विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

देशात गेल्या 9 वर्षात स्टार्टअप्सची संख्या 300 पटीने वाढली : केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह

Posted On: 10 APR 2023 5:40PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 10 एप्रिल 2023

 

केंद्रीय राज्यमंत्री विज्ञान आणि तंत्रज्ञान (स्वतंत्र प्रभार) राज्य मंत्री  डॉ जितेंद्र सिंह यांनी आज नवी दिल्लीत बोलताना सांगितले की, गेल्या 9 वर्षांत भारतात स्टार्टअप्सची संख्या  300 पटीने वाढली आहे.

राष्ट्रपती भवनात आयोजित एका कार्यक्रमात, केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या वतीने देण्यात येणारे,  “राष्ट्रीय नवोन्मेष पुरस्कार”  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते “ग्रासरूट इनोव्हेटरना ” प्रदान करण्यात आले, या कार्यक्रमात डॉ. जितेंद्र सिंह बोलत होते.

देशात 2014 पूर्वी सुमारे 350 स्टार्टअप्स होते, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून केलेल्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणातून आवाहन केल्यांनतर आणि 2016 मध्ये विशेष स्टार्टअप योजना आणल्यानंतर, 100 पेक्षा जास्त युनिकॉर्नसह स्टार्टअप्समध्ये लक्षणीय  वाढ होऊन ही संख्या 90,000 हून अधिक  झाली आहे, असे त्यांनी सांगितले.

त्याचबरोबर  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  अंतराळ क्षेत्र खाजगी सहभागासाठी खुले केल्यामुळे अवघ्या तीन वर्षात अंतराळ क्षेत्रात 100 पेक्षा अधिक  स्टार्टअप्स  सुरु झाले आहेत. त्याचप्रमाणे जैव तंत्रज्ञानाशी निगडीत  स्टार्टअप्सची संख्या 50 वरून सुमारे 6,000 वर गेली, अशी माहिती डॉ. जितेंद्र सिंह यांनी दिली.

भारतातील  तरुणांमध्ये प्रतिभा, क्षमता, नवोन्मेष  आणि सर्जनशीलतेची कमतरता नव्हती, मात्र त्यांना  राजकीय नेतृत्वाकडून पोषक वातावरण आणि योग्य आर्थिक आधाराची गरज  होती, ती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पूर्ण केली असे, डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितले. तसेच  आपल्या  ग्रामीण तरुणांमध्येही मोठ्या प्रमाणात नाविन्यपूर्ण प्रतिभा आहे तसेच  औपचारिक शिक्षण पदवी आणि नवोन्मेषाची क्षमता यांचा परस्परांशी  कोणताही संबंध नाही, हे आजच्या पुरस्कारांवरून स्पष्ट होते, असे ते म्हणाले. पंतप्रधान मोदी यांनी  राष्ट्रीय शिक्षण  धोरण 2020 आणून या मुद्द्यांकडे  लक्ष वेधले आहे. हे शिक्षण धोरण  केवळ शैक्षणिक पदवीवरच नव्हे तर कौशल्यावर भर देते तसेच  व्यक्तीला त्याच्या योग्यतेनुसार आणि कौशल्यानुसार उपजीविकेचे साधन  मिळवण्यासाठी तयार करते, असे त्यांनी सांगितले.

ज्यांच्याकडे खूप उच्च औपचारिक शिक्षण नसले तरी आपली यशोगाथा तयार करण्यासाठी  आणि स्वत:साठी उपजीविकेचे आकर्षक साधन निर्माण करण्यास सक्षम असणारे ' तळागाळातील नवोन्मेषक' भारतात मोठ्या संख्येने उपलब्ध आहेत, हे आज देण्यात आलेल्या पुरस्कारांचे स्वरूप आणि पुरस्कार विजेत्यांच्या  व्यक्तिरेखेवरून  सिद्ध होते , असे त्यांनी नमूद केले.

"नवोन्मेष  आणि उद्यमशीलता" (एफआयएनई) महोत्सव आयोजित केल्याबद्दल डॉ जितेंद्र सिंह  यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग आणि राष्ट्रीय नवोन्मेष फाउंडेशनच्या  (एनआयएफ )  प्रयत्नांची  प्रशंसा केली. औपचारिक अर्थाने उच्चशिक्षित नाहीत किंवा विज्ञानाचे विद्यार्थी नाहीत तरी ज्यांच्याकडे उपजत प्रतिभा आणि नवोन्मेष तसेच उद्यमशीलतेची  जन्मजात योग्यता आहे, आणि हे  त्यांच्यासाठी उपजीविकेचे साधन देखील बनू शकते,अशा लोकांमध्येही विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेषला प्रोत्साहन देण्याचा हा एक अनोखा प्रयत्न आहे, असे त्यांनी सांगितले.

राष्ट्रीय स्तर, राज्य स्तर आणि विद्यार्थी श्रेणी अशा विविध श्रेणींमध्ये पुरस्कार प्रदान करण्यात आले. आज पुरस्कार प्राप्त  दोघांना त्यांच्या नवोन्मेषासाठी यापूर्वीच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

 

* * *

N.Chitale/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1915367) Visitor Counter : 205


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu