आयुष मंत्रालय
जागतिक होमिओपॅथी दिनानिमित्त आयुष मंत्रालय वैज्ञानिक संमेलनाचे आयोजन करणार
प्रविष्टि तिथि:
08 APR 2023 2:03PM by PIB Mumbai
केंद्रीय आयुष मंत्रालय अंतर्गत केंद्रीय होमिओपॅथी संशोधन परिषद जागतिक होमिओपॅथी दिनानिमित्त 10 एप्रिल 2023 रोजी, नवी दिल्ली येथे वैज्ञानिक संमेलनाचे आयोजन करणार आहे. उपराष्ट्रपती जगदीप धनखड वैज्ञानिक संमेलनाचे उद्घाटन करतील तर आयुष आणि बंदरे, जहाज व जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. आयुष आणि महिला आणि बालविकास राज्यमंत्री डॉ. मुंजपारा महेंद्रभाई, खासदार डॉ. मनोज राजोरिया आणि आयुष सचिव वैद्य राजेश कोटेचा हे देखील उपस्थित राहणार आहेत.
होमिओपॅथीचे संस्थापक डॉ. क्रिस्तियन फ्रेडरिक सॅम्युअल हॅनेमन यांच्या जयंतीनिमित्त जागतिक होमिओपॅथी दिन पाळला जातो. डॉ. क्रिस्तियन फ्रेडरिक सॅम्युअल हॅनेमन यांच्या 268 व्या जयंतीनिमित्त आयोजित यंदाच्या वैज्ञानिक संमेलनाची संकल्पना ‘होमियोपरिवार - सर्वजन स्वास्थ्य, एक आरोग्य, एक कुटुंब’ अशी आहे.
संमेलनाला येणाऱ्या प्रतिनिधींमध्ये होमिओपॅथिक संशोधक, आंतरविद्याशाखेतील शास्त्रज्ञ, अभ्यासक, विद्यार्थी, उद्योजक तसेच विविध होमिओपॅथिक संघटनांचे प्रतिनिधी यांचा समावेश असेल. सीसीआरएच आणि विविध होमिओपॅथी महाविद्यालये तसेच सीसीआरएच आणि केरळ सरकारचे होमिओपॅथी संचालनालय यांच्यात सामंजस्य करारांचे आदानप्रदान होईल. यावेळी एक माहितीपट, एक पोर्टल आणि सीसीआरएचच्या 8 पुस्तकांचे प्रकाशनही करण्यात येणार आहे.
संमेलनादरम्यान, धोरणात्मक बाबी, होमिओपॅथीमधील प्रगती, संशोधन संबंधी पुरावे आणि होमिओपॅथीमधील क्लिनिकल अनुभव यावर विविध सत्रे आयोजित केली जातील. विज्ञान भवनातील या प्रारंभिक कार्यक्रमानंतर भारतातील पाच ठिकाणी विभागीय जागतिक होमिओपॅथी दिन कार्यक्रम होतील. विविध महत्त्वपूर्ण भागधारकांच्या विचारमंथनाच्या माध्यमातून हे वैज्ञानिक संमेलन संशोधन, शिक्षण आणि एकात्मिक सेवेत होमिओपॅथिच्या एकत्रीकरणासाठी भविष्यातील रुपरेषेच्या दृष्टीने उपयुक्त सूचना उपलब्ध करून देईल.
***
N.Chitale/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1914851)
आगंतुक पटल : 253