सांस्कृतिक मंत्रालय

‘पर्यावरणासोबत विकासाचा समतोल साधणे’ या संकल्पनेवर सिविल 20 इंडिया 2023 गटाच्या प्रारंभिक परिषदेच्या पूर्ण सत्राचे आयोजन

Posted On: 20 MAR 2023 3:09PM by PIB Mumbai

नागपूर, 20 मार्च 2023

सिविल 20 इंडिया 2023 च्या प्रारंभिक परिषदेच्या पूर्ण सत्राचे 20 मार्च 2023 रोजी नागपूर येथे रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये आयोजन करण्यात आले. ‘पर्यावरणासोबत विकासाचा समतोल साधणे’ या विषयावर या सत्राचे आयोजन करण्यात आले होते. माजी केंद्रीय माहिती आयुक्त सत्यानंद मिश्रा या सत्राच्या अध्यक्षस्थानी होते. क्लिंटन हेल्थ ऍक्सेस इनिशियेटिव्हचे क्लिनिकल डायरेक्टर डॉ. अँडी कार्मोननेदरलँड्सच्या एन्वायरनमेंटल टेक्नॉलॉजी, टीयू डेल्फ्ट, या संस्थेमधील प्राध्यापक डॉ. मेर्ले डे क्रुक, आसाममधील माजुली येथील पर्यावरणतज्ञ जादव पायेंग आणि पीपल्स वर्ल्ड कमिशन ऑन फ्लड अँड ड्रॉट या संस्थेच्या आयुक्त इंदिरा खुराना यांचा प्रमुख वक्त्यांमध्ये समावेश होता.

या सत्रामध्ये एकात्मिक समग्र आरोग्य: मन, शरीर आणि पर्यावरण; शाश्वत आणि प्रतिरोधक्षम समुदाय: हवामान, पर्यावरण आणि निव्वळ शून्य उत्सर्जनाचे उद्दिष्ट; पर्यावरणासाठी जीवनशैली (लाईफ); आणि नद्यांचे पुनरुज्जीवन आणि जल व्यवस्थापन या विषयावरील  सिव्हिल 20 इंडिया 2023च्या कार्यगटांचा समावेश होता. या कार्यगटाच्या समन्वयकांनी देखील या सत्रामध्ये आपले विचार व्यक्त केले.  त्यामध्ये प्रामुख्याने डॉ. प्रिया नायर, स्कूल ऑफ मेडिसिन, अमृता विश्व विद्यापीठम, डॉ. मनीषा सुधीर, प्रोव्होस्ट, अमृता विश्व विद्यापीठम, डॉ. गजानन डांगे, अध्यक्ष, योजक आणि वासुकी कल्याणसुंदरम, सत्संग फाऊंडेशन, भारत यांचा समावेश होता.

सर्व कार्यगटांच्या विषयांमध्ये एक सामाईक संकल्पना आहे आणि ती म्हणजे मानवजमात ही त्यांच्या सभोवतालचा परिसर आणि निसर्ग यावर अवलंबून आहे. माता अमृतानंदमयी(अम्मा) या सिव्हिल 20 2023च्या अध्यक्ष म्हणून आपल्या विचारांमधून ही भावना व्यक्त करत आहेत, असे मानले जात आहे असे मत आपल्या अध्यक्षीय भाषणात सत्यानंद मिश्रा यांनी व्यक्त केले . 

एकात्मिक समग्र आरोग्य म्हणजेच समावेशक आरोग्य ही संकल्पना विस्ताराने समजावून सांगताना आरोग्य आणि पर्यावरण यात परस्परसंबंध आहे, असे डॉ. प्रिया नायर म्हणाल्या. समग्र आरोग्याविषयी आपल्या कार्यगटाकडून सुरू असलेल्या उपक्रमांशी संबंधित सर्वोत्तम उदाहरणांचा विचार आपल्या कार्यगटाने केला असे त्यांनी सांगितले. मानसिक आरोग्य, पोषणावर भर, ज्येष्ठांचे आरोग्य आणि जीवनाची काळजी घेणारे समग्र आरोग्य, बिगर संसर्गजन्य आजार, वन हेल्थ आणि महिला आणि बालकांचे आरोग्य हे समग्र आरोग्याचे एकात्मिक घटक असल्यावर त्यांनी भर दिला.

डॉ. मनीष सुधीर म्हणाले की त्यांच्या कार्यगटाने हवामान प्रतिरोधक्षमता आणि सामाजिक न्याय, पर्यावरणीय शाश्वतता, शून्य उत्सर्जन उद्दिष्टाचे व्यवस्थापन आणि दयाबुद्धी असलेल्या दृष्टीकोनातून शाश्वत विकास या चार उपकल्पनांवर  भर दिला.

