आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
गोव्याच्या आरोग्य क्षेत्रातल्या कामगिरीचे दुसऱ्या जी-20 आरोग्य कार्यगटाच्या बैठकीपूर्वी प्रदर्शन
आयुष्मान भारत डिजिटल आरोग्य अभियान आणि प्रधानमंत्री राष्ट्रीय डायलेसिस अभियानाची यशस्वी अंमलबजावणी अधोरेखित
प्रविष्टि तिथि:
04 APR 2023 5:52PM by PIB Mumbai
गोवा, 4 एप्रिल 2023
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने, गोवा सरकारच्या आरोग्य सेवा संचालनालयाशी भागीदारी करत, राज्यातील असाधारण कामगिरी करणाऱ्या प्राथमिक आरोग्य सेवा केंद्रांचा (PHC) विशेष दौरा आयोजित केला होता. जी-20 आरोग्य कार्यगटाच्या17-19 एप्रिल 2023 या कालावधीत गोव्यात नियोजित दुसऱ्या बैठकीपूर्वी युनिसेफच्या पाठबळाने हा दौरा आयोजित करण्यात आला होता. या दौऱ्यात राष्ट्रीय आणि स्थानिक माध्यमांचे प्रतिनिधीही सहभागी झाले होते.

भारताच्या जी 20 अध्यक्षपदाच्या कार्यकाळात, आरोग्य क्षेत्रातील, तीन ट्रॅक प्राधान्याने निश्चित करण्यात आले आहेत. यात, आरोग्यविषयक आपत्कालीन सज्जता आणि प्रतिबंध; औषधनिर्माण क्षेत्रातील सहकार्य अधिक दृढ करणे आणि डिजिटल आरोग्यविषयक अभिनव प्रयोग आणि उपाय यांचा समावेश आहे. या दौऱ्यात सहभागी झालेल्या प्रतिनिधींना, डिजिटल आरोग्य क्षेत्रात भारताने अभिनव प्रयोग करून मिळवलेले यश, जसे की खोर्ली इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात राबवले जाणारे आयुष्मान भारत डिजिटल आरोग्य अभियान आणि आयब्रेस्ट डिव्हाईस द्वारे,स्वस्थ महिला स्वस्थ गोवा कार्यक्रमांतर्गत तंत्रज्ञान नवोन्मेश यांचा यात समावेश होता.क्रिकेटपटू युवराज सिंह यांच्या यूवीकॅन (YouWeCan) समर्थित उपक्रमाद्वारे तंत्रज्ञानविषयक प्रयोग करत, धारबांदोडा इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात, स्तनांच्या कर्करोगासाठीची तपासणी केली जाते.

कोरलिम इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात, आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट्स (ABHA) च्या निर्मितीसह हॉस्पिटल मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम (ई-सुश्रुत) चा अवलंब आणि वापर कसा करायचा यांचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. केंद्रीकृत नोंदणी, जनरल ओपीडी म्हणजेच बाह्य रुग्ण विभाग, फिजिओथेरपी, डेंटल ओपीडी, ऑप्थॅल्मिक ओपीडी, आयुर्वेदिक ओपीडी, फार्मसी आणि ई-सुश्रुत प्रयोगशाळेचे प्रदर्शन देखील यावेळी करण्यात आले.या प्राथमिक आरोग्य केंद्रात टोकन देण्यापासून ते औषधांची यादी आणि औषध वितरणापर्यंत संपूर्ण प्रक्रिया डिजिटली साध्य केली आहे. यामुळे आरोग्यसेवेसाठी अखंड आणि निर्वेध प्रवेशाची हमी प्राप्त झाली आहे.

त्याचप्रमाणे धारबोंदरा इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात स्तनाच्या कर्करोगाची सुलभरित्या तपासणी करणारे, iBreast हे उपकरण सदर करण्यात आले. हे उपकरण अल्ट्रा-पोर्टेबल आहे, त्याद्वारे वेदनारहित आणि रेडिएशन-मुक्त चाचणीचे व्यवस्थापन केले जाते आणि त्याचा अहवाल त्वरित तयार केला जाऊ शकतो. प्राथमिक आरोग्य केंद्राद्वारे ही सेवाही दिली जात आहे हा अधिकचा फायदा आहे.
या दौऱ्यात, प्रधानमंत्री राष्ट्रीय डायलिसिस कार्यक्रमाची यशस्वी अंमलबजावणी देखील दाखवण्यात आली. पीएमडीएनपी पोर्टलवर, राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत राज्यात कार्यरत असलेल्या सर्व डायलिसिस केंद्रांना एकत्रित करण्यात आले असून त्याद्वारे मूत्रपिंड नोंदणी तयार केली जात आहे. तसेच एक राज्य एक डायलिसिस अंतर्गत राज्यात आणि नंतर संपूर्ण देशात (एक राष्ट्र-एक डायलिसिस) पोर्टेबिलिटी सुनिश्चित केली जाते. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि दीनदयाल स्वास्थ्य सेवा योजनेंतर्गत राज्यातील रुग्णांना मोफत डायलिसिस सेवा दिली जाते. राज्यात सध्या विविध प्राथमिक आरोग्य केंद्रात 100 पेक्षा जास्त डायलिसिस मशिन्स असून त्याद्वारे सुरक्षित आणि सर्वांना पडवणारी डायलेसिस सेवा दिली जाते.

या दौऱ्यामुळे आरोग्यविषयक उपाययोजनांबाबत भारताची वचनबद्धता अधोरेखित झाली तसेच आरोग्यसेवेतील भारताची कामगिरी, विशेषत: डिजिटल आरोग्य विषयक नवोन्मेष आणि समस्यांवरील उपाय दाखविण्याची संधी मिळाली. जी20 आरोग्य विषयक गटाच्या दुसऱ्या बैठकीचे गोव्याचे आयोजन होणार असून, हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. आरोग्यविषयक क्षेत्रात, निश्चित करण्यात आलेल्या प्राधान्यक्रमांवरील चर्चेचे नेतृत्व करण्यासाठी आज भारत सज्ज आहे.
* * *
PIB Panaji | N.Chitale/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1913606)
आगंतुक पटल : 319