पर्यटन मंत्रालय

केंद्रीय पर्यटन मंत्रालयातर्फे जयपूर येथे जी-20 पर्यटनविषयक प्रदर्शनाचे आयोजन


भारतात पर्यटनाला चालना देण्यासाठी 50 नवी पर्यटनस्थळे तसेच उडान उपक्रमाअंतर्गत 59 नवे मार्ग विकसित करण्यात येणार: केंद्रीय पर्यटन मंत्रालयाचा उपक्रम असलेल्या जी-20 पर्यटनविषयक प्रदर्शनात केंद्रीय पर्यटन सचिवांचे प्रतिपादन

Posted On: 24 APR 2023 5:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 24 एप्रिल 2023

राजस्थान राज्य सरकारच्या पर्यटन विभागाच्या सहकार्याने केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने  23 ते 25 एप्रिल 2023 या कालावधीत जयपूर येथे पर्यटनविषयक प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचा अमृतकाळ साजरा करण्यासह भारताच्या जी-20 समूह अध्यक्षतेच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय पर्यटन विभाग अभियान तत्वावर भारताच्या पर्यटन क्षेत्राचा विकास करण्याचे प्रयत्न करत आहे. यासंबंधी तपशीलवार माहिती देताना केंद्रीय पर्यटन विभागाचे सचिव अरविंद सिंग आज म्हणाले की, भारतातील पर्यटनाला चालना देण्यासाठी 50 नवी पर्यटनस्थळे विकसित करण्यात येणार असून 59 नवे हवाई मार्ग कार्यान्वित करण्यात येणार आहेत.

फिक्की आणि राजस्थान राज्य सरकारच्या पर्यटन विभागाच्या सहकार्यासह केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने आयोजित केलेल्या जी-20 पर्यटनविषयक प्रदर्शनाच्या उद्घाटनपर सत्रात बोलताना, अरविंद सिंग म्हणाले, भारताकडे सध्या असलेल्या जी-20 समूहाच्या अध्यक्षपदाच्या काळात, आशिया पॅसिफिक क्षेत्रामध्ये भारतीय पर्यटन क्षेत्र सशक्त कामगिरीचे दर्शन घडवीत आहे. जागतिक महामारीने उभ्या केलेल्या आव्हानात्मक परिस्थितीत देखील वर्ष 2022 मध्ये  6.19 दशलक्ष परदेशी पर्यटकांनी भारताला भेट दिली. वर्ष 2021 मधील परदेशी पर्यटकांच्या1.52 दशलक्ष या संख्येशी तुलना करता,2022 मध्ये त्यात 305% ची वाढ नोंदवली गेली. देशात पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही हरित पर्यटनाला चालना देत असून सुमारे 50 नवी पर्यटन स्थळे विकसित करण्याचे नियोजन करत आहोत आणि त्यांची माहिती देण्यासाठी जागतिक बाजारांमध्ये जाहिराती देखील सुरु करणार आहोत.

केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने याआधीच, जी-20 पर्यटनविषयक कृतीगटाच्या दोन बैठका घेतल्या असून हरित पर्यटन, डिजिटलीकरण, कौशल्य विकास, एमएसएमई उद्योगांना प्रोत्साहन तसेच पर्यटनस्थळ व्यवस्थापन यांना चालना देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.  त्याशिवाय, पर्यटनविषयक पायाभूत सुविधांचा विकास करण्यावर देखील सरकारने लक्ष केंद्रित केले आहे. रेल्वे,रस्ते आणि हवाई मार्गांचा वापर करून  जोडणी सुधारण्यावर लक्ष केंद्रित करण्यासह पर्यटनविषयक पायाभूत सुविधांच्या विकासासाठी आम्ही सर्वंकष दृष्टीकोन स्वीकारत आहोत. अत्यंत यशस्वी ठरलेल्या उडान योजनेअंतर्गत आम्ही केंद्रीय नागरी हवाई उड्डाण मंत्रालयाला 59 नव्या हवाई मार्गांची शिफारस केली आहे आणि त्यापैकी 51 मार्गांवरील प्रवासी वाहतूक सेवा सुरु देखील झाल्या आहेत, देशातील पर्यटन क्षेत्राच्या सखोल संवर्धनासाठी सरकारने हाती घेतलेल्या उपक्रमांची अधिक माहिती देत सिंग म्हणाले. 

राजस्थान राज्य  सरकारमधील पर्यटन मंत्री विश्वेंद्र सिंग यांनी सांगितले की, राज्य सरकारने राज्यातील 23 जुन्या धावपट्ट्या पुनरुज्जीवित करण्याची योजना आखली आहे. या उपक्रमामुळे राज्यातील प्रयत्न क्षेत्राला मोठी चालना मिळेल. जी-20 पर्यटनविषयक प्रदर्शनाच्या उद्घाटनपर भाषणात बोलताना विश्वेंद्र सिंग म्हणाले, नव्याने लागू केलेल्या ग्रामीण पर्यटन धोरणांतर्गत, आम्ही खासगी क्षेत्राच्या सहकार्याने 23 धावपट्ट्यांचा पुनर्विकास करण्याचे काम हाती घेतले आहे. यामुळे राजस्थानमधील, विशेषतः, राज्याच्या ग्रामीण भागातील पर्यटन व्यवसायाला मोठे प्रोत्साहन मिळेल आणि त्यातून प्रचंड प्रमाणात रोजगार संधी निर्माण होतील.

 

G.Chippalkatti/S.Chitnis/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1919204) Visitor Counter : 135


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil