आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

दोन दिवसीय जागतिक भरडधान्य (श्री अन्न) परिषदेच्या निमित्ताने भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने  विविध चर्चा सत्रांचे केले आयोजन


भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने तयार केलेल्या 'श्री अन्न : अ होलिस्टिक ओव्हरव्ह्यू' या पुस्तकाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रकाशन

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या  परिषदेच्या पहिल्या दिवशी झालेल्या तीन वेगवेगळ्या सत्रांमध्ये जगभरातील अनेक तज्ञांनी मांडली श्री अन्नाविषयी (भरडधान्ये) मते

Posted On: 19 MAR 2023 12:32PM by PIB Mumbai

 

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने भरड धान्यांच्या प्रचार आणि जनजागृतीसाठी एका परिसंवादाचे आयोजन केले आहे.  तसेच या विषयाशी संबधीत तंत्रज्ञानाच्या पैलुवरचे सत्रही आयोजित केले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच, नवी दिल्लीत पुसा इथल्या राष्ट्रीय कृषी विज्ञान संस्थेत आयोजीत केलेल्या भरडधान्यविषयक जागतिक परिषदेचे (श्री अन्न) उद्घाटन केले. हा परिसंवादही याच परिषदेला समांतरपणे आयोजित केला आहे. भरडधान्यविषयक जागतिक परिषदेच्या उद्घाटन सत्रातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने तयार केलेल्या  (एफएसएसएआय)  "श्री अन्न: अ होलिस्टिक ओव्हरव्ह्यू" या पुस्तकाचेही डिजिटल माध्यमातून प्रकाशन केले. हे पुस्तक भरडधान्यांच्या मानकांवर आधारीत आहे.

एफएसएसएआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी. कमला वर्धन राव यांनी या दोन दिवसांच्या परिषदेत स्वागतपर भाषण केले. आपल्या भाषणात त्यांनी सांगितले की, भरडधान्यांची जगातील सर्वात प्राचीन पीके आता आपले वर्तमान आणि भविष्य सुनिश्चित करणारी पिके झाली आहेत, आणि त्याच अनुषंगाने आपण कृषी क्षेत्र पुनरुज्जीवीत होताना पाहत आहोत.

या उद्घाटन सत्रात नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल हे देखील सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थितीत होते. या सत्राला संबोधीत करताना त्यांनी सांगितले की, भरडधान्ये  ही ग्राहक, शेतकरी आणि हवामान अशा सगळ्याच घटकांच्या दृष्टीने फायदेशीर आहेत. तर आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी परिषदेच्या संकल्पनेमागची भूमिका मांडताना केलेल्या भाषणातून ठळकपणे मांडले की, अगदी ऐतिहासिक काळापासूनच भरडधान्यांची लागवड केली जात आहे, मात्र तरीदेखील आजवर भरडधान्यांच्या लागवडीखालील एकूण क्षेत्रात लक्षणीय घट झाली आहे. आता आपण भरडधान्यांविषयीची मोठी मोहीम हाती घेऊन पुढे वाटचाल करत असताना, याआधीच्या घसरणीमागची मूळ कारणे शोधण्याची आणि त्यावर उपाययोजना करण्याची हीच योग्य वेळ असणार आहे.

या मुख्य कार्यक्रमानंतर, दिवसाच्या दुसऱ्या सत्रात राष्ट्रीय कृषी विज्ञान  संस्थेच्या ए. पी. शिंदे परिसंवाद सभागृहात आयोजित केलेल्या भरडधान्यांचे आरोग्य आणि पोषण विषयक फायदे या विषयावरच्या परिषदेला सुरुवात झाली. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वतीने ही परिषद आयोजीत करण्यात आली होती. या परिषदेअंतर्गत पहिल्या दिवशी झालेल्या तीन वेगवेगळ्या सत्रांमध्ये सहभागी झालेल्या जगभरातील  तज्ञांनी आपापली मते मांडत, श्री अन्नाचे (भरडधान्यांचे) महत्त्व अधोरेखित केले.

या सत्रात, आशिया प्रशांत क्षेत्राच्या अन्न आणि कृषी संघटनेचे  सहाय्यक महासंचालक आणि क्षेत्रिय प्रतिनिधी जोंग-जिन किम हे विशेष निमंत्रीत वक्ते म्हणून उपस्थित होते. आशिया प्रशांत क्षेत्राची अन्न आणि कृषी संघटना  भारतासह आणि जगभरात उत्तम उत्पादन, उत्तम पोषणतत्वे आणि उत्तम परिसंस्था घडवून आणण्यासाठीच्या कार्यपद्धती विकसीत करणे आणि यासाठी आवश्यक पाठबळ देण्याच्यादृष्टीने स्वतःची जबाबदारी पूर्णत्वाला नेण्यासाठी वचनबद्ध आहे, असं जोंग-जिन किम यांनी उपस्थितीतांना संबोधीत करताना स्पष्ट केलं. युनिसेफच्या भारतीय शाखेतील पोषण विभाग प्रमुख अर्जन डी वॅग्ट हे देखील या परिषदेला उपस्थीत होते. भरडधान्यांमधील अनेकविध सुक्ष्म पोषणतत्वे म्हणजे बालके आणि किशोरवयीन मुलांसाठी पोषणाचे भांडार आहेत. या पोषण तत्वांमुळे भरडधान्ये ही एकप्रकारे 'पोषणाचे शक्ती स्थान' बनली आहेत. आणि आपण आपल्या दैनंदिन आहारात भरडधान्यांचा समावेश केला तर, त्यामुळे आपल्या आहारालाही बहुरंगी/सप्तरंगी 'रेनबो डाएट' आहाराचे स्वरुप मिळेल असे वॅग्ट आपल्या संबोधनात म्हणाले. नागरिकांना पौष्टिक आणि संतुलित आहाराची जाणीव होईल याची सुनिश्चिती करण्यासाठी, 'आहार साक्षरता' महत्त्वाची असल्याचेही वॅग्ट यांनी आपल्या संबोधनातून अधोरेखीत केले.

