माहिती आणि प्रसारण मंत्रालय
प्रसारमाध्यमे आणि मनोरंजन उद्योग यांना जागतिक दर्जा गाठता यावा यासाठी, सरकारला त्यांचा प्रोत्साहक आणि पाठिराखा व्हायला आवडेल
मनुष्यबळ आणि पायाभूत सुविधांच्या आव्हानांवर मात करण्यासाठी प्रसारमाध्यमे आणि मनोरंजन क्षेत्रासोबत काम करायला सरकार वचनबद्ध
ए व्ही जी सी (ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, ग्राफिक्स, कॉमिक्स) उद्योगात जागतिक पातळीवर नेतृत्व करण्याची भारताकडे क्षमता
तरुण प्रतिभावंतांना त्यांच्या कलाकृती प्रदर्शित करण्यासाठी, राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (NFDC) स्वतःचे ओटीटी व्यासपीठ उपलब्ध करुन देणार - सचिव, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय
फिक्की फ्रेम्सच्या 23 व्या सोहळ्याच्या उद्घाटनपर कार्यक्रमाला केंद्रीय माहिती प्रसारण मंत्रालयाचे सचिव अपूर्व चंद्रा यांनी केले संबोधित
Posted On:
03 MAY 2023 6:00PM by PIB Mumbai
मुंबई, 3 मे 2023
प्रसारमाध्यमे आणि मनोरंजन उद्योग यांना जागतिक दर्जा गाठता यावा यासाठी, सरकारला त्यांचा प्रोत्साहक आणि पाठिराखा व्हायला आवडेल. भारतातील प्रसार माध्यमे आणि मनोरंजन क्षेत्र खूप झपाट्याने प्रगती करत असतानाच जागतिक दर्जा गाठण्यासाठी त्यांना खूप पल्ला गाठायचा आहे. त्यासाठी त्यांना आपला दर्जा वाढवावा लागेल. जगाला भारतीय कथा, किस्से आणि भारतीय संस्कृतीत रस आहे, असं केंद्रीय माहिती प्रसारण मंत्रालयाचे सचिव अपूर्व चंद्रा यांनी सांगितले. मुंबईत आयोजित फिक्की फ्रेम्सच्या 23 व्या सोहळ्याच्या उद्घाटनपर कार्यक्रमाला संबोधित करताना ते आज बोलत होते. मनोरंजन व्यवसायाशी निगडीत, आशियातील सर्वात मोठ्या आणि नियमित अधिकृत वार्षिक जागतिक संमेलनापैकी एक असलेल्या फिक्की फ्रेम्सचा हा 23 वा सोहळा, 3 ते 5 मे 2023 या कालावधीत, मुंबईत पवई इथे हॉटेल वेस्टिन मध्ये होत आहे.
या उद्योगासमोर असलेल्या मनुष्यबळ आणि पायाभूत सुविधांच्या आव्हानांवर मात करण्याबाबत बोलताना ते म्हणाले की उद्योग जगताला मनुष्यबळाचा पुरवठा होण्यासाठी, सरकार अधिकाधिक संस्था स्थापन करण्यासाठी वचनबद्ध आहे.
अॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स आणि ग्राफिक्स या क्षेत्रांमध्ये भारतापाशी प्रचंड क्षमता आहे. ए व्ही जी सी कृती दलाची स्थापना आणि ए व्ही जी सी साठी राष्ट्रीय धोरण तयार केल्यामुळे, भारत ए व्ही जी सी उद्योगात जागतिक नेतृत्व करण्याच्या मार्गावर आहे, असं सचिव म्हणाले. विद्यार्थ्यांना बालवयातच वेगाने वाढणाऱ्या या मनोवर्धक क्षेत्राची ओळख व्हावी, यासाठी शालेय अभ्यासक्रमात ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, ग्राफिक्स आणि कॉमिक्स कशाप्रकारे समाविष्ट करता येतील, हे सरकार बघणार आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं. मुंबईत पुढील वर्षी, राष्ट्रीय सर्वोत्कृष्टता केंद्र कार्यान्वित होईल अशी सरकारला अपेक्षा आहे, असही त्यांनी नमूद केलं.
नॅशनल फिल्म हेरिटेज मिशन (राष्ट्रीय चित्रपट वारसा मोहीम) बद्दल बोलताना सचिव म्हणाले की चित्रपट रसिक आणि सामान्य नागरिक त्यांच्या आवडत्या चित्रपटांचे डिजिटलीकरण आणि पुनर्नवीकरण करण्यासाठी निधी देऊ शकतील असा उपक्रम सरकार लवकरच सुरू करणार आहे. ते पुढे असही म्हणाले की, सरकारने, पाच हजारांहून अधिक विशिष्ट चित्रपट आणि लघुपटांचे डिजिटलीकरण आणि पुनर्नवीकरण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यापैकी 1400 चित्रपट आणि लघुपटांचे डिजीटलीकरण आधीच पूर्ण झालं आहे.
एन एफ डी सी ची भूमिका अधोरेखित करताना सचिव म्हणाले की एरवी निधी न मिळू शकणाऱ्या प्रकल्पांना वित्तपुरवठा करायला हवा आणि तरुण चित्रपट निर्मात्यांना आर्थिक पाठबळ पुरवायला हवे.
मनोरंजनाच्या बाजारपेठेत प्रदर्शनासाठी संधी न मिळणाऱ्या चित्रपटांना प्रदर्शित करण्यासाठी NFDC चे स्वतःचे OTT व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याची आमची इच्छा आहे. यामुळे तरुण प्रतिभावंतांना त्यांच्या कलाकृती प्रदर्शित करण्याची संधी मिळेल, असही त्यांनी सांगितलं.
अलीकडच्या धोरणात्मक निर्णयांमुळे चित्रपट विषयक चाचेगिरीला आळा बसेल अशी आशा व्यक्त करत सचिव म्हणाले की कलाकृतींच्या चाचेगिरीवर (पायरसी) कठोर कारवाई करता येण्यासाठी, केंद्रीय मंत्रिमंडळाने अलीकडेच चित्रिकरण कायद्यात दुरुस्तीला मंजुरी दिली आहे. हा कायदा संसदेच्या येत्या पावसाळी अधिवेशनात मांडला जाण्याची अपेक्षा आहे. तो लवकरच मंजूर होईल अशी आशा आहे. यामुळे, परवानगीविना मूळ #films ची नक्कल करुन (पायरेटेड) अवैध प्रसारण करणाऱ्या संकेतस्थळांवर कारवाई करण्याचे थेट अधिकार सरकारला मिळतील, असं त्यांनी सांगितलं.
संधीची कवाडे: सर्वत्र विस्तारत असणारे भारताचे प्रसारमाध्यम आणि मनोरंजन क्षेत्र, या FICCI- EY प्रसारमाध्यमे आणि उद्योग अहवालाचे, अपूर्व चंद्रा, यांनी यावेळी अनावरण केले. या अहवालानुसार या उद्योगाने दोन लाख कोटी रुपयांच्या ऊलाढालीचा टप्पा पार केला आहे. या उद्योगांने 2021 या वर्षाच्या तुलनेत 20 टक्के वृद्धीची नोंद केली आहे.
तसेच यावेळी फिक्कीचे अध्यक्ष आणि, इंडियन मेटल्स अँड फेरो अलॉयज लिमिटेड कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सुभ्रकांत पांडा, फिक्कीच्या मीडिया आणि मनोरंजन समितीच्या अध्यक्ष आणि वायकॉम 18 मीडिया च्या कार्यकारी प्रमुख, ज्योती देशपांडे, सुप्रसिद्ध अभिनेते आयुष्मान खुराना मीडिया आणि मनोरंजन, ईवाय चे भागीदार आशिष फेरवानी आणि फिक्कीचे सरचिटणीस शैलेश पाठक हे ही उपस्थित होते.
यावेळी आयुष्मान खुराना यांनी सांगितले की, “ तुम्ही जेवढे स्थानिक गोष्टींवर लक्ष देता, तेवढेच तुम्ही अधिकाधिक वैश्विक होत जाता. आपली चित्रपटसृष्टी आज ह्या क्षेत्रातील वैश्विक महत्तेच्या उंबरठ्यावर उभी आहे आणि आज जेव्हा जगभरातल्या संस्कृती एकमेकांत विरघळून काही नवे सृजन होत आहे, अशा काळात माझा जन्म झाला आहे, हे मी माझं भाग्य समजतो. ह्या सृजनशीलतेच्या जगन्नाथाचा रथ ओढण्याचे नेतृत्व भारताकडे आले आहे, आणि आज जगभरात भारतीय चित्रपट सृष्टीचे स्वागत होत आहे.”
आपल्या स्वागतपर भाषणात, फिक्कीचे अध्यक्ष सुभ्रकांत पांडा यांनी भारतीय मीडिया आणि मनोरंजन विश्वात दिवसेंदिवस उन्नत होत जाणाऱ्या विकासाची गाथा उलगडून सांगितली. भारतीय मीडिया आणि मनोरंजन उद्योग गेल्या अनेक वर्षांमध्ये 10.5% च्या CAGR वर पोहोचला आहे. 2022-2023 मध्ये हा उद्योग 11.4% च्या सरासरी दराने वाढला. या उद्योग क्षेत्रात असलेली लवचिकता, टिकून राहण्याची वृत्ती, आणि सातत्याने नवनवीन बदल होत जाणाऱ्या या क्षेत्रात असलेली नव्या संधी निर्माण करण्याची क्षमताच यातून सिद्ध झाली आहे. भारतीय मीडिया आणि मनोरंजन उद्योग डिजिटल क्रांतीच्या कालखंडातून वाटचाल करत असताना, परिवर्तनाचा हा एक महत्त्वाचा क्षण आहे,” असे ते म्हणाले.
हे तीन दिवसीय फिक्की फ्रेम्स संमेलन, विविध व्यक्ती, देश आणि समूह यांच्यातील कल्पना आणि ज्ञानाच्या देवाणघेवाणीसाठी एक उत्तम व्यासपीठ ठरेल. या वर्षीच्या संमेलनाची संकल्पना ‘प्रेरित करा- अभिनव कल्पना साकारा आणि त्यात मग्न व्हा’ अशी आहे. चित्रपटउद्योग क्षेत्रात होत असलेल्या उत्क्रांतीचा उत्सव साजरा करत, या उद्योगाच्या भवितव्यावर पडणाऱ्या प्रतिबिंबाविषयी इथे विचारमंथन केले जात आहे. संमेलनाच्या कार्यक्रमात पॅनेल चर्चा, परिषदा, प्रदर्शने, गप्पा-संवाद, मास्टरक्लास आणि कार्यशाळा यांचा समावेश आहे. यात चित्रपट, टेलिव्हिजन, ॲनिमेशन, गेमिंग, संगीत आणि डिजिटल मीडिया आणि मीडिया आणि मनोरंजन उद्योगाशी संबंधित इतर उपक्षेत्रे अशा अनेक विषयांवर चर्चा होणार आहे.
फिक्की फ्रेम्स मधील कार्यक्रमांची सविस्तर माहिती आणि वेळापत्रक - https://www.ficci-frames.com/assets/download/FICCIFRAMES2023-Programme.pdf वर बघता येईल.
S.Tupe/S.Patil/Ashutosh/Radhika/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1921686)
Visitor Counter : 345