पर्यटन मंत्रालय
पश्चिम बंगालमध्ये सिलिगुडी येथे दुसऱ्या जी-20 पर्यटन कार्यगटाच्या बैठकीचे उद्घाटन सत्र संपन्न
भारताला 2047 पर्यंत एक ट्रिलियन डॉलर पर्यटन अर्थव्यवस्था बनवण्याचे स्वप्न आहे- जी किशन रेड्डी
Posted On:
02 APR 2023 10:21PM by PIB Mumbai
पश्चिम बंगालमध्ये सिलिगुडी येथे दुसऱ्या जी-20 पर्यटन कार्यगटाच्या बैठकीचे उद्घाटन सत्र आज सकाळी पार पडले. केंद्रीय पर्यटन, संस्कृती आणि ईशान्य प्रदेश विकास मंत्री जी किशन रेड्डी यांनी उद्घाटन कार्यक्रमाला संबोधित केले. अल्पसंख्याक व्यवहार राज्यमंत्री जॉन बारला, दार्जिलिंगचे खासदार राजू बिस्ता देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.

आपल्या उद्घाटनपर भाषणात केंद्रीय पर्यटन, संस्कृती आणि ईशान्य प्रदेश विकास मंत्री जी किशन रेड्डी यांनी सर्व सहभागींचे सिलिगुडीच्या सुंदर शहरात स्वागत केले. विविधता, संस्कृती, परंपरा आणि सौंदर्य यांचे दुर्मिळ मिश्रण सिलिगुडीमध्ये आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. ईशान्येचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाणारे हे ठिकाण विविध मठ आणि मंदिरात मिळणाऱ्या आध्यात्मिकतेचा अनुभव, राष्ट्रीय उद्यानातील वन्यजीव आणि निसर्गसौंदर्य, कॅम्पिंग आणि राफ्टिंगच्या स्वरुपात साहसी पर्यटन यांसारखे प्रवासाचे अतिशय आश्चर्यकारक अनुभव देते, असे त्यांनी सांगितले.

या बैठकीत चर्चिल्या जाणाऱ्या कल्पनांमुळे पर्यटनाचा विकास एखाद्या मोहिमेच्या स्वरुपात होण्यास मदत मिळेल, असे जी किशन रेड्डी यांनी सोहळ्यात संबोधित करताना सांगितले. भारतीय पर्यटनाच्या वेगळेपणाला चालना देण्यासाठी देश ‘ व्हिजिट इंडिया ईयर 2023’ साजरे करत आहे जी संपूर्ण जगाला भारताची जी-20 अध्यक्षता आणि भारतीय स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल दिमाखदार पद्धतीने साजरे होत असलेले वर्ष यांची पार्श्वभूमी असलेल्या या ऐतिहासिक वर्षात भारताविषयी जाणून घेण्यासाठी आमंत्रित करणारी वैशिष्ट्यपूर्ण आणि सामुदायिक चळवळ आहे.
भारताला 2047 पर्यंत आमच्या स्वातंत्र्याच्या 100व्या वर्षात एक ट्रिलियन डॉलर पर्यटन अर्थव्यवस्था बनवण्याचे स्वप्न आहे, अशी घोषणा जी किशन रेड्डी यांनी केली.
जी. किशन रेड्डी यांनी पर्यटन उद्योगाचे डिजिटलीकरण करण्याची गरज व्यक्त केली जो पर्यटन कार्यगटाचा देखील प्राधान्याचा विषय आहे. किनारा पर्यटन, वन्यजीव पर्यटन, साहसी पर्यटन, सांस्कृतिक पर्यटन, ग्रामीण पर्यटन, पुरातत्वशास्त्रीय पर्यटन, आध्यात्मिक पर्यटन, डेस्टीनेशन वेडिंग्ज सारख्या महत्त्वपूर्ण क्षेत्रांवर भारताने आपले लक्ष केंद्रित केले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.



***
S.Kane/S.Patil/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1913150)
Visitor Counter : 223