सांस्कृतिक मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

संस्कृती मंत्रालय आंतरराष्ट्रीय बौद्ध महासंघासोबत 5 मे रोजी साजरी करणार वैशाख पौर्णिमा


‘संयुक्त राष्ट्रांचा वैशाख दिन’ साजरा करण्यासाठी दिल्ली आणि देशभरात विविध कार्यक्रमांचे होणार आयोजन

Posted On: 04 MAY 2023 1:47PM by PIB Mumbai

 

संस्कृती मंत्रालय आंतरराष्ट्रीय बौद्ध महासंघासोबत(IBC) 5 मे रोजी वैशाख पौर्णिमेचा पवित्र दिवस श्रद्धा आणि भक्तीभावाने साजरा करणार आहे. आंतरराष्ट्रीय बौद्ध महासंघ(IBC) हिमालयन बौद्ध संस्कृती संस्थेच्या समन्वयाने नवी दिल्ली येथील राष्ट्रीय संग्रहालयात हा कार्यक्रम साजरा करणार आहे.

अनेक स्वायत्त बौद्ध संघटना आणि संस्कृती मंत्रालयांतर्गत असलेल्या अनुदानित संस्थांकडून विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.

लेहच्या केंद्रीय बौद्ध अध्ययन संस्थेचे सर्व कर्मचारी आणि 600 विद्यार्थी लडाख बौद्ध संस्था आणि लडाख गोन्पा संस्था यांनी लेहमध्ये पोलो मैदानावर आयोजित केलेल्या भव्य सोहळ्यात सहभागी होणार आहेत. यावेळी सीआयबीएस, लेह च्या विद्यार्थ्यांकडून ‘मंगलाचरण’( आमंत्रण प्रार्थना) सादर करण्यात येईल. याशिवाय यावेळी भगवान बुद्धांचा जन्म आणि त्यांचे पहिले प्रवचन यांचे दर्शन घडवणारे सीआयबीएस, लेह च्या विद्यार्थ्यांनी तयार केलेले दोन चित्ररथ प्रदर्शित करण्यात येतील.

बुद्ध जयंती सोहळ्याचे पहाटे सहा वाजता आयोजन झाल्यानंतर डीएचआयएच या संशोधन पत्रिकेच्या 63व्या आवृत्तीचे प्रकाशन सारनाथ येथील केंद्रीय उच्च तिबेटी अध्ययन संस्था (CIHTS) यांच्याकडून होईल. बिहारमधील नालंदा येथील नवनालंदा महाविहारच्या भिक्खू-विद्यार्थ्यांकडून पारंपरिक पूजा करण्यात येईल. त्यानंतर ‘बौद्ध तत्वज्ञान आणि बिहार’ या विषयावर एका दिवसाच्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात येईल.

पूजा समारंभ आणि इतर विधींसोबतच या पवित्र प्रसंगी केंद्रीय हिमालयन संस्कृती अध्ययन संस्था  दाहुंग, अरुणाचल प्रदेश कडून एका वादविवाद स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात येणार आहे.

अरुणाचल प्रदेशातील गेन्त्से गादेन राबग्याल मठातर्फे देखील या पर्वानिमित्त मठातील संन्यासी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून विश्व शांतता प्रार्थना तसेच ‘मंगलाचरण’ कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

वैशाख पौर्णिमेच्या निमित्ताने तिबेट हाऊस येथे आकांक्षी बोधिसत्त्व व्रताचे आचरण करण्यात येणार आहे.

अरुणाचल प्रदेशातील तवांग मठामध्ये या पवित्र सणानिमित्त “बुद्धाची शिकवण, शांतता आणि स्थिरचित्तता” या विषयावर वक्तृत्व-वजा व्याख्यान स्पर्धा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या पवित्र दिवसाचे औचित्य साजरे करण्यासाठी 1 ते 5 मे 2023 या कालावधीत हिमाचल प्रदेशातील धरमशाला येथील लायब्ररी ऑफ तिबेटीयन वर्क्स अँड अर्काईव्ह्ज (एलटीडब्ल्यूए) या संस्थेतर्फे “प्राणी जाणीव परिषदे”चे आयोजन करण्यात आले आहे.

संपूर्ण जगभरातील बौद्ध समुदायासाठी वैशाख बौद्ध पौर्णिमा हा दिवस वर्षभरातील अत्यंत शुभ दिवस समजला जातो कारण या दिवशी भगवान बुद्धांच्या जीवनातील- जन्म, आत्मज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाण या तीन महत्त्वाच्या घटना घडल्या असे मानले जाते. बौद्ध धर्माचा उगम भारतात झाल्यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. तसेच वर्ष 1999 पासून संयुक्त राष्ट्रांनी या दिवसाला ‘संयुक्त राष्ट्र वेसाक दिन’ अशी ओळख देखील प्राप्त करून दिली आहे. यावर्षी 5 मे रोजी वैशाख बौद्ध पौर्णिमा साजरी करण्यात येणार आहे.

केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने नुकतेच  (20-21 एप्रिल या काळात)पहिल्या जागतिक बौद्ध शिखर परिषदेचे आयोजन केले होते. जगभरातील 30 देशांतून 500 पेक्षा जास्त प्रतिनिधी या परिषदेला उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या परिषदेचे उद्घाटन केले होते. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने नवी दिल्ली येथे मुख्यालय असलेल्या जागतिक संरक्षक संस्था आयबीसी या त्यांच्या अनुदान देणाऱ्या संस्थेसह 14 आणि 15 मार्च रोजी एका आंतरराष्ट्रीय बैठकीचे यशस्वी आयोजन केले होते. शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) सदस्य देशांतील बौद्ध कलांमध्ये आंतर-सांस्कृतिक दुवे नव्याने स्थापित करणे तसेच या कलांमधील समानता शोधणे या उद्देशाने “सामायिक बौद्ध वारसा” या विषयावर आयोजित केलेल्या या बैठकीमध्ये एससीओ सदय देशातील तज्ञांचा समावेश होता.

***

S.Kane/S.Patil/S.Chitnis/P.Kor


(Release ID: 1921938) Visitor Counter : 206


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu