राष्ट्रपती कार्यालय
रायरंगपूर येथे राष्ट्रपतींचा नागरी सत्कार
Posted On:
04 MAY 2023 8:30PM by PIB Mumbai
भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या सन्मानार्थ आज, 4 मे 2023 रोजी ओदिशा मधील रायरंगपूर येथील रायरंगपूर महानगरपालिकेने आयोजित केलेल्या नागरी सत्कार समारंभाला उपस्थित राहून राष्ट्रपती मुर्मू यांनी हा सत्कार स्वीकारला.
या प्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना, राष्ट्रपती म्हणाल्या की राष्ट्रपतीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्या प्रथमच मयूरभंज येथे आल्या असल्या तरीही त्या नेहमीच त्यांच्या गावाची आठवण काढत असतात. पदासोबत आलेल्या अधिकृत जबाबदाऱ्यांमुळे जरी त्या गावी राहू शकत नसल्या तरीही त्यांचे कुटुंबीय, शेजारी आणि इतर गावकरी या सर्वांनाच त्यांच्या हृदयात नेहमीच अढळ स्थान आहे अशा शब्दात त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.
आतापर्यंतच्या जीवनप्रवासाची उजळणी करत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या की त्यांच्या अगदी बालपणापासूनच त्यांना खूप शिकण्याची आच होती. जरी त्यांचे वडील फारशा चांगल्या आर्थिक स्थितीत नसले तरीही त्यांना मुलीने उच्च शिक्षण घ्यावे असे वाटत होते. त्या म्हणाल्या की त्यांच्या घरात साधने नव्हती पण इच्छाशक्ती मात्र तीव्र होती आणि जेथे इच्छाशक्ती असते तेथे मार्ग आपोआपच निघतो. राष्ट्रपती मुर्मू यांच्या या वाटचालीत सदैव त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या आणि त्यांना पाठींबा देणाऱ्या शिक्षकांचे, शेजाऱ्यांचे आणि ज्येष्ठांचे त्यांनी याप्रसंगी आभार मानले.
राष्ट्रपती म्हणाल्या की रायरंगपूर येथील श्री अरविंदो एकात्मिक शाळा आणि संशोधन केंद्र येथे मानद शिक्षिका म्हणून रुजू झाल्यानंतर त्यांना श्री अरविंदो यांच्याबद्दल खूप काही शिकता आले आणि त्यानंतर ते मुर्मू यांच्याकरिता प्रेरणास्त्रोत झाले. राष्ट्रपती मुर्मू यांनी याप्रसंगी अटलबिहारी वाजपेयी यांचे अत्यंत स्नेहपूर्वक स्मरण केले. अटलबिहारी यांनी त्यांच्या एका कवितेत देवाला विनवणी केली आहे की देवाने त्यांना इतक्या उंचावर नेऊन ठेवू नये कारण अशा उंचीवर त्यांना त्यांच्या स्वतःच्या लोकांना जवळ घेता येणार नाही. या सुप्रसिध्द कवितेचा उल्लेख राष्ट्रपती मुर्मू यांनी यावेळी केला.
रायरंगपूरशी असलेल्या दृढ बंधाचे स्मरण करुन, राष्ट्रपती म्हणाल्या की त्या आज ज्या स्थानी आहेत ते स्थान केवळ रायरंगपूरमुळे त्यांना मिळाले आहे. त्या म्हणाल्या की कदाचित मी या जागेला अधिक नावलौकिक मिळवून देऊ शकेन किंवा नाही हे मला माहित नाही, मात्र रायरंगपूरची अपकीर्ती होईल असे काम मी कधीच करणार नाही.
***
S.Kane/S.Chitnis/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1922082)
Visitor Counter : 168