ग्रामीण विकास मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

महिला बचत गटांमध्ये 10 कोटी ग्रामीण महिलांना समाविष्ट करण्यासाठी दीनदयाळ अंत्योदय योजना- राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका योजनेने “संगठन से समृद्धी” ही राष्ट्रीय मोहीम सुरू केली

Posted On: 18 APR 2023 6:55PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 18 एप्रिल 2023

महिला बचत गटांमध्ये पात्र ग्रामीण कुटुंबांमधील 10 कोटी ग्रामीण महिलांना समाविष्ट करण्याच्या उद्देशाने ग्रामीण विकास मंत्रालयाच्या दीनदयाळ अंत्योदय योजना- राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका योजनेने आज स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव: समावेशक विकासांतर्गत संगठन से समृद्धी- कोणतीही ग्रामीण महिला मागे राहणार नाही ही राष्ट्रीय मोहीम सुरू केली. ही विशेष मोहीम 30 जून 2023 पर्यंत सुरू राहील आणि सर्व उपेक्षित आणि अल्पभूधारक ग्रामीण कुटुंबांमधील महिलांना महिला बचत गटांमध्ये समाविष्ट करून या कार्यक्रमाचे फायदे देण्यासाठी एकत्र आणेल.

दीनदयाळ अंत्योदय योजना - राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका योजनेचे लाभ माहीत नसलेल्या उपेक्षित ग्रामीण समुदायांना हे लाभ देण्यासाठी एकत्र आणण्याचे या मोहिमेचे प्राथमिक उद्दिष्ट आहे. सर्व राज्यांमध्ये ही मोहीम सुरू करण्यात येईल आणि या अंतर्गत 1.1 लाखांपेक्षा जास्त बचत गटांची स्थापना होण्याची अपेक्षा आहे. ग्रामीण संघटनांच्या सर्वसाधारण सभांचे आयोजन करून आणि उत्तम कार्य करणाऱ्या बचत गटांच्या अनुभवांची या बैठकांमध्ये देवाणघेवाण करून या कुटुंबांना बचत गटांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिले जाईल. समुदायांच्या रिसोर्स पर्सन मोहिमा आयोजित केल्या जातील, पीएमएवाय-जी च्या लाभार्थी कुटुंबांमधील पात्र महिलांना एकत्र केले जाईल, नव्या बचतगट सदस्यांना प्रशिक्षण दिले जाईल, बंद पडलेल्या बचतगटांचे पुनरुज्जीवन केले जाईल, बचतगटांची बँक खाती उघडण्यात येतील आणि इतर हितधारकांनी प्रोत्साहन दिलेल्या बचतगटांचा एक सामाईक माहितीसंग्रह तयार केला जाईल.  

केंद्रीय ग्रामीण विकास आणि पंचायती राज मंत्री गिरीराज सिंह यांच्या उपस्थितीत नवी दिल्ली येथे या मोहिमेचे उद्घाटन झाले. यावेळी इतर मंत्रालयाचे अधिकारी, भागीदार बँकांचे अधिकारी देखील उपस्थित होते. तसेचशैलेश कुमार सिंह, सचिव-ग्रामीण विकास, चरणजित सिंह, अतिरिक्त सचिव-ग्रामीण उपजीविका आणि  स्मृती शरण, सहसचिव ग्रामीण उपजीविका मंत्रालय आणि DAY-NRLM चे प्रतिनिधित्व करत होते.  या कार्यक्रमादरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी, मिशन डायरेक्टर आणि राज्य ग्रामीण उपजीविका मिशनचे वरिष्ठ मिशन कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना गिरीराज सिंह म्हणाले, भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी 65% ग्रामीण लोकसंख्या असल्याने  या भागातील महिलांना आपल्या देशाला 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्यात महत्त्वपूर्ण योगदान देण्यासाठी सक्षम करण्यासाठी सर्व संभाव्य संधी उपलब्ध करून देणे अतिशय गरजेचे आहे. ज्यावेळी 10 कोटी बचत गटातील सर्व सदस्य लखपती दिदी बनतील, तेव्हा त्याचा आपोआपच देशाच्या जीडीपीवर लक्षणीय परिणाम होईल आणि याच दृष्टीकोनातून DAY-NRLM ची सुरुवात करण्यात आली जेणेकरून प्रत्येक ग्रामीण कुटुंबातील किमान एक महिला सदस्य एका बचत गटात सामील होऊ शकेल आणि त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी या कार्यक्रमांतर्गत देऊ केलेल्या संधी आणि आर्थिक मदतीचा लाभ घेऊ शकेल. स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करण्याच्या निमित्ताने, आपण या "संघटन से समृद्धी" या मोहिमेची सुरुवात करत आहोत, जे आधीपासून महिला बचत गट चळवळीचा भाग असलेल्या 9 कोटी महिलांसाठी अतिरिक्त 1 कोटी महिलांना एकत्र आणत आहेत, याचा मला अतिशय आनंद होत आहे. असे असले तरी 10 कोटींवर थांबता कामा नये. यापुढे जाऊन देशभरातील सर्व ग्रामीण महिला बचत गट चळवळीत सामील होतील हे सुनिश्चित करुया. मी आमच्‍या महिला बचतगटांच्या सर्व सदस्‍यांना आपल्‍या गावांमधील उपेक्षित राहिलेल्या महिलांपर्यंत पोहोचण्‍याची विनंती करतो आणि स्वतःच्या विद्यमान बचत गटांमध्‍ये सामील होण्‍यासाठी प्रेरित करण्‍याची विनंती करतो.

विविध राज्यांमधील महिला बचत गट या कार्यक्रमात उत्साहाने सहभागी झाले होते आणि महाराष्ट्र, बिहार, त्रिपुरा, तेलंगण आणि हरयाणा या राज्यातील महिलांनी कशा प्रकारे DAY-NRLM SHG चळवळीने त्यांना पाठबळ दिले आणि उपजीविकेच्या संधी निर्माण झाल्यामुळे आर्थिक स्वातंत्र्य मिळाल्याने आणि सामाजिक सक्षमीकरणामुळे त्यांना गरिबीतून बाहेर पडता आले याचे अनुभव सामाईक केले.    

 

G.Chippalkatti/S.Patil/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai(Release ID: 1917729) Visitor Counter : 368