पर्यटन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

संयुक्त अरब अमिरातीमध्ये दुबई येथे 1 ते 4 मे 2023 या कालावधीत सुरु असलेल्या एटीएम अर्थात अरेबियन पर्यटन बाजार या उपक्रमात केंद्रीय पर्यटन मंत्रालयाचा सहभाग


या कार्यक्रमात पर्यटन मंत्रालयातर्फे “अतुल्य भारत” आणि “भारतभेटीचे वर्ष 2023”या अभियानांवर आधारित सादरीकरणे आयोजित

Posted On: 02 MAY 2023 5:26PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 2 मे 2023

संयुक्त अरब अमिरातीमध्ये दुबई येथे 1 ते 4 मे 2023 या कालावधीत सुरु असलेल्या एटीएम अर्थात अरेबियन पर्यटन बाजार, 2023 या उपक्रमात केंद्रीय पर्यटन मंत्रालय सहभागी झाले आहे. अरेबियन पर्यटन बाजार हा प्रवास आणि पर्यटन क्षेत्राशी संबंधित प्रमुख जागतिक कार्यक्रमांपैकी एक असून जगभरातून अभ्यागत आणि प्रदर्शक त्यात सहभागी होत असतात. अरेबियन पर्यटन बाजार, 2023 या कार्यक्रमात भारताचा सहभाग हे मध्यपूर्वेकडील तसेच उत्तर आफ्रिकेतील देशांमध्ये भारताला सर्वाधिक पसंतीचे पर्यटनस्थळ म्हणून नावारूपाला आणण्याच्या दिशेने उचललेले महत्त्वाचे पाऊल आहे. भारतातील वैविध्यपूर्ण संस्कृती, वारसा, खाद्यसंस्कृती तसेच निसर्ग सौंदर्य, साहसी पर्यटन स्थळे, एमआयसीई, चैन, वन्यजीवन, स्वास्थ्य या घटकांमुळे पर्यटनातून अद्वितीय तसेच अस्सल अनुभवांच्या शोधात असणाऱ्या जगभरातील पर्यटकांमध्ये भारत लोकप्रिय आहे. 

या कार्यक्रमात केंद्रीय पर्यटन मंत्रालय अतुल्य भारत या संकल्पनेचे सादरीकरण करत असून या कार्यक्रमात भारतभेटीचे वर्ष 2023 या अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. या अभियानाच्या माध्यमातून भारतातील पर्यटनाचे वैविध्यपूर्ण पर्याय तसेच शाश्वत पर्यटन पद्धती राबवण्याप्रति देशाची कटिबद्धता यावर भर देण्यात आला आहे. भारतीय विभागाला भेट देणाऱ्यांना देशातील युनेस्कोची जागतिक वारसा स्थळे, वन्यजीव अभयारण्ये तसेच अध्यात्मिक ठिकाणांसह  भारताच्या समृध्द सांस्कृतिक तसेच नैसर्गिक वारशाचे दर्शन घडेल.

या कार्यक्रमातील सहभागामुळे केंद्रीय पर्यटन मंत्रालयाला, मध्यपूर्व तसेच उत्तर आफ्रिकेतील पर्यटन क्षेत्रातील एजंट, सहल संचालक, विमान कंपन्या तसेच माध्यम प्रतिनिधींसह समग्र पर्यटन उद्योगाशी असलेले भारताचे संबंध आणखी मजबूत करण्याची संधी मिळेल.या कार्यक्रमाच्या कालावधीत देशाचे प्रतिनिधीमंडळ विविध संबंधविस्तार विषयक कार्यक्रम, व्यापारी संस्थांदरम्यान होणाऱ्या बैठका तसेच माध्यमांशी संवाद अशा विविध उपक्रमांमध्ये सहभागी होऊन भारताला पर्यटनस्थळ म्हणून प्रसिध्द करण्यासाठी आणि या उद्योगातील भागधारकांशी भागीदारी संबंध प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करेल.

भारताचा अरेबियन पर्यटन बाजार 2023 या कार्यक्रमातील सहभाग पर्यटन क्षेत्राला देशाचा आर्थिक विकास आणि रोजगार निर्मिती यांची प्रेरक शक्ती म्हणून प्रोत्साहन देण्याच्या देशाच्या वचनबद्धतेला अधोरेखित करतो. भारतातील पर्यटनसंबंधित पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी तसेच भारताला जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यासाठी भारत सरकार कटिबद्ध आहे.

दुबईमध्ये भरलेल्या या अरेबियन पर्यटन बाजार 2023 मधील भारतीय विभागाचे उद्घाटन 1 मे 2023 रोजी झाले.

भारतातील 65 हून अधिक राज्य पर्यटन विभाग तसेच केंद्रशासित विभागांतील पर्यटन प्रशासन, सहल संचालक, हॉटेलच्या साखळ्या, विमान कंपन्या इत्यादींचा अरेबियन पर्यटन बाजार 2023 मधील सशक्त सहभागामुळे मध्यपूर्वेतील देशांतील प्रवाशांच्या भारतभेटीला चालना मिळेल अशी अपेक्षा आहे. एटीएम हा उपक्रम भारतीय पर्यटन उद्योगातील भागधारकांना जागतिक प्रवासी व्यापार क्षेत्राशी जोडले जाण्यासाठी आणि भारतातील पर्यटनाला अधिक चालना देण्यासाठी आवश्यक संधी उपलब्ध करून देत आहे.

 

S.Patil/S.Chitnis/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1921421) Visitor Counter : 190


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil