पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
परिसंस्थेचे संरक्षण आणि पुनः स्थापन केल्याने हवामान बदलाचे प्रमाण कमी होण्यास आणि त्याच्या प्रभावांचा सामना करण्यास मदत होऊ शकते- भूपेंद्र यादव
Posted On:
16 APR 2023 10:41AM by PIB Mumbai
परिसंस्थांचे संरक्षण आणि पुनः स्थापन केल्याने आपल्याला हवामान बदलाचे प्रमाण कमी करण्यास आणि त्याच्या प्रभावांचा सामना करण्यास मदत होऊ शकते, असे केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल विषयक मंत्री भूपेंद्र यादव यांनी म्हटले आहे. जपानमधील सपोरो येथे हवामान, ऊर्जा आणि पर्यावरण या विषयावरील जी 7 मंत्र्यांच्या बैठकीतील पूर्ण सत्रात ते बोलत होते. हवामान बदलाशी संबंधित समस्यांचे निराकरण आपण पर्यावरणीय कृतीसह सर्वसमावेशकपणे करणे महत्त्वाचे असून जी 7 देशांच्या हवामान, ऊर्जा आणि पर्यावरण मंत्र्यांच्या या बैठकीच्या चर्चेच्या केंद्रस्थानी हा विचार असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
हवामान बदल, मरुस्थलीकरण आणि जैवविविधता नष्ट होणे या गोष्टी एकमेकांशी घट्ट जोडल्या गेल्या आहेत आणि मानवतेसमोरील आव्हाने आहेत, असे यादव यांनी सांगितले. या आव्हानांना प्रत्युत्तर म्हणून, तत्त्वांवर आधारित, सहमत अभिमुख दृष्टिकोनातून रिओ करारांनी उल्लेखनीय प्रगती केली आहे, असे ते म्हणाले.
मॉन्ट्रियल येथील सीबीडी परिषदेत आपण जागतिक जैवविविधता आराखडा स्वीकारला आणि शर्म अल शेख येथे कॉप 27 मध्ये नुकसान आणि नुकसान निधी यासारख्या मुद्द्यांवर महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. मात्र, अजून मोठा पल्ला गाठायचा असल्याचे ते म्हणाले.
भारताने आपल्या जी -20 अध्यक्षतेखाली, हा दृष्टीकोन स्वीकारला आहे आणि जमिनीचा ऱ्हास रोखणे, परिसंस्था पुनः स्थापन करणे आणि जैवविविधता समृद्ध करणे या प्राधान्य क्षेत्रांमध्ये शमन आणि अनुकूलन समाविष्ट केले आहे, असे यादव यांनी सांगितले. हा दृष्टिकोन शाश्वत आणि नील अर्थव्यवस्थेला, संसाधन कार्यक्षमता आणि चक्रीय अर्थव्यवस्थेला चालना देतो आणि पर्यावरण पूरक जीवनशैली (लाईफ) या संकल्पनेसह हवामान बदलाचा विषय मुख्य प्रवाहात आणून महत्त्वाकांक्षी, निर्णायक आणि कृती-केंद्रित पद्धतीने हवामान बदलांच्या प्रभावांवर मार्ग काढण्यास प्रोत्साहन देतो, असे त्यांनी सांगितले.
इतिहासाचे अवलोकन केले तर भारत हा या कुठल्याही समस्येचा भाग राहिलेला नाही, मात्र उपाय योजण्यात तो सहभागी राहिलेला आहे. भारताने देशअंतर्गत कठोर योजना हाती घेतल्या आहेत, स्वतःसाठी महत्त्वाकांक्षी लक्ष्ये निश्चित केली आहेत आणि विविध उपक्रमांद्वारे आंतरराष्ट्रीय कृतींनाही भारत गती देत आहे, असे यादव म्हणाले.
प्रोजेक्ट टायगरच्या 50 वर्षांच्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय व्याघ्र कुळ आघाडीचा प्रारंभ झाला. व्याघ्रकुळ आणि त्यांच्या निवासस्थानांचे संरक्षण केल्याने पृथ्वीवरील काही सर्वात महत्वाच्या नैसर्गिक परिसंस्था सुरक्षित होऊ शकतात ज्यामुळे नैसर्गिक हवामान बदलाची प्रतिकूलता कमी होऊन लाखो लोकांसाठी पाणी आणि अन्न सुरक्षा, आणि वन समुदायांना उपजीविका आणि उदरनिर्वाह यांचे संरक्षण होऊ शकते, या वस्तुस्थितीमध्ये या आघाडीचे मूळ असल्याचे यादव यांनी सांगितले.

निर्णायक कारवाई करण्यासाठी देश-आधारित दृष्टीकोन सुनिश्चित करणे महत्त्वाचे आहे. संपूर्ण जगावर परिणाम करणारे निर्णय घेत असताना कोणीही पिछाडीवर राहणार नाही, याची सुनिश्चिती आवश्यक असल्याचे यादव यांनी सांगितले.
****
Mahesh C/Sonali/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1917086)
Visitor Counter : 286