जीवनशैली आणि विकासाचा परस्परसंबंध आहे असे गजानन डांगे यांनी सांगितले. मूल्याधारित चौकटीसोबत लक्ष्याधारित चौकटीची भर घातली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. मूल्याधारित दृष्टीकोनाची चौकट ही पर्यावरण केंद्रित जीवनशैलीची गुरुकिल्ली आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. विकासाची भारतीय पद्धत आम्ही जगामध्ये पुढे घेऊन जाऊ असे ते म्हणाले.

वासुकी कल्याणसुंदरम यांनी नद्यांच्या संवर्धनाचे महत्त्व विशद केले. नद्यांची पाणीपातळी खालावणे आणि जलस्रोतांचे प्रदूषण ही चिंतेची बाब असे सांगत त्यांनी जल व्यवस्थापनातील 5 आर च्या भूमिकांवर प्रकाश टाकला - ते म्हणजे रिड्यूस, रियुज, रिचार्ज, रिसायकल आणि रिस्पेक्ट अर्थात कमीत कमी वापर, पुनर्वापर, पुनर्भरण, पुनर्चक्रीकरण आणि आदर  . त्या म्हणाल्या की जगभरातील सरकारे जसे कि भारत आणि न्यूझीलंड सरकारे नद्यांना सजीव म्हणून मान्यता देत आहेत हे एक सकारात्मक लक्षण आहे.

डॉ. अँडी कार्मोन म्हणाल्या की आरोग्यावर चर्चा करताना दोन संकल्पना खूप महत्त्वाच्या होत्या: समानता, लिंगभाव एकात्मता आणि एकात्मिक समग्र आरोग्य. दुर्गम भागात राहणाऱ्या आणि उपेक्षित समाजातील लोकांच्या आरोग्याच्या समस्यांकडे आपण लक्ष देण्याची गरज आहे यावर त्यांनी भर दिला.

डॉ मेर्ले डी क्र्यूक यांनी जलचक्राचे महत्त्व सांगितले. मानवाने जलचक्र तोडल्याचे त्या म्हणाल्या. शास्त्रज्ञ आणि संशोधक म्हणून, आम्ही ते सुधारण्याचे मार्ग शोधत आहोत, परंतु आम्हाला ते पुनर्स्थित करणे आवश्यक आहे. हवामान बदलाची समस्या लक्षात घेऊन त्याचे दुष्परिणाम कमी  करणे गरजेचे असून  जलचक्र पुनर्स्थित करण्याची आमच्याकडे ही एकमेव संधी आहे.

इंदिरा खुराणा यांनी हवामान बदल, दुष्काळ आणि पूर या विषयावर बोलताना वर्षा जल संधारणाचे महत्त्व सांगितले. विकेंद्रित जलसंधारणाच्या दृष्टिकोनाबद्दल त्यांनी सांगितले; ज्यामध्ये स्थानिक कौशल्य आणि पीक लागवडीकडे पर्यावरणशास्त्र आणि पर्जन्यमानाबरोबरच आवश्यक बाब म्हणून पाहिले जाते. त्यांनी समुदायाच्या सहभागाचे महत्त्व अधोरेखित केले. त्या म्हणाल्या की उत्सर्जन कमी करण्याच्या उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करणे पुरेसे नाही तर पाणी आणि जलसंवर्धनावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. हवामानाच्या कोणत्याही चर्चेत पाणी हा महत्वाचा मुद्दा असला पाहिजे.

जादव पायेंग यांनी वनसंरक्षणातील त्यांच्या कार्याबद्दल सांगितले. वृक्षलागवड आणि त्यांचे संगोपन करण्याच्या भूमिकेवर त्यांनी भर दिला. झाडे फक्त लावायची नसतात तर त्यांचे संगोपनही करायचे असते. ते म्हणाले की त्यांनी लावलेल्या जंगलांमुळे जैववैविध्य निर्माण झाले आहे. त्यांच्या जंगलाअंतर्गत एक प्रकल्प राबवला जातो जो पर्यावरणावर प्रेम आणि आदर करायला आणि वृक्षलागवड शिकवतो. वाढदिवसानिमित्त केक कापण्यापेक्षा एक झाड लावा, असे आवाहन त्यांनी केले.

सत्यानंद मिश्रा यांनी सर्व वक्त्यांचे आभार मानून सत्राची सांगता केली. या अधिवेशनात पर्यावरणाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.

 

Jaydevi PS/Shailesh/Vasanti/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1908777) Visitor Counter : 290