अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

बँकांनी, बँकिंग सेवेपासून अद्याप वंचित असलेल्या, सुरक्षा नसलेल्या आणि वित्तपुरवठ्यापासून वंचित असलेल्यांना सेवा पुरवावी : डॉ.भागवत कराड


बँकांसाठी निश्चित केलेल्या वित्तीय समावेशन मापदंडांवर कोल्हापूर चांगली कामगिरी करत आहे : अर्थ राज्यमंत्री

पश्चिम महाराष्ट्राच्या वित्तीय समावेशन मापदंडांबाबत सातारा येथे झाली आढावा बैठक

Posted On: 24 APR 2023 3:43PM by PIB Mumbai

सातारा, 24 एप्रिल 2023

बँकांनी बँकिंग सेवेपासून अद्याप वंचित असलेल्यांना, सुरक्षा नसलेल्या  आणि वित्तपुरवठ्यापासून वंचित असलेल्यांना सेवा पुरवावी, असे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी म्हटले आहे. ते आज सातारा येथे पश्चिम महाराष्ट्राच्या वित्तीय समावेशन मापदंडावर आयोजित  आढावा बैठकीत बोलत होते.

पीएम  स्वानिधी योजना गरजू लोकांना तारण किंवा सिबिल स्कोअरच्या अटीशिवाय लघु  कर्ज पुरवते,असे सांगून  ग्रामीण भागात बँकिंगचा प्रसार वाढवावा,अशी सूचना कराड यांनी यावेळी  केली. त्यांनी बँकांना कर्ज वितरणासाठी  प्रतीक्षा कालावधी कमी करण्याचे निर्देश दिले. महाराष्ट्रासारख्या विकसित राज्यातही ग्रामीण भागात बँकांच्या शाखांची संख्या वाढवण्यास वाव आहे, असे त्यांनी सांगितले.बँकांनी त्या दिशेने काम करणे आवश्यक आहे,असे ते  म्हणाले.

भारत पाच ट्रिलियनची  अर्थव्यवस्था होण्याच्या  लक्ष्यात बँकिंग क्षेत्र हा एक मोठा आधारस्तंभ असल्याचे कराड यांनी नमूद केले.नवमतदारांचे  बँक खाते उघडून त्यांना बँकिंग क्षेत्रात सामावून घ्यायला हवे  आणि त्यासाठी विशेष शिबिरांचे आयोजन करायला हवे, अशी सूचना त्यांनी केली.सर्वांच्या विकासासाठी बँकिंग क्षेत्रामध्ये स्पर्धात्मक भावना निर्माण करण्याची सूचना त्यांनी केली.वित्तीय समावेशन मापदंडांवर कोल्हापूर जिल्ह्याने केलेल्या सर्वांगीण कामगिरीचे कराड यांनी  कौतुक केले.

पंतप्रधान  स्वानिधीसारख्या योजनांच्या बाबतीत महाराष्ट्राने राष्ट्रीय सरासरीपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. मात्र मुद्रा योजनेत कामगिरी सुधारण्यास वाव असून यात  महाराष्ट्र राष्ट्रीय सरासरीपेक्षा मागे आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

यावेळी कराड यांनी  पश्चिम महाराष्ट्र क्षेत्रातील  नाबार्डच्या कामगिरीचा आढावाही घेतला. यावेळी खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार जयकुमार गोरे आणि  विविध बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

 

Jaydevi PS/S.Kulkarni/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1919181) Visitor Counter : 241


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil