आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
जी20 आरोग्य कृती गटाच्या दुसऱ्या बैठकीच्या पहिल्या दिवशी भारताच्या जी-20 आरोग्य ट्रॅकसंदर्भातील प्राधान्यक्रमांच्या बहुविध पैलूंवर विचारमंथन सत्रे
जी20 आरोग्य कृती गटाच्या दुसऱ्या बैठकीत एचईपीपीआर प्रशासन बळकट करणे आणि औषधनिर्माण क्षेत्रात सहकार्य वाढविण्यासाठी मंच निर्मितीवर चर्चा
Posted On:
17 APR 2023 7:52PM by PIB Mumbai
पणजी, 17 एप्रिल 2023
भारताच्या अध्यक्षतेखाली जी-20 समूहाच्या आरोग्य विषयक कृती गटाची दुसरी बैठक सध्या गोव्यात पणजी येथे सुरु आहे. बैठकीच्या पहिल्या दिवशी भारताच्या जी-20 आरोग्य ट्रॅकसंदर्भातील तीन प्राधान्यक्रमांच्या अनेक पैलूंबाबत विविध विचारमंथन सत्रांचे आयोजन करण्यात आले. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ.भारती प्रवीण पवार, आणि केंद्रीय पर्यटन तसेच बंदरे, नौवहन आणि जलमार्ग राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी या बैठकीच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित राहून अनुक्रमे बीजभाषण तसेच विशेष मार्गदर्शन केले.
डॉ. भारती प्रवीण पवार म्हणाल्या, “भारताचे जी-20 प्राधान्यक्रम 21व्या शतकातील अनेक आव्हानांना तोंड देण्यासाठी योग्य ठरेल अशा जबाबदार, सर्वसमावेशक, समतोल आणि प्रातिनिधिक मंचाची निर्मिती करणाऱ्या सुधारित बहुपक्षवादावर लक्ष केंद्रित करणारे आहेत.” आरोग्य आणि स्वास्थ्य विषयक पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी भारत करत असलेल्या प्रयत्नांवर भर देत केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक म्हणाले की भारत हा नेहमीच वैद्यकीय पर्यटनासाठी अग्रेसर असलेल्या ठिकाणांपैकी एक महत्त्वाचे ठिकाण ठरला आहे. यावेळी त्यांनी गेल्या काही वर्षांत भारतात झालेल्या अभिनव उपक्रमांचे तसेच डिजिटल आरोग्यसुविधा क्षेत्रातील यशोगाथांचे दर्शन घडविणाऱ्या प्रदर्शनाचे उद्घाटन देखील केले.
उद्घाटनपर सत्रानंतर, सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील तज्ञ आणि महत्त्वाच्या भागधारकांची बीजभाषणे झाली. “आरोग्यविषयक आपत्कालीन स्थितीला प्रतिबंध, सज्जता आणि प्रतिसाद (एचईपीपीआर),” या विषयावरील पहिल्या सत्रात, भारतीय सार्वजनिक आरोग्य विश्वस्त संस्था (पीएचएफआय)चे माजी अध्यक्ष आणि सुप्रसिध्द प्राध्यापक के.श्रीनाथ रेड्डी, जागतिक आरोग्य संघटनेतील एएमआरसाठीचे सहाय्यक महासंचालक डॉ.हनन एच.बाल्की तसेच जागतिक आरोग्य संघटनेच्या आरोग्यविषयक आपत्कालीन स्थिती कार्यक्रमाचे विशेष संचालक डॉ.मायकेल रायन या महत्त्वाच्या वक्त्यांची भाषणे झाली. एचईपीपीआर प्रशासन प्रणालीमध्ये सूक्ष्मजीव-विरोधी प्रतिकारशक्तीचा समावेश करणे आणि विविध प्रशासकीय पातळ्यांवर सध्याच्या एचईपीपीआर प्रयासांची तर्कसंगतता तसेच पूरकता सुनिश्चित करून अर्थपुरवठा करणे या मुद्द्यांवर यावेळी चर्चा करण्यात आली. महामारीच्या व्यवस्थापनात प्रयोगशाळांचे अत्याधुनिक जाळे आणि संबंधित पायाभूत सुविधा यांच्या मदतीसह सहयोगात्मक निरीक्षण प्रणाली उभारण्यासाठीच्या समावेशक प्रस्तावांवर देखील सदस्यांनी चर्चा केली.