या परिषदेच्या दुसऱ्या सत्रात भरडधान्याचे मौल्यवान अन्नधान्य म्हणून महत्त्व अधोरेखीत करणाऱ्या मुद्यांवर चर्चा झाली. नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही. के. पॉल यांनी सत्राचे समन्वयक म्हणून काम पाहीले. आशिया प्रशांत क्षेत्राच्या अन्न आणि कृषी संघटनेचे (एफएओ) भारताचे प्रतिनिधी डॉ. अझीझ एल्बेहरी,   भारतातील ब्राझील दूतावासाचे कृषी प्रतिनिधी अँजेलो डी क्वेईरोज मॉरिशियो, जर्मनीच्या दूतावासातील सल्लागार इंन्गेबर्ग बेयर, अर्जेंटिनाच्या दूतावासाचे प्रतिनिधी मरियानो बेहेरान आणि भारतातील कॅनडाच्या उच्चायुक्तालयाचे कृषीविषयक सल्लागार नितीन वर्मा हे या परिषदेसाठी उपस्थीत होते. उपस्थीत सर्व प्रतिनिधींनी नियोजीत धोरण आखण्याची गरजेविषयी मौल्यवान मार्गदर्शन केले, यासोबतच सध्याच्या बाजारपेठेतील भरडधान्यांची स्थिती, आणि भरडधान्यांसाठी बाजारपेठेत मागणी निर्माण करण्याची गरज याचे महत्वही अधोरेखीत केले.

ज्येष्ठ क्रीडा पत्रकार अयाज मेमन यांनी या परिषदेतील तिसऱ्या सत्राचे समन्वयक म्हणून काम पाहीले. भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती कुस्तीपटू गीता फोगट, अॅथलेटिक्स खेळाडू अंजू बॉबी जॉर्ज, भारतीय बॅडमिंटन संघाचे मुख्य राष्ट्रीय प्रशिक्षक पुलेला गोपीचंद आणि भारतीय क्रिकेट संघाचे माजी मुख्य निवडकर्ता एमएसके प्रसाद हे या सत्रात वक्ते म्हणून उपस्थीत होते. क्रीडा क्षेत्रातील या सर्व दिग्गजांनी  'भरडधान्याचे लाभ आणि भरडधान्यांचे फायदे' या विषयावर आपली मते मांडली. या सत्रात झालेल्या समुह चर्चेमध्ये उपस्थिती वक्त्यांनी विशिष्ट खेळ आणि खेळाच्या स्वरुपाला अनुसरून आपला आहार कसा असायला हवा आणि त्याची आवश्यकता काय याबद्दलही चर्चेच्या माध्यमातून मार्गदर्शन केले.

या तीनही सत्रासाठी उपस्थीत असलेल्या श्रोत्यांनीदेखील भरडधान्ये आणि भरडधान्यांच्या आरोग्यविषयक लाभांविषयी अनेक रंजक प्रश्नही विचारले.

पोषणतज्ञ, आरोग्यतज्ञ, धोरणकर्ते, या क्षेत्राशी संबंधीत दिग्गज उद्योजकआंतरराष्ट्रीय वक्ते आणि प्रमुख भागधारकांचा परस्परांसोबत संवाद घडवून आणत, सरकारने आखलेल्या विविध उपक्रमांच्या वाटचालीत त्यांना सहभागी करून घेणे, तसेच भरडधान्याचे सेवन, त्याचे आरोग्यविषयक लाभ, भरडधान्यांसंबधी संशोधन, नव्या कल्पना, शाश्वतता आणि अन्न साखळीतले परिवर्तन यावर विचार विनिमय करणे हा या परिषदेचा उद्देश आहे.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण, कृषी विभाग आणि शेतकरी कल्याण विभागाचे सचिव मनोज आहुजा, भारतीय कृषी संशोधन आणि शिक्षण विभागाचे (DARE) सचिव आणि भारतीय कृषी संशोधन परिषदेचे (ICAR) महासंचालक डॉ. हिमांशू पाठक, एफएसएसएआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी कमला वर्धन राव हे या परिषदेला उपस्थीत होते. याशिवाय, इथिओपियाच्या अध्यक्ष साहले-वर्क झेवडे आणि गयाना प्रजासत्ताकचे अध्यक्ष डॉ. मोहम्मद इरफान अली यांच्यासह गांबिया, गयाना, नायगर, श्रीलंका, सुदान, सुरीनाम, मालदीव, मॉरिशस यांसारख्या भरडधान्य उत्पादक देश आणि आयातदार देशांचे कृषी मंत्रीही या परिषदेत आभासी पद्धतीने सहभागी झाले होते. यासोबतच शिक्षण आणि उद्योग क्षेत्राचे प्रतिनिधी, युनिसेफ इंडिया तसेच अन्न आणि कृषी संघटनेसारख्या (एफएओ) भागीदार संघटनांचे प्रतिनिधी, शास्त्रज्ञ, तज्ञ, शेतकरी उत्पादक संघटना (एफपीओ), कृषी विज्ञान केंद्र, अनिवासी भारतीयांचे प्रतिनिधी तसेच विविध सरकारांमधले वरीष्ठ अधिकारीही या परिषदेत सहभागी झाले होते.

***

S.Kane/T.Pawar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1908528) Visitor Counter : 210