आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
डॉ. भारती पवार यांच्या हस्ते थॅलेसेमिया बालसेवा योजनेच्या तिसऱ्या टप्प्याचा प्रारंभ
थॅलेसेमिया बाल सेवा योजना पोर्टल आणि सिकलसेल ॲनेमिया या आजारावरच्या मानक उपचार पद्धतीही जारी
थॅलेसेमिया आणि सिकलसेल सारख्या रक्तविकारांचा सामना करण्यासाठी या आजाराशी संबंधित चाचण्या वाढवणे, या आजारासंबंधी अधिकाधिक जनजागृती करणे, समुपदेशनाच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देणे, आणि उपचारांच्या सोयी सुविधा वाढवणे गरजेचे : डॉ. भारती पवार
थॅलेसेमिया बाल सेवा योजनेअंतर्गत थॅलेसेमिया रुग्णांशी संबंधीत 356 अस्थिमज्जा प्रत्यारोपणे यशस्वी
Posted On:
08 MAY 2023 9:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 मे 2023
जागतिक थॅलेसेमिया दिनाचे औचित्य साधून केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते आरोग्य मंत्रालयाच्या थॅलेसेमिया बाल सेवा योजनेच्या (टीबीएसवाय) तिसऱ्या टप्प्याचा आज शुभारंभ झाला. हा तिसरा टप्पा कोल इंडिया लिमिटेडच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) उपक्रमांतर्गत राबवला जात आहे. यावेळी डॉ. भारती पवार यांच्या हस्ते थॅलेसेमिया बाल सेवा योजना पोर्टलही सुरू करण्यात आले.
थॅलेसेमिया हा रक्ताशी संबंधीत अनुवांशिक आजार आहे. या आजारामुळे शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण सामान्य पातळीपेक्षा कमी होत राहते. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियाना [National Health Mission (NHM - एनएचएम)] अंतर्गत 2017 पासून थॅलेसेमिया बाल सेवा योजना (TBSY - टीबीएसवाय) राबवली जात आहे. नुकताच मार्च 2023 मध्ये या योजनेचा दुसरा टप्पा पूर्ण झाला होता. कोल इंडियाच्या वतीने, त्यांच्या सीएसआर उपक्रमांअंतर्गतच्या वित्तीय सहकार्याच्या माध्यमातून हेमॅटोपॉएसीस स्टेम सेल ट्रान्सप्लांट (HSCT - एचएससीटी)] हा अभिनव उपक्रम राबवला जात आहे. या उपक्रमाअंतर्गत वंचित घटकांमधील थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांना, ज्यांच्याकडे वैद्यकीय स्थितीनुसार प्रत्यारोपणासाठी जुळणारे दाते आहेत, परंतु या प्रक्रियेचा खर्च भागविण्यासाठीची आर्थिक क्षमता अथवा स्रोत नाही, अशा रुग्णांना या आजारातून मुक्त होण्यासाठी एकदाच करायच्या उपचारांची संधी उपलब्ध करून दिली जाते. या उपक्रमाअंतर्गत आत्तापर्यंतच्या दोन टप्प्यांमध्ये देशभरातील 10 सूचीबद्ध रुग्णालयांमध्ये, थॅलेसेमिया रूग्णांवरच्या अस्थिमज्जा प्रत्यारोपणाची (bone marrow transplants) 356 प्रकरणे यशस्वीरित्या पूर्ण केली गेली आहेत.
'थॅलेसेमिया आणि सिकलसेल सारख्या रक्तविकारांचा सामना करण्यासाठी या आजाराशी संबंधीत तपासण्या आणि चाचण्या वाढवणे, या आजारासंबंधी अधिकाधिक जनजागृती करणे, समुपदेशनाच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देणे, आणि उपचारांच्या सोयी सुविधा वाढवणे गरजेचे आहे असे, डॉ. भारती पवार यावेळी म्हणाल्या.रक्ताशी संबंधित विकारांविरुद्धचा लढा बळकट करण्यासाठी समाजातल्या विविध भागधारकांनी पुढाकार घेत, सहकार्य आणि मदतीचा हात पुढे करायला हवा असे आवाहनही त्यांनी केले. आपण बहुभागधारक दृष्टीकोन समोर ठेवून वाटचाल केली तर त्यामुळे रक्ताशी संबंधित विकारांबात जनजागृतीसाठी तसेच,संबंधित आजरांवरच्या उपचारांसाठी देशव्यापी सहकार्य आणि मदत उभी करणे शक्य होऊ शकते असे त्या म्हणाल्या.
यावेळी डॉ. भारती पवार यांच्या हस्ते सिकलसेल आजारावरच्या मानक उपचार पद्धतीचेही प्रकाशन करण्यात आले. ही उपचार पद्धती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (ICMR) विकसित केली आहे. सिकलसेल ॲनिमियासारख्या आजारांवरच्या उपचारांसाठी केंद्र सरकारच्या वतीने, रक्त संक्रमण अर्थात ब्लड ट्रान्स्फ्युजनची गरज भागवता यावी याकरता ई-रक्तकोश पोर्टल तसेच, या आजावरच्या उपचार आणि निदान सेवेसाठी दीड लाखांहून अधिक आरोग्य आणि निरामयता केंद्रांचे जाळे उभारण्यासारखे विविध उपक्रम राबवत असल्याची बाब त्यांनी अधोरेखीत केली.
थॅलेसेमिया बाल सेवा योजनेअंतर्गतच्या या तिसऱ्या टप्प्यात प्रति रक्तद्रव निर्मिती (प्लाझ्मा) मूल पेशी प्रत्यारोपणासाठी [Hematopoiesis stem cell treatment - हेमॅटोपॉएसीस स्टेम सेल ट्रान्सप्लांट (HSCT - एचएससीटी)] 10 लाख रुपयांपर्यंतच्या खर्चासाठी आर्थिक मदत दिली जाणार आहे. ही मदत कोल इंडिया लिमीटेडकरून रक्तद्रव निर्मिती (प्लाझ्मा) मूल पेशी प्रत्यारोपण [Hematopoiesis stem cell treatment - हेमॅटोपॉएसीस स्टेम सेल ट्रान्सप्लांट (एचएससीटी)] करणाऱ्या संस्थांना थेट हस्तांतरित केली जाणार आहे. या उपक्रमामुळे वंचित घटकांमधील थॅलेसेमियाग्रस्त रूग्ण आणि वाढ खुंटवणाऱ्या अशक्तपणाने (aplastic anemia -अल्पास्टिक अनेमियाना) ग्रस्त असलेल्या रुग्णांना मोठा लाभ होणार आहे. उपचार घेतले नाहीत तर हा आजार जीवघेणा ठरू शकत असल्याने या उपक्रमाचा मोठा लाभ अशा रुग्णांना मिळणार आहे.
या उपक्रमाअंतर्गत सूचिबद्ध केलेल्या रुग्णालयांमध्ये मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालय आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांसह भारतातील 10 नामांकित रुग्णालयांचा समावेश करण्यात आला आहे.
S.Kakade/T.Pawar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1922606)
Visitor Counter : 238