दुसऱ्या सत्रात, “सुरक्षित,परिणामकारक, दर्जेदार आणि किफायतशीर प्रतिबंधक वैद्यकीय उपाययोजना मिळण्याची संधी तसेच उपलब्धता यावर लक्ष केंद्रित करून औषध निर्माण क्षेत्रातील सहकार्य बळकट करणे” या विषयावरील चर्चा विविध पातळ्यांवरील अधिक उत्तम सहयोगात्मक संबंध निर्माण करण्याच्या मुद्द्याशी संबंधित होती. वैद्यकीय उपाययोजनांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी सरकारी आणि खासगी भागीदारी असो किंवा विविध मंचाच्या समन्वयातून आंतरराष्ट्रीय सहकारी संबंध निर्माण करणे असो, प्रत्येक बाबीवर विचारमंथन करण्यात आले. नीती आयोगाच्या आरोग्य विभागाचे सदस्य डॉ.विनोद के.पॉल यांनी देशात भरभराटीला येत असलेल्या डिजिटल आरोग्यसेवा आणि औषधनिर्माण क्षेत्र यांच्यावर प्रकाश टाकला. जी-20 सदय देशांच्या ज्ञानाचा फायदा करून घेऊन एकमेकांच्या सर्वोत्तम पद्धतींचे आदानप्रदान करावे असे आवाहन त्यांनी भागधारकांना केले. ते म्हणाले की या क्षेत्रातील सहभागींनी,कोविड-19 मुळे सुरु झालेल्या उपक्रमांनी उपलब्ध करून दिलेल्या संधी आणि या उपक्रमांना मिळालेली चालना यांचा उपयोग करुन घेतला पाहिजे. जागतिक पातळीवरील वैद्यकीय प्रतिबंधक उपाययोजनांच्या संदर्भात वाढीव मदत मिळाली पाहिजे असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.
इतर महत्वाच्या वक्त्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे विशेष सल्लागार डॉ. ऑलिव्ह शिसाना, जागतिक आरोग्य संघटनेच्या महासंचालकांचे वरिष्ठ सल्लागार डॉ. ब्रुस आयलवर्ड, खाजगी क्षेत्रातील भागीदारी आणि नवोन्मेषी वित्त विभागा अंतर्गत, जी ए व्ही आय च्या रिसोर्स मोबिलायझेशनच्या व्यवस्थापकीय संचालक, श्रीमती मेरी-अँगे साराका-याओ यांचा समावेश होता. यासह ट्रोइका, सदस्य देश, आमंत्रित देश आणि आंतरराष्ट्रीय संस्था यांच्या फलदायी सूचनांचेही कौतुक करण्यात आले.
त्यानंतर सुमारे तासभर चाललेल्या सत्रात केवळ जी 20 सदस्य देशांमध्ये फलनिष्पत्ती संदर्भातील दस्तऐवजाच्या मसुद्यावर चर्चा करण्यात आली. पुराव्यावर आधारित, सर्वसमावेशक, न्याय्य, समान, पारदर्शक आणि गरजेवर आधारित उपायांद्वारेच सहमती व्हावी यावर भर देण्यात आला. या समृद्ध करणाऱ्या सत्रात विशिष्ट उपक्रम आणि उपायांवर चर्चा करण्यात आली.
या सत्रानंतर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती प्रवीण पवार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी डिजिटल आरोग्याशी निगडित भारतात आणि परदेशात अंमलात येत असलेल्या विविध सर्वोत्तम पद्धतींविषयी माहिती देणाऱ्या प्रदर्शनाला भेट दिली. गोव्याच्या समृद्ध संस्कृतीची आणि आदरातिथ्याची ओळख करून देणाऱ्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी आणि गोव्यातील फोर्ट अग्वाडा परिसरात , आयोजित केलेल्या भोजन समारंभाने पहिल्या दिवशीच्या बैठकीची सांगता झाली.
N.Chitale/Sanjana/Bhakti/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1917429)
Visitor Counter : 248