोधन केंद्राच्या ट्रॉम्बे परिसरात  फिशन मॉलिब्डेनम-99 उत्पादन सुविधा आहे.  मॉलिब्डेनम-99 हे टेक्नेटियम-99m चे मूळ आहे. त्याचा  उपयोग  कर्करोग, हृदयरोग इत्यादी व्याधींचे निदान लवकर करण्यासाठी आवश्यक 85% पेक्षा जास्त इमेजिंग प्रक्रियेमध्ये होतो.या सुविधेमुळे प्रतिवर्षी सुमारे 9 ते 10 लाख रुग्णांचे परीक्षण शक्य होणे अपेक्षित आहे.

अनेक कर्करोग रुग्णालयांचे  आणि  सुविधांचे  राष्ट्रार्पण  आणि पायाभरणी यामुळे देशाच्या विविध भागांमध्ये  कर्करोगावरील  जागतिक दर्जाच्या  सेवांचे  विकेंद्रीकरण होईल आणि त्याची व्याप्ती वाढेल.

अटल नवसंकल्पना अभियान  आणि इतर घटक

राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन 2023 निमित्त आयोजित कार्यक्रम आणि उत्सवांमध्ये अटल नवसंकल्पना अभियानावर  (AIM)  विशेष लक्ष केंद्रित केले आहे. या वर्षीच्या राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनाची संकल्पना अधोरेखित करत   AIM पॅव्हेलियन अनेक नाविन्यपूर्ण प्रकल्प प्रदर्शित करेल आणि अभ्यागतांना थेट प्रयोग  सत्रे पाहण्याचीउत्कृष्ट नवकल्पना आणि स्टार्टअप्सच्या उत्पादनांचे साक्षीदार होण्याची संधी प्रदान करेल. एआर/व्हीआर, संरक्षण तंत्रज्ञान, डिजीयात्रा, वस्त्रोद्योग  आणि जीवविज्ञान  इत्यादींसारखी बहुविध क्षेत्रे असतील.

कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान भारतामध्ये अलीकडच्या काळात झालेल्या विज्ञान  आणि तंत्रज्ञानविषयक  प्रगतीचे दर्शन घडवणाऱ्या प्रदर्शनाचे  उद्घाटनही करतील. यावेळी  ते स्मरणार्थ टपाल तिकीट आणि नाणेही जारी करतील.

माजी पंतप्रधान  अटलबिहारी वाजपेयी यांनी 1999 मध्ये भारताच्या विज्ञान  आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीसाठी योगदान देणाऱ्या  आणि मे 1998 मध्ये पोखरण चाचणी  यशस्वीपणे पार पाडणाऱ्या भारतीय शास्त्रज्ञ, अभियंते आणि तंत्रज्ञांच्या सन्मानार्थ  राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन साजरा करण्यास सुरुवात केली. तेव्हापासून, राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस दरवर्षी 11 मे रोजी साजरा केला जातो. दरवर्षी हा दिवस नवीन आणि वेगळ्या संकल्पनेसह साजरा केला जातो. या वर्षीची संकल्पना  ‘स्कूल टू स्टार्टअप्स- इग्नाइटिंग यंग माइंड्स टू इनोव्हेट’ अशी आहे.

 

  

 

 

 

 

S.Patil/Sushama/Sonali/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1923178) Visitor Counter : 205