पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
शाश्वत जीवनशैली कार्यक्रमात सायकल रॅली, वृक्षगणना, वृक्ष आलिंगन उपक्रमांचे आयोजन
Posted On:
06 MAY 2023 9:37PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 मे 2023
जागतिक पर्यावरण दिन (5जून) हा जगातील लक्षावधी लोकांना पर्यावरणविषयक जागृती आणि कृतीसाठी एकत्र आणणारा दिवस आहे. यावर्षी भारत सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने जागतिक पर्यावरण दिवस 2023 साजरा करण्यासाठी मिशन लाईफ या उपक्रमावर भर दिला आहे. ‘लाईफ’ म्हणजे पर्यावरणासाठी जीवनशैली ही संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2021 मध्ये ग्लासगो येथे झालेल्या यूएनएफसीसीसी कॉप 26 या जागतिक नेत्यांच्या परिषदेत मांडली होती, ज्या संकल्पनेने संपूर्ण जगाला शाश्वत जीवनशैली आणि पद्धतींचा अंगिकार करण्याची हाक दिली होती. त्यानुसार लाईफ या संकल्पनेविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी लोकसहभाग वाढवणाऱ्या उपक्रमांचे देशभरात आयोजन करण्यात येत आहे.
निसर्ग इतिहास विषयक राष्ट्रीय संग्रहालय (NMNH)
एनएमएनएच या संग्रहालयाने एनझेडपीच्या सहकार्याने सायकल रॅली तसेच शालेय विद्यार्थी आणि पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या परस्परसंवाद सत्राचे आयोजन केले. यामध्ये विद्यार्थ्यांनी लाईफ या चळवळीचा त्यांच्या दैनंदिन जीवनात अंगिकार करण्याची शपथ घेतली. या उपक्रमाच्या दुसऱ्या दिवशी कॉन्व्हेंट ऑफ जीझस अँड मेरी, अशोक प्लेस, बांगला साहिब मार्ग, नवी दिल्ली या शाळेचे 155 विद्यार्थी आणि पंडीत दीनदयाळ उपाध्याय पशु चिकित्सा विश्वविद्यालय एवम गो अनुसंधान संस्था, मथुरा उत्तर प्रदेशच्या 55 विद्यार्थ्यांच्या सहभागाने प्राणीसंग्रहालय सहल आयोजित करण्यात आली. या भेटीनंतर सहभागी विद्यार्थ्यांना मिशन लाईफच्या उद्दिष्टांची माहिती देण्यात आली आणि मिशन लाईफ संदर्भात शपथ ग्रहण करण्यात आली. त्यानंतर या विद्यार्थ्यांनी मिशन लाईफचा प्रसार करण्यासंदर्भात वैयक्तिक शपथ घेतली. या विद्यार्थ्यांना मिशन लाईफ विषयी एक माहितीपटही दाखवण्यात आला. निसर्गाच्या सान्निध्यात राहून शाश्वत जीवनशैलीला प्रोत्साहन देण्याची जाणीव लोकांमध्ये निर्माण करणे आणि त्याच्याशी त्यांना संलग्न करणे हा या राष्ट्रीय जीवशास्त्रीय उद्यान भेटीचा उद्देश होता. ‘व्होट फॉर लाईफ’च्या घोषणांनी या कार्यक्रमाचा समारोप झाला.
निसर्ग इतिहासविषयक प्रादेशिक संग्रहालयांचे (आरएमएनएच) कार्यक्रम
आरएमएनएच, मैसूरने मिशन लाईफ (पर्यावरणासाठी जीवनशैली) चा एक भाग म्हणून विद्यार्थी आणि सर्वसामान्य जनतेसाठी वृक्षगणना कार्यक्रम आयोजित केला आणि संवाद/ हरित चर्चा या कार्यक्रमांसह पर्यावरण स्नेही जीवनशैलीच्या आवश्यकतेवर भर दिला.
आरएमएनएच, भुवनेश्वरने मिशन लाईफ (पर्यावरणासाठी जीवनशैली)चा एक भाग म्हणून मदर पब्लिक स्कूल, भुवनेश्वरच्या 200 विद्यार्थ्यांसाठी आपल्या संकुलात वृक्षांच्या साली आणि त्यांच्यावर असणाऱ्या कीटकांच्या प्रजातींची माहिती घेण्यासाठी वृक्ष आलिंगन उपक्रमाचे आयोजन केले.
भारतीय जीवशास्त्रीय सर्वेक्षण(झेडएसआय)
झेडएसआयच्या डॉ. धृती बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमधील बुर्दवान विद्यापीठाच्या सुमारे 120 विद्यार्थ्यांना मिशन लाईफविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी आणि लोकसहभाग वाढवण्यासाठी ‘शाश्वत पर्यावरणासाठी जैवविविधतेची भूमिका’ यावर मार्गदर्शन केले.
M.Pange/S.Patil/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1922340)
Visitor Counter : 196