रसायन आणि खते मंत्रालय
गोव्यातील पणजीच्या जनऔषधी केंद्राला जी-20 देशाच्या आणि युनिसेफच्या प्रतिनिधींसह डॉ.मनसुख मांडविया यांनी दिली भेट
अनेक प्रतिनिधींनी आपापल्या देशांमध्ये ही योजना लागू करण्यासाठी दाखवली उत्सुकता
Posted On:
18 APR 2023 4:41PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 एप्रिल 2023
जी -20 आरोग्यविषयक कार्यकारी गटाची दुसरी बैठक, 17 ते 19 एप्रिल 2023 या कालावधीत गोव्यात होत आहे. या बैठकीमध्ये जी -20 सदस्य देश, आमंत्रित देश आणि इतर आंतरराष्ट्रीय संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होत आहेत. या आरोग्यविषयक कार्यगटाच्या बैठकीदरम्यान, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री आणि रसायने आणि खते मंत्री डॉ. मनसुख मांडविया, यांनी ओमान, जपान, रशिया, नायजेरिया, सिंगापूर, मलेशिया येथील जी -20 प्रतिनिधींसह गोव्यातील पणजीमधल्या गव्हर्नर पेस्ताना मार्गावरील एका जनऔषधी केंद्राला भेट दिली. यावेळी युनिसेफ आणि बिल आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशनचे प्रतिनिधीही उपस्थित होते.

या जनऔषधी केंद्राच्या मालक आणि उद्योजिका प्रभा मेनन यांच्याशी मंत्री मांडवीय यांनी संवाद साधला. मेनन यांनी केंद्र चालवण्याचा आपला अनुभव सांगितला. मंत्री महोदयांनी जनऔषधी या केंद्र सरकारच्या कार्यक्रमाची माहिती दिली आणि योजनेच्या कामकाजाबाबत प्रतिनिधींनी विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. अनेक प्रतिनिधींनी असा कार्यक्रम आपापल्या देशांमध्ये लागू करण्यासाठी स्वारस्य व्यक्त केले. या योजनेत रस दाखविलेल्या मध्यम उत्पन्न आणि कमी मध्यम उत्पन्न असलेल्या देशांना मदत करण्यासाठी ‘मॉडेल’ तयार करण्याच्या दिशेने सरकार काम करत आहे. अलीकडेच परराष्ट्र मंत्रालयाच्या सहकार्याने दिल्लीत 90 हून अधिक देशांच्या निवासी मिशन प्रमुखांच्या मेळाव्यासमोर कार्यक्रमाच्या यशाविषयी सादरीकरण केले आहे. या भेटीदरम्यान मंत्री मांडवीय यांनी नमूद केले की, सरकार औषध निर्मितीच्या क्षेत्राकडे व्यापार निर्मितीचे क्षेत्र म्हणून पाहत नाही तर जागतिक सार्वजनिक हित निर्माण करणारे क्षेत्र म्हणून पाहते.
"प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी योजना" ही एक लोकप्रिय लोककल्याणकारी योजना आहे. सरकारच्या औषधनिर्माण विभाग, रसायन आणि खते मंत्रालयाव्दारे ही योजना राबविली जाते. त्यामुळे सामान्य लोकांना स्वस्त दरात दर्जेदार औषधे उपलब्ध करून दिली जातात. त्याचा लोकांच्या जीवनावर खूप चांगला, मोठा प्रभाव पडला आहे. सामान्य लोकांना ब्रँडेड औषधांपेक्षा 50-90% कमी दरामध्ये ही औषधे उपलब्ध करून दिली जातात. असतात.
गेल्या 9 वर्षात जनौषधी केंद्रांच्या संख्येत शंभरपट वाढ झाली आहे. देशात 2014 मध्ये केवळ 80 जनौषधी केंद्रे होती. आता केंद्रांची संख्या 9,300 हून अधिक झाली आहे. म्हणजेच जनौषधी केंद्रांच्या संख्येत 100 पट वाढ झाली आहे. उत्पादनाची व्याप्ती1,800 औषधे आणि 285 शस्त्रक्रिया उपकरणांपर्यंत विस्तारली आहे.गेल्या 9 वर्षांमध्ये नागरिकांची अंदाजे 20,000 कोटी रूपयांपेक्षा जास्त एकूण बचत झाली आहे.


G.Chippalkatti/S.Bedekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1917662)