ऊर्जा मंत्रालय

दुसऱ्या जी-20 ऊर्जा संक्रमण कार्यगटाच्या बैठकीला गांधीनगरमध्ये प्रारंभ

Posted On: 02 APR 2023 8:20PM by PIB Mumbai

 

भारताच्या जी-20 अध्यक्षतेखाली दुसऱ्या जी-20 ऊर्जा संक्रमण कार्यगटाच्या बैठकीचा आज गांधीनगरमध्ये प्रारंभ झाला. केंद्रीय आयुष आणि महिला आणि बालविकास राज्यमंत्री डॉ. मुंजपारा महेंद्रभाई काळुभाई यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात जागतिक तापमानवाढ, हवामानबदल आणि ऊर्जा सुरक्षेसंदर्भात तातडीच्या आणि प्रभावी उपाययोजना शोधण्याबाबत भारताच्या जी-20 अध्यक्षतेच्या वचनबद्धतेवर भर दिला.

स्वच्छ ऊर्जानिर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि ती किफायतशीर आणि विश्वासार्ह बनवण्यासाठी नवोन्मेषी तंत्रज्ञानाविषयीचे संशोधन आणि विकास याच्या आवश्यकतेवर त्यांनी भर दिला.

जी-20 सदस्य देश, विशेष निमंत्रित देश आणि आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्था (IEA), संयुक्त राष्ट्रांचा आशिया आणि प्रशांत क्षेत्रासाठी आर्थिक आणि सामाजिक आयोग(UNESCAP), असियान आणि पूर्व आशियासाठी  युरोपियन संशोधन संस्था(ERIA), पेट्रोलियम निर्यातदार देशांची संघटना(OPEC) आणि आंतरराष्ट्रीय सौर आघाडी (ISA) यांच्यासह आंतरराष्ट्रीय संघटनांचे 100 पेक्षा जास्त प्रतिनिधी यामध्ये प्राधान्यक्रमाच्या क्षेत्रांबाबत चर्चा आणि विचारविनिमय करण्यासाठी सहभाग घेत आहेत.

उद्घाटन समारंभादरम्यान केंद्रीय मंत्र्यांनी 'LiFE मोहीम किंवा पर्यावरणासाठी जीवनशैली या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या संकल्पनेचे महत्त्व स्पष्ट केले. संसाधनांच्या विवेकी आणि पुरेपूर वापरासाठी, पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय लोकचळवळ उभारण्याचे आवाहन त्यांनी व्यक्ती आणि समुदायांना केले. भारत सरकारचे ऊर्जा मंत्री आलोक कुमार यांनी न्याय्य, परस्परांमध्ये वाटप होणाऱ्या आणि समावेशक विकासाला चालना देण्यासाठी जी-20 सदस्यांमध्ये एकत्रित कृतीचे महत्त्व विचारात घेण्याच्या आवश्यकतेवर भर दिला. स्वच्छ ऊर्जा संक्रमणाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विश्वस्तवृत्तीची भावना निर्माण करण्याचे आणि सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी सदस्य देशांना केले. ग्रीन हायड्रोजन मिशन, ऊर्जा संक्रमण, ऊर्जा साठवण प्रकल्प, नवीकरणीय ऊर्जा स्थानांतरण, ग्रीन क्रेडीट कार्यक्रम, पीएम-प्रणम, गोबरधन योजना, भारतीय नैसर्गिक शेती बायो-इनपुट रिसोर्स सेंटर, मिश्टी, अमृत-धरोहर, किनारपट्टी नौवहन आणि वाहनामध्ये बदल यांसारख्या भारत सरकारच्या योजनांना त्यांनी अधोरेखित केले 

या बैठकीच्या निमित्ताने निव्वळ शून्य उत्सर्जन साध्य करणाऱ्या ग्लोबल ग्रीन हायड्रोजन इकोसिस्टिम या चर्चासत्राचे बैठकीसोबतच आयोजन करण्यात आले. दुसऱ्या ईडीडब्लूजी बैठकीचा भाग म्हणून प्रतिनिधींनी गिफ्ट सिटी गांधीनगरला देखील भेट दिली.

स्वच्छ ऊर्जा संक्रमणात जागतिक सहकार्य वाढवण्यासाठी आणि शाश्वत आर्थिक विकासाच्या जाहीरनाम्यात त्याला केंद्रस्थानी ठेवण्यासाठी भारताच्या अध्यक्षतेखाली चार ईटीडब्लूजी बैठका, अनेक आनुषंगिक कार्यक्रम आणि एक मंत्रीस्तरीय बैठक नियोजित आहे.

***

S.Kane/S.Patil/P.Kor

Follow us on social media: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1913127) Visitor Counter : 160


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu