राष्ट्रपती कार्यालय

भारतीय महसूल सेवेतील प्रशिक्षणार्थी अधिकारी आणि केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहाय्यक कार्यकारी अभियंत्यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट

Posted On: 14 MAR 2023 2:48PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 14 मार्च 2023

भारतीय महसूल सेवेच्या 76 व्या तुकडीचे प्रशिक्षणार्थी अधिकारी आणि केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (CPWD), 2020 आणि 2021 या वर्षातील सहाय्यक कार्यकारी अभियंत्यांच्या तुकडीने आज (14 मार्च 2023) भारताच्या राष्ट्रपती, श्रीमती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात भेट घेतली.

भारतीय महसूल सेवेतील अधिकारी प्रशिक्षणार्थींना संबोधित करताना राष्ट्रपती म्हणाल्या की, सरकारसाठी प्रत्यक्ष कर गोळा करणे ही अत्यंत महत्त्वाची जबाबदारी आहे ज्यासाठी प्रभावीपणा आणि पारदर्शकता आवश्यक असते. सरकार या करांचा वापर विकास प्रकल्पांना निधी देण्यासाठी आणि नागरिकांचे कल्याण सुनिश्चित करण्यासाठी करत असते. सरकारसाठी संसाधने जमा करण्यात आणि त्याद्वारे शासनाच्या इतर संरचना ज्या पायावर बांधल्या जातात त्या इमारतींची जडणघडण करण्यात भारतीय महसूल अधिकाऱ्यांची (IRS) ‌‌महत्त्वाची भूमिका असते. करदाते हे केवळ कमाईचे स्रोत नसून ते राष्ट्र उभारणीतील आपले भागीदार आहेत, हे लक्षात ठेवण्याचा सल्ला त्यांनी अधिकाऱ्यांना दिला. त्यांनी कर संकलनासाठी अनुकूल आणि करदात्यांसाठी सौहार्दाचे वातावरण निर्माण करण्याचे आवाहन यावेळी केले.

सहाय्यक कार्यकारी अभियंत्यांना संबोधित करताना राष्ट्रपतींनी नमूद केले, की केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग हा सार्वजनिक इमारती, सरकारी कार्यालये, गृहनिर्माण आणि त्यांची देखभाल करणे या प्रशासन आणि सरकारी व्यवस्थापन चालवणाऱ्या लोकांच्या प्रभावी कामगिरीसाठी असलेल्या मूलभूत प्रकल्पांचे बांधकाम आणि देखभाल करण्यासाठी जबाबदार आहे. त्या पुढे म्हणाल्या, की भारताच्या वेगवान विकासामुळे रस्ते, महामार्ग, विमानतळ, रुग्णालये, शैक्षणिक संस्था आणि सरकारी कार्यालये यासारख्या सार्वजनिक पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या मागणीत वाढ झाली आहे. त्या म्हणाल्या की सीपीडब्ल्यूडी (CPWD) अधिकारी या नात्याने सहाय्यक कार्यकारी अभियंत्यांनी सध्याच्या काळातील गरजा पूर्ण करण्याचेच केवळ उद्दिष्ट ठेवून  चालणार नाही तर येणाऱ्या पिढ्यांचे शाश्वत भविष्य देखील सुनिश्चित होईल हे ध्येय डोळ्यांसमोर ठेवायला हवे.प्रकल्प अधिक ऊर्जा-कार्यक्षम, शाश्वत आणि पर्यावरणपूरक बनवण्यासाठी नाविन्यपूर्ण मार्ग शोधण्याचे आवाहन राष्ट्रपतींनी यावेळी अधिकारी प्रशिक्षणार्थींना  केले.

राष्ट्रपतींचे भाषण पूर्ण पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा.

S.Thakur/S.Patgaonkar/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1906712) Visitor Counter : 184