पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी तामिळनाडूमध्ये चेन्नई येथे केली विविध प्रकल्पांची पायाभरणी आणि राष्ट्रार्पण


3700 कोटी रुपयांच्या रस्ते प्रकल्पांचे केले उद्घाटन आणि पायाभरणी

थिरुथुराईपुंडी आणि अगस्थीयाम्पल्ली यामधील 37 किलोमीटर लांबीच्या गेज रुपांतरणाचे केले उद्घाटन

तंबारम आणि सेनगोट्टाई दरम्यानच्या एक्स्प्रेस सेवेला आणि थिरुथुराईपुंडी ते अगस्थीयाम्पल्ली डेमू सेवेला  झेंडा  दाखवून केले रवाना

“तामिळनाडू हे इतिहास आणि वारशाचे माहेर आहे आणि भाषा आणि साहित्याची भूमी आहे”

“यापूर्वी पायाभूत सुविधा प्रकल्प म्हणजे ‘डिले’(विलंब) असा अर्थ होता आणि आता याचा अर्थ आहे ‘डिलिव्हरी’(पूर्तता)

“करदाते देत असलेल्या प्रत्येक रुपयासाठी उत्तरदायी असल्याची सरकारची भावना आहे”

“आम्ही पायाभूत सुविधांकडे मानवी चेहऱ्यासह पाहतो, आकांक्षांची साध्यतांबरोबर, लोकांची शक्यतांबरोबर आणि स्वप्नांची वास्तविकतेबरोबर त्या सांगड घालतात”

“तामिळनाडूचा विकास सरकारसाठी अतिशय जास्त प्राधान्याचा आहे”

“चेन्नई  आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नव्या एकात्मिक टर्मिनल इमारतीच्या रचनेतून तामिळ संस्कृतीच्या सौंदर्याचे दर्शन घडते”

“तामिळनाडू हे भारताच्या विकासाच्या इंजिनापैकी एक आहे”

Posted On: 08 APR 2023 8:54PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तामिळनाडूमध्ये अल्स्ट्रॉम क्रिकेट ग्राऊंडवर विविध प्रकल्पांची पायाभरणी आणि राष्ट्रार्पण केले. त्यापूर्वी पंतप्रधानांनी चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नव्या एकात्मिक टर्मिनल इमारतीचे( टप्पा-1) उद्घाटन केले आणि चेन्नईमध्ये चेन्नई-कोईम्बतूर दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसला झेंडा दाखवून रवाना केले.

उपस्थित समुदायाला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की तामिळनाडू हे इतिहास आणि वारशाचे आलय आहे आणि भाषा आणि साहित्याची भूमी आहे. आपल्या स्वातंत्र्य सेनानींपैकी अनेक जण तामिळनाडूमधील असल्याची बाब अधोरेखित करत पंतप्रधान म्हणाले की हे राज्य देशभक्ती आणि राष्ट्रीय चेतनेचे केंद्र आहे. तामिळनाडू पुथांडू तोंडावर आहे आणि आणि हा काळ नवी ऊर्जा, आशा, आकांक्षा आणि नव्या प्रारंभाचा आहे असे पंतप्रधानांनी नमूद केले.

आजपासून अनेक नवे पायाभूत सुविधा प्रकल्प लोकांची सेवा सुरू करतील तर काही प्रकल्पांची सुरुवात ते अनुभवतील, पंतप्रधानांनी रेल्वे, रस्ते आणि हवाई मार्ग यांच्याशी संबधित प्रकल्प नव्या वर्षाचा आनंद द्विगुणित करतील अशी अपेक्षा व्यक्त केली.

वेग आणि प्रमाण यांच्या मदतीने होत असलेल्या पायाभूत सुविधा क्रांतीचा भारत अनुभव घेत असल्याची बाब पंतप्रधानांनी अधोरेखित केली.  प्रमाणाचा संदर्भ देताना त्यांनी माहिती दिली की या वर्षीच्या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांच्या विकासासाठी 10 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे जी 2014च्या अर्थसंकल्पीय तरतुदीच्या पाचपट आहे, तर रेल्वेच्या पायाभूत सुविधांसाठी देखील विक्रमी निधीची तरतूद करण्यात आली आहे, असे ते म्हणाले. वेगाविषयी बोलताना पंतप्रधानांनी माहिती दिली की 2014 पासून राष्ट्रीय महामार्गाच्या वार्षिक लांबीत पडणारी भर दुप्पट झाली आहे. रेल्वेमार्गाच्या विद्युतीकरणाचे वार्षिक प्रमाण 600 रुट किलोमीटरवरून 4000 रुट किलोमीटर इतके वाढले आहे आणि विमानतळांची संख्या 74 वरून जवळजवळ 150 पर्यंत पोहोचली आहे.व्यापारासाठी फायदेशीर असलेल्या तामिळनाडूच्या विशाल किनारपट्टीचा संदर्भ देत पंतप्रधानांनी माहिती दिली की 2014 पासून बंदरांच्या क्षमतेत देखील दुप्पट वाढ करण्यात आली आहे.

यावेळी पंतप्रधानांनी देशातील सामाजिक आणि डिजिटल पायाभूत सुविधांच्या विषयावर देखील प्रकाश टाकला आणि माहिती दिली की देशातील वैद्यकीय महाविद्यालयांच्या संख्येत 2014 पूर्वीच्या 380 वरून वाढ होत ही संख्या आज 660 वर पोहोचली आहे. गेल्या नऊ वर्षात देशाने तयार होणाऱ्या ऍपच्या संख्येत तिप्पट वाढ केली आहे, डिजिटल व्यवहारात जगात पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे, जगातील सर्वात स्वस्त मोबाईल डेटाधारक देशांपैकी एक बनला आहे, सुमारे 2 लाख ग्राम पंचायतींना जोडणारे सहा लाख किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचे ऑप्टिकल फायबरचे जाळे बसवले आहे, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली.

कार्य संस्कृती आणि दृष्टीकोन यातील बदलांचा परिणाम म्हणून हे सकारात्मक बदल दिसत आहेत असे पंतप्रधानांनी नमूद केले. यापूर्वी पायाभूत सुविधा प्रकल्प म्हणजे डिले असा अर्थ होता पण आता त्याचा अर्थ डिलिव्हरी झाला आहे आणि डिलेकडून डिलिव्हरीकडे झालेला हा प्रवास कार्यसंस्कृतीचा परिणाम आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. पंतप्रधानांनी यावर भर दिला की करदाते चुकवत असलेल्या प्रत्येक रुपयासाठी आपण उत्तरदायी आहोत अशी सरकारची भावना आहे. तर निर्धारित कालमर्यादेच्या आधीच काम पूर्ण करण्यासाठी सरकार काम करत आहे.पूर्वीच्या सरकारांच्या दृष्टीकोनातील फरकावर प्रकाश टाकताना पंतप्रधानांनी सांगितले की पायाभूत सुविधांकडे केवळ काँक्रिट, विटा आणि सिमेंट म्हणून पाहिले जात नाही तर आकांक्षाना साध्यतेसोबत, लोकांना शक्यतांसोबत आणि स्वप्नांना वास्तवासोबत जोडणाऱ्या मानवी चेहऱ्याच्या माध्यमातून पाहिले जात आहे.

आजच्या प्रकल्पांचे उदाहरण देताना पंतप्रधानांनी ही बाब अधोरेखित केली की रस्ते प्रकल्पांपैकी एक प्रकल्प विरुद्धनगर आणि तेनकाशी येथील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना इतर बाजारपेठांशी जोडत आहे, चेन्नई आणि कोईम्बतूर दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस लहान व्यवसायांना ग्राहकांशी जोडत आहे आणि चेन्नई विमानतळावरील नवे टर्मिनल जगाला तामिळनाडूमध्ये आणत आहे. ते पुढे म्हणाले की यामुळे गुंतवणूक आकर्षित होणार आहे जी येथील युवकांसाठी नव्या संधी निर्माण करेल. गती प्राप्त करणारी ही केवळ वाहने नाहीत तर लोकांची स्वप्ने आणि उद्यमशीलतेच्या भावनेला देखील गती मिळणार आहे. अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे, पंतप्रधान म्हणाले. प्रत्येक पायाभूत सुविधा प्रकल्प कोट्यवधी कुटुंबांच्या जीवनात परिवर्तन घडवतो असे त्यांनी अधोरेखित केले.

तामिळनाडूच्या विकासाला सरकारचे मोठे प्राधान्य आहे" असे सांगून पंतप्रधान म्हणाले की, या वर्षीच्या अर्थसंकल्पात रेल्वेच्या पायाभूत सुविधांसाठी 6,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधीची तरतूद या राज्यासाठी करण्यात आली आहे. ते पुढे म्हणाले की 2009-2014 दरम्यान दरवर्षी तरतूद करण्यात आलेली सरासरी रक्कम 900 कोटी रुपयांपेक्षा कमी होती. तसेच 2004 ते 2014 दरम्यान तामिळनाडूमध्ये बांधण्यात  आलेल्या राष्ट्रीय महामार्गांची लांबी सुमारे 800 किलोमीटर होती , मात्र 2014 ते 2023 या कालावधीत  जवळपास 2000 किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्ग बांधण्यात आले असे पंतप्रधान  म्हणाले. तामिळनाडूमधील राष्ट्रीय महामार्गांच्या विकास आणि देखभालीतील गुंतवणुकीबाबत बोलताना  पंतप्रधान म्हणाले की, 2014-15 मध्ये सुमारे 1200 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते, तर 2022-23 मध्ये त्यात  6 पट वाढ करून  8200 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करण्यात आला आहे.

पंतप्रधानांनी गेल्या काही वर्षांत तामिळनाडूमधील  महत्त्वाच्या प्रकल्पांची संख्या अधोरेखित केली आणि देशाची सुरक्षा मजबूत करणारा संरक्षण औद्योगिक कॉरिडॉर पीएम  मित्र मेगा टेक्सटाईल पार्क आणि बंगळुरू-चेन्नई एक्स्प्रेस वेची पायाभरणी यांचा उदाहरण म्हणून उल्लेख केला.ते पुढे म्हणाले की, भारतमाला प्रकल्पांतर्गत ममल्लापुरम ते कन्याकुमारी हा संपूर्ण पूर्व किनारी  मार्ग सुधारला  जात असून चेन्नईजवळ मल्टी-मॉडल लॉजिस्टिक पार्कचे बांधकामही सुरू आहे.

ज्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन किंवा प्रारंभ करण्यात आला आहे त्यांचा थेट लाभ चेन्नई, मदुराई आणि कोईमतूर  या तीन महत्त्वाच्या शहरांना  होत असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज उद्घाटन केलेल्या नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीचा  त्यांनी उल्लेख केला आणि ही इमारत वाढत्या प्रवाशांची मागणी पूर्ण करेल असे सांगितले. विमानतळाच्या रचनेमध्ये  तमिळ संस्कृतीचे सौंदर्य प्रतिबिंबित होते असे पंतप्रधान म्हणाले. "छत, जमीन , सिलिंगची रचना असो किंवा भित्तीचित्रे, त्यातील प्रत्येक गोष्ट तमिळनाडूच्या कोणत्या ना कोणत्या पैलूची आठवण करून देते. " विमानतळामध्ये परंपरेचे दर्शन घडत असून शाश्वततेच्या आधुनिक गरजा लक्षात घेऊन त्याचे बांधकाम करण्यात आले आहे.तसेच  ते पर्यावरण-स्नेही साहित्य वापरून तयार केले  आहे आणि एलईडी लाइटिंग आणि सौर ऊर्जा यांसारख्या अनेक हरित  तंत्रांचा देखील वापर केला आहे  असे त्यांनी नमूद केले .  आज सुरु करण्यात आलेल्या चेन्नई-कोईमतूर वंदे भारत एक्स्प्रेसचा त्यांनी उल्लेख केला . ते  म्हणाले की महान व्ही ओ  चिदंबरम पिल्लई यांच्या भूमीत मेड इन इंडियाचा हा अभिमानास्पद उपक्रम  अगदी स्वाभाविक आहे.

कोईमतूर हे एक औद्योगिक सत्ताकेंद्र आहे, मग ते वस्त्रोद्योग  क्षेत्र असेल, एमएसएमई किंवा उद्योग असतील , आधुनिक कनेक्टिव्हिटीमुळे तेथील लोकांची उत्पादकता वाढेल  आणि वंदे भारत एक्सप्रेसमुळे चेन्नई आणि कोईमतूर दरम्यानचा प्रवास फक्त 6 तासांचा असेल अशी माहिती त्यांनी दिली. सालेम, इरोड आणि तिरुपूर सारख्या वस्त्रोद्योग  आणि औद्योगिक केंद्रांनाही याचा फायदा होईल, असे ते म्हणाले. मदुराईचा उल्लेख करताना  पंतप्रधान म्हणाले की, हे शहर तामिळनाडूची सांस्कृतिक राजधानी आहे आणि जगातील सर्वात प्राचीन शहरांपैकी एक आहे. आज सुरु करण्यात आलेले  प्रकल्प या प्राचीन शहराच्या आधुनिक पायाभूत सुविधांना चालना देतील असे ते म्हणाले .

भाषणाचा समारोप करताना, पंतप्रधानांनी तामिळनाडू हे भारताच्या  विकास इंजिनांपैकी एक असल्याचा पुनरुच्चार केला. जेव्हा उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधांमुळे येथे नोकऱ्या निर्माण होतात, तेव्हा उत्पन्न वाढते आणि तामिळनाडूचाही विकास होतो.  जेव्हा तामिळनाडूचा विकास होतो  तेव्हा भारताचा विकास होतो असे पंतप्रधान म्हणाले.

तामिळनाडूचे राज्यपाल आर एन रवी, तमिळनाडूचे मुख्यमंत्री  एम के स्टॅलिन आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय आणि माहिती आणि प्रसारण  राज्यमंत्री आणि  श्रीपेरुम्बुदूरचे खासदार  एल मुरुगन , टी. आर. बालू आणि तमिळनाडू सरकारचे मंत्री यावेळी उपस्थित होते.

 

पार्श्वभूमी

पंतप्रधानांनी सुमारे 3700 कोटी रुपये खर्चाच्या रस्ते प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. पंतप्रधानांनी मदुराई शहरातील 7.3 किमी लांबीच्या उन्नत कॉरिडॉरचे आणि राष्ट्रीय महामार्ग 785 च्या 24.4 किमी लांबीच्या चौपदरी रस्त्याचे उद्घाटन केले. पंतप्रधानांनी राष्ट्रीय महामार्ग-744 च्या रस्ते प्रकल्पांच्या बांधकामाची पायाभरणीही केली. 2400 कोटींहून अधिक किमतीच्या या प्रकल्पामुळे  तमिळनाडू आणि केरळमधील आंतर-राज्य कनेक्टिव्हीटी वाढेल  तसेच मदुराईमधील मीनाक्षी मंदिर, श्रीविल्लीपुथूरमधील अंदाल मंदिर आणि केरळमधील शबरीमाला मंदिराला भेट देणाऱ्या यात्रेकरूंसाठी सुलभ  प्रवास सुनिश्चित करेल.

294 कोटी रुपये खर्चून बांधकाम  पूर्ण झालेल्या थिरुथुरैपुंडी आणि अगस्तियामपल्ली दरम्यानच्या 37 किलोमीटरच्या गेज रूपांतरण टप्प्याचे  उद्घाटनही पंतप्रधानांनी केले. नागपट्टिनम जिल्ह्यातील अगस्तियामपल्ली येथील खाद्य आणि औद्योगिक मीठाच्या वाहतुकीला याचा फायदा होईल.

पंतप्रधानांनी तांबरम ते सेनगोटाई दरम्यान एक्सप्रेस सेवेला हिरवा झेंडा दाखवला. तसेच थिरुथुरैपुंडी - अगस्तियामपल्ली येथून डिझेल इलेक्ट्रिक मल्टीपल युनिट (DEMU) सेवेला त्यांनी हिरवा झेंडा दाखवला. कोईमतूर, तिरुवरूर आणि नागपट्टिनम जिल्ह्यांतील प्रवाशांना याचा फायदा होईल.

***

N.Chitale/S.Patil/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1914985) Visitor Counter : 175