सांस्कृतिक मंत्रालय
‘नागरी सामाजिक संस्था आणि मानवी मूल्यांचे संवर्धन’ या विषयावर सिव्हील20 इंडिया 2023 च्या दुसऱ्या पूर्ण सत्राचे आयोजन करण्यात आले
Posted On:
21 MAR 2023 2:37PM by PIB Mumbai
नागपूर, 21 मार्च 2023
सिव्हिल-ट्वेंटी इंडिया 2023 च्या प्रारंभिक परिषदेचे दुसरे पूर्ण सत्र 21 मार्च 2023 रोजी नागपूर मधील हॉटेल रॅडिसन ब्ल्यू, येथे झाले. ‘नागरी सामाजिक संस्था आणि मानवी मूल्यांचे संवर्धन’ ही या सत्राची संकल्पना होती. सेवा इंटरनॅशनलचे जागतिक समन्वयक श्याम परांडे, या सत्राच्या अध्यक्षस्थानी होते.
कोल्हापूर, येथील साहस डिसॅबिलिटी रिसर्च अँड केअर फाउंडेशनच्या, अध्यक्ष नसीमा हुरझुक, आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक अभ्यास परिषदेच्या भारतातील शाखेच्या अध्यक्ष, डॉ. शशी बाला, अर्शा विद्या मंदिरचे स्वामी परमात्मानंदा, आणि 100 मिलियन कॅम्पेनचे जागतिक संचालक, ओवेन जेम्स, यांचा या सत्रातील वक्त्यांमध्ये समावेश होता.
या सत्रामध्ये सिव्हिल-ट्वेंटी इंडिया 2023 च्या पुढील कार्यकारी गटांचा समावेश होता. सेवाभाव, परोपकार आणि स्वयंसेवा, वसुधैव कुटुंबकम – संपूर्ण जग एक कुटुंब आहे; एकमेकांबद्दल आदरभाव आणि मानवी मूल्य म्हणून मानवाधिकाराची ओळख. या कार्यगटातील इंडियन सोशल रिस्पॉन्सिबिलिटी नेटवर्क (ISRN) चे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष गुप्ता, युनायटेड कॉन्शियसनेस ग्लोबलचे संयोजक डॉ विक्रांत तोमर , गुवाहाटी येथील विवेकानंद सांस्कृतिक संस्था केंद्राचे (VKIC) अध्यक्ष, डॉ जोराम बेगी आणि सेंटर फॉर पॉलिसी अॅनालिसिसचे कार्यकारी अध्यक्ष दुर्गानंद झा यांनी या सत्रात मार्गदर्शन केले.
या संमेलनात सहभागी असलेले कार्यकर्ते आणि प्रतिनिधींनी गौतम बुद्धांनी दिलेला अत्त दीप भव (स्वतःचा प्रकाश व्हा) हा संदेश घेऊन जावे, असे श्याम परांडे यांनी सांगितले. नैतिक मूल्य आणि मानवी नैतिकता ही नागरी समाजाची बलस्थाने आहेत, भारताला मूल्यांची प्राचीन परंपरा असून ही भारतीय मूल्ये जागतिक मूल्यांशी साधर्म्य दर्शवतात, असे ते म्हणाले.
आपल्याला सर्व काही दिले असून आपण कशाचेही मालक नाही हे समजून घ्या असे स्वामी परमात्मनंदा म्हणाले. आपल्याला सर्व काही मिळालेले असल्याने आपण त्या दात्याचा आदर करायला हवा, असे त्यांनी सांगितले. आपण प्रत्येकाचा आदर करायला हवा, हे अधोरेखित करत आपण इतरांच्या अधिकारांची पायमल्ली करता कामा नये, असे आवाहन त्यांनी केले.
आपण जेव्हा एखादे कार्य सेवाभावाने करतो तेव्हा आपण एखाद्या ध्येयासाठी कार्य करण्याची भावना आपल्या मनात जागृत होते, असे संतोष गुप्ता यांनी सांगितले. सेवा परमोधर्म या वाक्प्रचारात परमोधर्म म्हणजे अध्यात्म आणि भक्ती यांचा संगम आहे. स्वयंसेवा (मर्यादित काळासाठी) आणि परोपकार (चॅरिटी) पेक्षा सेवाधर्म चांगला आहे, असे ते म्हणाले. जगातील मोठ्या धर्मांमध्ये सेवेची व्याख्या कशाप्रकारे केली आहे, याविषयी देखील त्यांनी मार्गदर्शन केले.
जगातील असमानता, विशेषतः आफ्रिका उपखंडातील सहारा क्षेत्रामधल्या असमान विकासावर ओवेन जेम्स यांनी प्रकाश टाकला. दिवसाला 2.15 अमेरिकी डॉलर्सपेक्षाही कमी रकमेमधे गुजराण करणाऱ्या आफ्रिका सहारा उपखंडातील लोकसंख्येत 2015 पासून वाढ झाली आहे. या भागात बालकामगार आणि शाळाबाह्य मुलांची संख्याही वाढती आहे. आफ्रिकेकडे अनेक सर्वोत्तम नैसर्गिक संसाधने आहेत परंतु ते अविकसित राहिले, कारण नफा उपखंडाबाहेर जात आहे. आफ्रिकेच्या मुलांना न्याय देण्याची निकड आहे असे ते म्हणाले.
वसुधैव कुटुंबकम ही जी 20 ची संकल्पना आहे. वसुंधरेवरील प्रत्येक जीव एक कुटुंब आहे असा याचा अर्थ होय. आपण सगळी माणसंच आहोत पण चेतनेचे प्रमाण वेगवेगळे आहे असे विक्रांत तोमर म्हणाले. आपण एकात्मतेची संकल्पना विसरलो आहोत. मानव ही सर्वात बुद्धिमान प्रजाती आहे परंतु पृथ्वीवरील सर्वात दुःखी प्रजाती देखील आहे. हे मर्यादित विचारांमुळे होते. आज आपल्यासमोर एक अस्तित्व किंवा अस्तित्व नाही इतकाच पर्याय असल्याचे ते म्हणाले.
नसीमा हुरझुक यांनी सेवा (सेवा) आणि सेवाभाव (सेवेची भावना) याविषयी सांगितले. सेवेचे दोन प्रकार आहेत- आर्थिक सेवा आणि सामाजिक सेवा. मुळात सेवेची भावना सर्व मानवांमध्ये असतेच, वैयक्तिक संकट आल्यावर इतरांबद्दलही सेवेची भावना जागृत होते. अपेक्षा न ठेवता सेवेचे व्रत सुरू ठेवल्यास सेवेचा आनंद मिळतो, असे त्या म्हणाल्या. #You are the Light (तुम्हीच प्रकाश आहात) म्हणजे समाज स्वबळावर माग्रक्रमण करतो आणि आपण आपला दिवस स्वतः घडवतो” हे सी20 चे बोधवाक्य असल्याचे त्या म्हणाल्या. सी20 आणि जी20 ने खडतर जीवन जगणाऱ्यांच्या विकासावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
विविधता, समावेशकता आणि परस्पर आदर हे जी20 आणि सी20 चे महत्त्वाचे भाग आहेत असे डॉ शशी बाला म्हणाल्या. आनंद हा आर्थिक आणि राजकीय शक्ती वाढवण्यापुरता मर्यादित न राहता उपेक्षित, स्वतःचे म्हणणे मांडू शकत नाहीत तसेच वंचित यांचा आवाज होण्यासाठी, सर्वांगीण विकासावर भर दिला पाहिजे. वसुधैव कुटुंबकममध्ये काहीही न टाळता विविधता समाविष्ट आहे. तुम्ही प्रकाश आहात हे ब्रीदवाक्य ज्ञानाच्या समावेशाकडे घेऊन जाते असे त्या म्हणाल्या.
डॉ.जोराम बेगी म्हणाले की, विविधता हा निसर्गाचा मूलभूत नियम आहे आणि तो अटळ आहे. विश्व हे एकमेकांशी जोडलेले, परस्परसंबंधित आणि परस्परावलंबी आहे आणि हे सर्वांसाठी अंतर्भूत आहे. विविधता, समावेशन आणि परस्पर आदराची तत्त्वे स्वीकारणे ही संघर्ष निराकरणाची सर्वोत्तम यंत्रणा आहे. प्राचीन भारतीय विचार सांगतो की 'सर्वांमध्ये एक प्रकट होतो' असे ते म्हणाले.
दुर्गानंद झा म्हणाले की, संयुक्त राष्ट्र संघटनेने मानवी हक्कांच्या संकल्पनेचा पुनर्विचार करायला हवा. मानवी हक्कांच्या सार्वत्रिक घोषणे व्यतिरिक्त, मानवी हक्कांची प्रादेशिक घोषणाही असावी. मानवी हक्कांचा वापर कोणत्याही देशाविरुद्ध धोरणात्मक साधन म्हणून केला जाऊ नये असे ते म्हणाले.
Jaydevi PS/Bhakti/Vinayak/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1909078)
Visitor Counter : 441