आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोविड- 19 च्या व्यवस्थापनासाठीची सज्जता आणि राज्यांमध्ये कोविड लसीकरणाच्या प्रगतीचा केंद्र सरकारने घेतला आढावा


कोविड पॉझिटिव्ह रुग्णांच्या नमुन्याचे संपूर्ण जिनोम सिक्वेन्सिंगवर भर देत देखरेख व्यवस्था बळकट करण्यासह आरटी-पीसीआर चाचण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्याचे आवाहन राज्यांना आवाहन

ऑक्सीजन सिलेंडर, पीएसए प्लांट, व्हेंटीलेटर्स अशा रुग्णालयांतील पायाभूत सुविधा कार्यान्वयन आणि मनुष्यबळाच्या तत्परतेची क्षमता सज्जता तपासण्यासाठी, राज्यांना मॉक ड्रिल करण्याचा केंद्राचा सल्ला

चाचण्या-मागोवा -उपचार-लसीकरण आणि कोविड प्रतिबंधक सूचनांचे पालन हीच कोविड व्यवस्थापनासाठीची सिद्ध झालेली चाचणी

Posted On: 27 MAR 2023 10:19PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 27 मार्च 2023

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत, देशभरात कोविड महामारीच्या व्यवस्थापनाच्या सज्जतेचा समग्र आढावा घेण्यात आला. देशात कोविडच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रतिनिधीसोबत दूरदृश्य प्रणालीद्वारे ही बैठक झाली. नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य), डॉ. व्ही के पॉल आणि आरोग्य संशोधन विभागाचे सचिव डॉ. राजीव बहल हेही आढावा बैठकीत उपस्थित होते.

22 मार्च 2023 रोजी झालेल्या उच्चस्तरीय आढावा बैठकीत पंतप्रधानांनी राज्यांना सतर्क राहण्याचा आणि कोविड- 19 व्यवस्थापनासाठी सज्जता सुनिश्चित करण्याचा सल्ला दिला होता, असा संदर्भ, केंद्रीय आरोग्य सचिवांनी यावेळी दिला.

त्यांनी राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी कोणत्याही बाबतीत निष्काळजी राहू नये, असा इशारा त्यांनी दिला. तसेच, 25 मार्च  रोजी आरोग्य संशोधन विभाग आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाने जारी केलेल्या संयुक्त मार्गदर्शक सूचनांमध्ये असलेल्या प्राधान्यक्रमांचा पाठपुरावा करण्याचाही सल्ला दिला. आरटी-पीसीआरच्या चाचण्यांचे प्रमाण वाढवावे आणि कोविड पॉझिटिव्ह नमुन्यांचे संपूर्ण जिनोम सिक्वेन्सिंग करण्यावर त्यांनी भर दिला. त्याशिवाय, प्रत्येकाला कोविड प्रतिबंधक सूचनांचे सातत्याने काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले. लोकांनी प्रीकॉशन लसमात्रा, विशेषत: संक्रमणाचा विशेष धोका असलेल्या लोकांना ही लस देण्याच्या गरजेवरही त्यांनी भर दिला.

भारतातील वाढत्या प्रकरणांसह एकूण जगभरातील कोविड-19 परिस्थितीचा  आढावा घेणारे सर्वसमावेशक सादरीकरण या बैठकीत  करण्यात आले. 3 मार्च 2023 रोजी संपलेल्या आठवड्यात कोविडच्या 313 सरासरी दैनंदिन रुग्णसंख्येवरुन 23 मार्च 2023 रोजी संपलेल्या आठवड्यात सरासरी दैनंदिन रुग्णसंख्या 966 पर्यंत पोहोचली असून याच काळात, साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 1.08% वर गेला आहे  असे सांगत, भारतात कोविड-19 प्रकरणांमध्ये वाढ होत आहे अशी राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना माहिती देण्यात आली.

महाराष्ट्रातील साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 3 मार्च 2023 रोजी संपलेल्या आठवड्यात 0.54% होता, तो  24 मार्च 2023 रोजी 4.58% पर्यंत वाढला आहे. गुजरातमध्ये हा दर 0.07% वरून 2.17% झाला आहे. केरळमध्ये, साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 1.47% वरून 4.51% पर्यंत वाढला आहे. कर्नाटकात सरासरी साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 1.65% वरून 3.05% पर्यंत वाढला आहे तर दिल्लीमध्ये साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 0.53% वरून 4.25% पर्यंत वाढला आहे. त्याचप्रमाणे हिमाचल प्रदेशमध्ये साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 1.92% वरून 7.48% पर्यंत वाढला आहे. राजस्थानमध्ये, हा दर, 0.12% वरून 1.62% पर्यंत वाढला आहे आणि तमिळनाडूमध्ये याच कालावधीत साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 0.46% वरून 2.40% पर्यंत वाढला आहे, अशी माहिती या बैठकीत देण्यात आली.

22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील सरासरी दैनंदिन टीपीएम राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी आहे. या बैठकीत असेही नमूद करण्यात आले, की देशातील 22 जिल्ह्यांमधे, 24 मार्च 2023 ला संपलेल्या आठवड्यात, साप्ताहिक पॉझिटिव्हीटी दर 10 टक्क्यांपेक्षा अधिक नोंदला गेला आहे. तर याच कालावधीत, 43 जिल्ह्यांमधे, हा दर, 5-10% इतका नोंदला गेला.

राजेश भूषण यांनी ऑक्सिजन सिलिंडर, PSA संयंत्र, व्हेंटिलेटर, लॉजिस्टिक आणि मानव संसाधनांसह रुग्णालयाच्या पायाभूत सुविधांच्या सज्जतेची  खात्री करण्यासाठी 10 आणि 11 एप्रिल 2023 रोजी सर्व आरोग्य सुविधा केंद्रात मॉक ड्रिल घेण्याचा सल्लाही राज्यांना दिला. 27 डिसेंबर 2022 रोजी आयोजित केलेल्या शेवटच्या मॉक ड्रीलच्या स्थितीबद्दलही त्यांनी माहिती दिली. हे ड्रील एकूण 21,939 सुविधा केंद्रात घेण्यात आले, यात 16,601 शासकीय सुविधा केंद्र आणि 5,338 खाजगी सुविधा केंद्रांचा समावेश होता. देशभरात 94% पेक्षा जास्त PSA संयंत्र आणि ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर कार्यरत स्थितीत असल्याचे आढळले, तर 87% पेक्षा जास्त आयसीयू बेड, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन बेड आणि विलगीकरण बेड कार्यरत स्थितीत आढळले.

नवीन कोविड प्रकारांचा विचार न करता, ‘टेस्ट-ट्रॅक-ट्रीट-लसीकरण आणि कोविड प्रतिबंधक वर्तनाचे पालन’ या कोविड व्यवस्थापनासाठी सिद्ध झालेल्या धोरणाची अंमलबजावणी यापुढेही सुरूच राहिल, असे केंद्रीय आरोग्य सचिवांनी सांगितले. या धोरणामुळे सार्वजनिक आरोग्याच्या योग्य उपाययोजना करणे सुलभ होईल, असे ते म्हणाले. राज्यांनी पुरेशा खाटा आणि आरोग्य कर्मचार्‍यांची उपलब्धता सुनिश्चित करावी, आजार आणि लसीकरणाबाबत जनसमुदाय जागरूकता वाढवावी आणि कोविड इंडिया पोर्टलमध्ये नियमितपणे कोविड-19 संबंधित अद्ययावत माहिती अपडेट करावी असे आवाहन त्यांनी केले.

डॉ व्ही के पॉल यांनी राज्यांना उच्च दर्जाच्या आरटी- पीसीआर चाचण्यांसह सज्जता वाढवण्याचे आवाहन केले तसेच जनतेत खबरदारीच्या मात्रेचे प्रमाण वाढविण्याचे आवाहन केले.

डॉ राजीव बहल यांनी राज्यांना चाचण्या, विशेषत्वाने आरटी- पीसीआर चाचण्या वाढवण्यासाठी आणि कोविडबाबत खबरदारी राखण्यासाठी प्रोत्साहित केले. राज्यांनी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून पाठवलेल्या सूचनांचे  पालन करावे आणि लोकांमध्ये जागरूकता वाढवावी असा सल्ला बहल यांनी दिला. ज्या राज्यांमध्ये कोविड रुग्णांची संख्या जास्त आहे त्यांनी कोविडचे नवे रुग्ण आढळणाऱ्या भागांवर आणि गंभीर प्रकरणांवर विशेष लक्ष ठेवावे असे आवाहन त्यांनी केले.  

यावेळी कोविड व्यवस्थापनाच्या विविध पैलूंवर सर्वसमावेशक आणि तपशीलवार चर्चा झाली. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कोविड आढावा बैठकांची तसेच  पंतप्रधान आणि केंद्रीय आरोग्य मंत्री आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सल्लागार यांच्याकडून वेळेवर पाठवण्यात येणाऱ्या कोविड मार्गदर्शन सूचनांचीही राज्यांनी प्रशंसा केली. कोविड-19 च्या प्रभावी प्रतिबंध आणि व्यवस्थापनासाठी राज्ये केंद्रासोबत काम करतील, असे आश्वासन त्यांनी दिले. आपण  दक्ष आहेत आणि सद्यस्थितीचा आढावा घेत असल्याचे  राज्यांनी सूचित केले. 10 आणि 11 एप्रिल 2023 रोजी रुग्णालयाच्या पायाभूत सुविधांच्या तयारीसाठी ते मॉक ड्रिल आयोजित करतील, असे आश्वासनही राज्यांनी दिले.

आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल आणि मंत्रालयातील इतर अधिकारी या बैठकीत उपस्थित होते. राज्य/ केंद्रशासित प्रदेशातील आरोग्य विभागाचे मुख्य सचिव, राष्ट्रीय आरोग्य मिशनचे (NHM) संचालक देखील आढावा बैठकीत सहभागी झाले होते.

 

 

N.Chitale/Radhika/Shraddha/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1911300)