माहिती आणि प्रसारण मंत्रालय
पंतप्रधानांच्या ‘मन की बात’च्या 100 व्या भागाचे महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत मुंबईतील राजभवनमध्ये थेट प्रसारण
राजभवनात झालेल्या कार्यक्रमाला राज्यपाल तसेच मन की बात मधे उल्लेख झालेल्या व्यक्तींसह पद्म पुरस्कार विजेते आणि अन्य नामवंत उपस्थित
'मन की बात' चा 100 वा भाग एक प्रकारे भारत@2047 चा भव्य प्रारंभ - राज्यपाल रमेश बैस
“मन की बात’ हे शासनामध्ये लोकांच्या सहभागाचे आणि आपला दृष्टीकोन, सूचना आणि कामगिरी पंतप्रधानांपर्यंत पोहोचवण्याचे माध्यम बनले आहे”
“देशाच्या विकासासाठी महत्त्वाचे असलेले अनेक विषय मन की बात अधोरेखित करतो”
Posted On:
30 APR 2023 2:30PM by PIB Mumbai
मुंबई, 30 एप्रिल 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या आकाशवाणीवरील सर्वाधिक लोकप्रिय कार्यक्रमाचा आज 100वा भाग प्रसारित झाला. भारतातील सर्व राजभवनांमध्ये प्रसार भारती'च्यावतीने आयोजित विशेष कार्यक्रमात ‘मन की बात’ चे थेट प्रसारण करण्यात आले. मुंबईतील राजभवनात झालेल्या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
हा कार्यक्रम 3 ऑक्टोबर 2014 रोजी विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर प्रथम प्रसारित झाला. तेव्हापासून आजतागायत मोठा पल्ला या मन की बात कार्यक्रमाने गाठला असून गेल्या काही वर्षांत हा कार्यक्रम देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे असे गौरोवोद्गार राज्यपाल रमेश बैस यांनी यावेळी काढले.
'मन की बात' चा 100 वा भाग एक प्रकारे भारत@2047 चा भव्य प्रारंभ आहे, असे ते म्हणाले. हा कार्यक्रम देशाच्या विकासासाठी महत्वाच्या असलेल्या विविध विषयांवर प्रकाश टाकतो ,यातून श्रोत्यांना शासनाच्या विविध कार्यक्रमांची ओळख होते. आजूबाजूला घडणाऱ्या सकारात्मक कथा अधोरेखित करून नागरिकांना प्रेरित करणाऱ्या या कार्यक्रमात उल्लेख झालेल्या सर्वांनी ही जनचळवळ यशस्वी करण्यात खऱ्या अर्थाने मदत केली आहे, असे राज्यपाल म्हणाले. हा कार्यक्रम स्वच्छ भारत, बेटी बचाओ-बेटी पढाओ, जलसंधारण, स्थानिक उत्पादनांसाठी व्होकल फॉर लोकल इत्यादी सामाजिक बदलांचा उगम, माध्यम आणि विस्तारक आहे असे त्यांनी सांगितले.
खादी, भारतीय खेळणी उद्योग, आरोग्य क्षेत्रातील स्टार्टअप्स, आयुष आणि अंतराळ इत्यादी उद्योगांवर या कार्यक्रमाचा प्रचंड प्रभाव दिसून आला आहे, असे राज्यपालांनी नमूद केले.
'मन की बात' ने अभिनव आणि अनोख्या संवादात्मक सादरीकरणाच्या शैलीने संवादाचे एक अद्वितीय उदाहरण म्हणून खऱ्या अर्थाने एक वेगळे स्थान निर्माण केले आहे, असे त्यांनी सांगितले. कोविड-19 महामारी शिखरावर असताना पंतप्रधानांनी समाजातील सर्व घटकांशी विविध माध्यमातून संपर्क ठेवला. त्यांच्या 'परीक्षा पे चर्चा' आणि परीक्षा वॉरियर्सच्या माध्यमातून ते विद्यार्थी आणि तरुणांशी सतत संपर्कात असतात याकडे राज्यपालांनी लक्ष वेधले. अनेक माध्यमांतून सर्वसामान्यांशी जोडले जाण्याला प्राधान्य देणारे पंतप्रधान लाभणे हे आपले भाग्य असल्याचे ते म्हणाले. पंतप्रधानांच्या प्रयत्नांमुळे आतापर्यंत 47.8 कोटी जनधन खाती उघडण्यात आली आहेत, असे देखील त्यांनी सांगितले.
‘मन की बात’ करताना त्यांनी देशाच्या एखाद्या दुर्गम भागात घडणाऱ्या प्रत्येक सामाजिक परिवर्तनाची दखल घेतली आहे, असे महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की ‘मन की बात’च्या पहिल्याच भागात पंतप्रधानांनी रेडियो हे संपर्काचे अतिशय साधेसोपे माध्यम असून ज्याच्या मदतीने दुर्गम भागातील लोकांपर्यंत पोहोचता येते असे सांगितले होते. गरिबातील गरीब कुटुंबापर्यंत आपला संदेश पोहोचवण्याचा आपला हेतू असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले होते. देशातील गरीब व्यक्तीच्या झोपडीत देशाचे सामर्थ्य आहे, अशी त्यांची धारणा आहे. अशा प्रकारे प्रत्येक भारतीयाचे हृदय आणि मनात स्थान निर्माण करणे हे ‘मन की बात’चे उद्दिष्ट आहे.
भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे आणि शासनातील लोकसहभागामुळे तो खऱ्या अर्थाने लोकाभिमुख झाला आहे. गेल्या काही वर्षात मन की बात हे शासनातील लोकसहभागाचे आणि आपले दृष्टीकोन, सूचना आणि कामगिरी पंतप्रधानांकडे मांडण्याचे माध्यम बनले आहे असे बैस यांनी पुढे सांगितले. चीनला मागे टाकत भारत हा जगातील सर्वात जास्त लोकसंख्येचा देश बनला आहे, असे बैस म्हणाले. लोकसंख्याविषयक या बदलाला लोकसंख्याविषयक लाभांशात रुपांतरित करण्यासाठी माननीय पंतप्रधानांनी स्किलिंग, रि-स्किलिंग आणि अपस्किलिंगवर भर दिला आहे. अनेक देशांमध्ये वयोमान वाढणारी लोकसंख्या असल्याने हे देश आपल्या गरजांची पूर्तता करण्यासाठी कुशल मनुष्यबळ म्हणून भारताकडे पाहात आहेत. हा भारताचा काळ आहे, असे राज्यपालांनी नमूद केले.
हा कार्यक्रम देशाच्या विकासासाठी महत्वाच्या असलेल्या विविध विषयांवर प्रकाश टाकतो ,यातून श्रोत्यांना शासनाच्या विविध कार्यक्रमांची ओळख होते. आजूबाजूला घडणाऱ्या सकारात्मक कथा अधोरेखित करून नागरिकांना प्रेरित करणाऱ्या या कार्यक्रमात उल्लेख झालेल्या सर्वांनी ही जनचळवळ यशस्वी करण्यात खऱ्या अर्थाने मदत केली आहे. या चळवळीत महाराष्ट्रातील अधिकाधिक लोकांनी सहभागी व्हावे असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले.
‘मन की बात’ देशाच्या विकासासाठी महत्त्वाचे असलेले विविध विषय अधोरेखित करत असतो, असे राज्यपालांनी सांगितले. सरकारच्या विविध कार्यक्रमांबाबत श्रोत्यांमध्ये हा कार्यक्रम जागरुकता निर्माण करतो. ‘मन की बात’च्या भागांमध्ये पंतप्रधानांनी देशभरातील अनेक असामान्य लोकांचा उल्लेख केला आहे. या यादीमध्ये महाराष्ट्रातील व्यक्तींचा मोठ्या प्रमाणात समावेश असणे ही आपल्यासाठी अतिशय अभिमानाची बाब आहे, असे राज्यपालांनी सांगितले. पालघर, चंद्रपूर, नाशिकमधल्या दुर्गम भागातील आदिवासी प्रदेशातील लोकांपासून अमेरिकेसारख्या अतिदूर असलेल्या देशातील लोकांनाही ‘मन की बात’ मधून प्रसिद्धी मिळाली आहे. विविध प्रकारचे व्यवसाय आणि समाजातील विविध स्तरातील लोक ‘मन की बात’मध्ये सहभागी झाले आहेत, असे राज्यपाल म्हणाले.
माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि प्रसार भारती यांच्यावतीने आयोजित या कार्यक्रमाला हिवरे बाजारचे माजी सरपंच पद्मश्री पोपटराव पवार, पद्मश्री डॉ.शशांक जोशी, डिक्कीचे अध्यक्ष पद्मश्री मिलिंद कांबळे आणि भरड धान्य प्रसारक पद्मश्री शर्मिला ओस्वाल यांच्यासह अन्य पद्म पुरस्कार विजेते पद्मश्री कुमी वाडिया, पद्मश्री परशुराम खुणे, पद्मश्री गजानन माने, उद्योग क्षेत्रातील कल्पना सरोज, आयएमसी चे (IMC) अध्यक्ष अनंत सिंघानिया, जयंतीलाल गडा. चित्रपट उद्योगातील नामवंत अभिनेत्री माधुरी दीक्षित, अभिनेता शाहिद कपूर यांच्यासह, एकता कपूर, रोहित शेट्टी, सोनू निगम, अनुराधा पौडवाल, प्रसाद ओक, आदिनाथ मंगेशकर आदी मान्यवर विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित होते.
याशिवाय मन की बात’ यापूर्वीच्या भागांमध्ये ज्यांचा उल्लेख पंतप्रधानांनी केला होता, अशा महाराष्ट्रातील 47 जणांना राज्यपालांसोबत राजभवनातील कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा बहुमान मिळाला. यात विविध क्षेत्रांमधील आणि वयोगटातील व्यक्तींचा यामध्ये समावेश होता. वयाच्या 12व्या वर्षी माऊंट अकोन्कागुआ सर करणाऱ्या काम्या कार्तिकेयनपासून, स्वच्छता मोहिमेसाठी आपल्या 16 हजार रुपयांच्या मासिक निवृत्तीवेतनापैकी पाच हजार रुपयांचे योगदान देण्याचा संकल्प करणारे निवृत्तीवेतनधारक चंद्रकांत कुलकर्णी यांच्यासह पालघर, चंद्रपूर आणि नाशिक या जिल्ह्यातील आदिवासींच्या कामगिरीपासून ते दूर अंतरावर अमेरिकेत मोठी कामगिरी करत समाजोपयोगी उपक्रम राबवणारे हितेंद्र महाजन आणि महेंद्र महाजन हे बंधू यावेळी उपस्थित होते.
माहिती आणि प्रसारण मंत्रालय,भारत सरकार आणि प्रसार भारती यांनी आजच्या राज भवनातील या विशेष स्क्रीनिंगचे आयोजन केले होते. तत्पूर्वी राज्यपालांनी राज भवनाच्या प्रांगणात माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत केंद्रीय संचार ब्युरो,पुणे, इथल्या प्रादेशिक कार्यालयाने आजोजित केलेल्या ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ आणि ‘मन की बात’ या विषयावरील छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन केले.तसेच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या प्रकाशन विभागाने येथे भरवलेल्या पुस्तक प्रदर्शनालाही राज्यपालांनी भेट दिली.
* * *
PIB Mumbai | Jaydevi/Sonal C/Shailesh P/Vikas/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1920895)
Visitor Counter : 194