युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
“कामाचे भविष्यातील स्वरूप: चौथी औद्योगिक क्रांती, नवोन्मेष आणि 21 व्या शतकातील कौशल्ये” या चर्चासत्राने वाय-20 च्या पुण्यातील चौथ्या सल्लामसलत बैठकीची सांगता
जगभरातील 700 पेक्षा जास्त विद्यार्थी प्रतिनिधी बैठकीत सहभागी
Posted On:
16 MAR 2023 8:03PM by PIB Mumbai
पुणे, 16 मार्च 2023
पुण्यातल्या सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठात सुरु असलेल्या युवा-20 सल्लामसलत बैठकीचे, सहावे आणि समारोप सत्र, “कामाचे भविष्यातील स्वरूप: चौथी औद्योगिक क्रांती, नवोन्मेष आणि 21 व्या शतकातील कौशल्ये” या विषयावर आयोजित करण्यात आले होते.
या चर्चासत्रात, अॅमेझॉन वेब सर्व्हिसचे भारत आणि दक्षिण आशियाचे प्रमुख तसेच कस्टमर सोल्यूशन्स मॅनेजमेंटचे प्रमुख प्रमुख डॉ. बिस्वजित महापात्रा यांनी आज जग एकमेकांशी कसे जोडले गेले आहे, यावर प्रकाश टाकला. त्यांनी डिजिटल परिवर्तनाची 4 आयामांमध्ये व्याख्या केली. ही व्याख्या, वास्तविक वेळेत सुरु असलेल्या परस्परसंवादाभोवती फिरते. तसेच, व्यवसाय आणि ग्राहकांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी भविष्यसूचक विश्लेषणाविषयक वर्तणूक, बुद्धिमत्ता आणि काही काळ टिकणाऱ्या संशोधानांचा ‘गती’ हा स्थायीभाव, अशा संकल्पना त्यांनी यावेळी मांडल्या. तगून राहणारे, भविष्य घडवण्याची नवी गुरुकिल्ली, म्हणजे डेटा विश्लेषण आहे, असे ते पुढे म्हणाले.
केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि महिती संपर्क मंत्रालायचे धोरण सल्लागार देवांश शाह म्हणाले, “जगाने क्वचितच पाहिलेल्या क्रांतीचे आज आपण साक्षीदार आणि भाग आहोत. विविध क्षेत्रांत थेट परदेशी गुंतवणुकीच्या बाबतीत भारत आज भक्कम स्थितीत आहे. तसेच, नवोन्मेष आणि स्टार्ट-अप्सच्या क्षेत्रातही नवा भारत आज आपल्या स्वतःच्या भूमिकांवर चालतो आहे. जगाचे नेतृत्व करण्यात, भारतीय तरुण आज आघाडीवर आहेत” असे शाह म्हणाले. नवोन्मेष हाच पुढे जाण्याचा मार्ग आहे, यावर ठाम विश्वास व्यक्त करत, खाजगी क्षेत्र आणि सार्वजनिक उपक्रमांमध्येही आपल्याला ते स्पष्टपणे दिसते आहे, असे त्यांनी पुढे सांगितले. ग्रामीण भागात डिजिटल पेमेंट प्रणालीचा वापर वाढवून, सार्वजनिक-खाजगी भागीदारीतून नवोन्मेष आणि आर्थिक समावेशन कसे साध्य होऊ शकेल, हे ही त्यांनी सविस्तरपणे मांडले.
किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेडच्या सह व्यवस्थापकीय संचालक आणि आणि, किर्लोस्कर एबारा पंप्स लिमिटेड (KEPL) च्या व्यवस्थापकीय संचालिका रमा किर्लोस्कर यांनी पारंपारिक उत्पादने विरुद्ध जागतिक उत्पादने या स्पर्धेवर प्रकाश टाकला. तसेच, नव्या युगातील तंत्रज्ञान, विशेषत: वेळ आणि मेहनत वाचवण्याऱ्या कृत्रिम बुद्धीमत्तेच्या क्षेत्रात गुंतवणूक करण्याकडे वाढत असलेला कल, या विषयावरही त्यांनी मार्गदर्शन केले. अर्थव्यवस्थेत महिलांना असलेल्या महत्वावरही त्या बोलल्या.
मात्र, या संपूर्ण चर्चेत, कल्पकतेची आणि सर्जनशीलतेची जागा नवीन युगाची साधने घेणार नाही, असे मत वक्त्यांनी व्यक्त केले. मोठ्या प्रमाणात उत्पादन आणि प्रोग्रामिंग कॉन्फिगरेशन अशा कामांची जागा, कृत्रिम बुद्धीमत्ता घेऊ शकेल, असे मत व्यक्त करण्यात आले. मात्र आता विशेष अभ्यासक्रम असलेली विद्यापीठे सुरु झाल्यामुळे तसे विशेष कुशल मनुष्यबळ निर्माण होईल, यावर या चर्चेत भर देण्यात आला. नव्या परिस्थितीनुसार स्वतःत बदल करत, नवे तंत्रज्ञान आंगिकारण्याचे भारतीय समुदायाचे वैशिष्ट्य असून त्यांनी त्यांची कौशल्ये थोडी अधिक विकसित केल्यास, नव्या पिढ्यांसाठी नव्या संधीची दारे उघडी होतील, असेही मत या चर्चेत व्यक्त करण्यात आले. आयटी - व्हेरिटास टेक्नॉलॉजीजचे वरिष्ठ व्यवस्थापक, आकाशदीप मक्कड यांनी या सत्राचे सूत्रसंचालन केले.

या सत्राने, पुण्यात सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठात सुरु असलेल्या युवा-20 सल्लामसलत बैठकीची सांगता झाली. वाय-20 सचिवालययाचे अध्यक्ष आणि ट्रॅक चेअर यांच्यासह, युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाचे अधिकारी, अतिमहत्वाच्या व्यक्ती आणि इतर विशेष निमंत्रित या बैठकीला उपस्थित होते. तसेच, भारतासह, अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, फ्रान्स, जर्मनी, इंडोनेशिया, जपान, इटली, मेक्सिको, रशिया आणि इतर G20 देशांमधील 700 विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित होते. त्याशिवाय, सौदी अरेबिया, दक्षिण कोरिया, इंग्लंड, अमेरिका नायजेरिया, टांझानिया, इथिओपिया, टोगो, येमेन, अफगाणिस्तान, बोत्सवाना, गांबिया, चाड, लेसोथो, नेपाळ, भूतान यासह इतर देशांतील विद्यार्थ्यांचाही समावेश होता.

सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी, युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय, शैक्षणिक संस्था यांच्या सहकार्यातून या प्रतिनिधींची निवड करण्यात आली. सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ, युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय, पुण्यातल्या शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठे, एनएसएस आणि नेहरू युवा केंद्र, उच्च शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र, रोटरी आणि Y20 सचिवालय यांच्या सहकार्याने या प्रतिनिधींची निवड करण्यात आली होती.
* * *
PIB Mumbai | JPS/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1907773)