श्रम आणि रोजगार मंत्रालय
एल-20 (लेबर-20) च्या पहिल्या बैठकीत भविष्यातील कार्यक्षेत्रात महिलांना केंद्रस्थानी ठेवत, सामाजिक सुरक्षेचे सार्वत्रिकीकरण यावर भर
Posted On:
19 MAR 2023 7:07PM by PIB Mumbai
भारताच्या जी-20 अध्यक्षपदाच्या कार्यकाळाचा भाग असलेल्या एल-20 म्हणजे लेबर-20 शी संबंधित गटाची प्रारंभिक बैठक आज पंजाबच्या अमृतसर इथे सुरु झाली. या बैठकीत, जागतिक श्रमशक्तीशी संबंधित महत्वाच्या मुद्यांवर चर्चा होणार असून, त्यातून जी-20 राष्ट्रांना आणि संस्थांना या प्रश्नावर भर देत, विकासाची फळे शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी लक्ष केंद्रीत करण्यासाठी एक दिशा मिळू शकेल.
कामगार संघटनांचे नेते, श्रम क्षेत्रातील तज्ञ आणि जी-20 देशांचे प्रतिनिधी या लेबर-20 बैठकीत सहभागी झाले असून, भविष्यातील कार्यक्षेत्रात महिलांना केंद्रस्थानी ठेवून, सामाजिक सुरक्षेचे सार्वत्रिकीकरण करण्याबद्दल तयारी केली जात आहे.
भारतीय मजदूर संघ (BMS) चे राष्ट्रीय अध्यक्ष आणि लेबर-20 चे अध्यक्ष हिरण्मय पंड्या, यांनी उद्घाटन सत्रात 2023 मध्ये जी-20 च्या मूलभूत तत्वाशी सुसंगत दृष्टिकोन ठेवत जगभरातली श्रमशक्ती एक कुटुंब आहे असा विचार मांडला. जी-20 ची एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य ही संकल्पना जागतिक स्तरावरील कामगार चळवळीशी कशी सुसंगत आहे यावरही प्रकाश टाकला.
या लेबर-20 बैठकीचा समरोप उद्या होणार असून यावेळी, सामाजिक सुरक्षेचे सार्वत्रिकीकरण आणि महिला तसेच कामाचे भविष्य अशा दोन्ही विषयांवर झालेल्या विस्तृत विचारमंथनानंतर एक संयुक्त निवेदन प्रसिद्ध केले जाणार आहे, अशी माहिती, भारतीय मजदूर संघाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष, सी. के. साजी नारायणन यांनी दिली.
आर्थिक संकटांचा महिलांना सर्वाधिक फटका बसतो. त्यामुळेच, जर आपल्या भविष्यातील काम महिला शक्तीवर अवलंबून असेल, तर त्याला जागतिक पातळीवर योग्य दिशा मिळणे आवश्यक आहे.
जगभरातील कामगारांच्या स्थलांतरणाबाबतचे नवे कल लक्षात घेता सामाजिक सुरक्षिततेच्या सुविधांच्या पोर्टेबिलिटीसाठी जागतिक यंत्रणा विकसित करणे देखील महत्त्वाचे आहे, असे ते म्हणाले.
भारत जगात शांतता आणि सौहार्द प्रस्थापित करू इच्छितो आणि अर्थव्यवस्थेतही “कौटुंबिक भावना” पुन्हा निर्माण करण्याची हीच वेळ आहे, असे भारताच्या नियोजन आयोगाचे माजी सदस्य अरुण मायरा यांनी यावेळी म्हणाले.
***
S.Kane/R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1908606)
Visitor Counter : 257